Headlines

Fourth Standard Yashashree Ghule Student Taken Interview of CM Devendra Fadnavis


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शाळा प्रवेशोत्सव निमित्त पनवेलच्या वहाळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद शाळेला भेट दिली. यावेळी चौथी इयत्तेतील विद्यार्थिनीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली.

CM Devendra Fadnavis
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पनवेल, अमुलकुमार जैन : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शाळा प्रवेशोत्सवानिमित्त रायगड जिल्ह्यातील वहाळ येथील पीएमश्री जिल्हा परिषद शाळेत आले होते. डिजिटल लॅबचे उद्घाटन, विद्यार्थ्यांशी संवाद आणि विविध उपक्रमांमध्ये सहभाग असे कार्यक्रम सुरू असतानाच एक अनपेक्षित आणि हृदयस्पर्शी प्रसंग घडला. इयत्ता चौथीतील चुणचुणीत विद्यार्थिनी यशश्री मिठू घुले हिने थेट मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेऊन उपस्थितांची मने जिंकली.

शिक्षिका साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेली यशश्री आत्मविश्वासाने मुख्यमंत्र्यांसमोर उभी राहिली. हातातील फाईल उघडत तिने पहिलाच प्रश्न विचारला, “सर, आपले नाव काय?” या निरागस प्रश्नावर मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. त्यांनीही तितक्याच आपुलकीने उत्तर देत संवादाला सुरुवात केली.

त्यानंतर यशश्रीने त्यांच्या सामाजिक आणि राजकीय प्रवासाबाबत प्रश्न विचारले. “आपल्या प्रवासाची सुरुवात कशी झाली?” या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थी चळवळीतून आपल्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात झाल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवत-सोडवत नेतृत्वाची वाट कशी खुली झाली, हे त्यांनी सोप्या भाषेत स्पष्ट केले.

यशश्रीचा पुढील प्रश्न अधिक प्रगल्भ होता. “तुमच्या कामात कोणती मोठी आव्हाने आली आणि त्यावर मात कशी केली?” यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचा संदर्भ देत संघर्ष, प्रामाणिकपणा आणि समाजहिताची प्रेरणा विद्यार्थ्यांना दिली.

यशश्रीने सध्याच्या डिजीटल युगाशी संबंधित प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारला. आजच्या डिजीटल युगात आपण शिक्षण क्षेत्रात कोणते बदल करु इच्छिता? असा प्रश्न यशश्रीने केला. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं. “मला असे वाटते की, डिजीटल शिक्षण खूप महत्त्वाचे आहे. आज या शाळेत अतिशय सुंदर डिजीटल लॅबचे मी उद्घाटन केलं. आता डिजीटल युगात डिजीटल शिक्षण महत्त्वाचं आहे. डिजीटल शिक्षणामुळे शिक्षणाची दारे उघडली आहेत. जगातील कुठलीही गोष्ट आपल्याला शिकता येते. आपल्या शाळेतील प्रत्येकाने डिजीटल लॅबमध्ये जाऊन डिजीटल शिक्षण घ्यायचं”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, मुलाखतीचा शेवट सर्वाधिक संस्मरणीय ठरला. “तुमच्या आयुष्यातील असा कोणता अनुभव आहे, जो तुम्हाला कायम प्रेरणा देतो?” या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी हसत उत्तर दिले, “माझ्या आयुष्यात अनेक अनुभव आहेत, पण आज तुझी घेतलेली ही मुलाखत माझ्या कायम लक्षात राहील.”

या उत्तरानंतर संपूर्ण वर्गात टाळ्यांचा कडकडाट झाला. मुख्यमंत्र्यांनी यशश्रीच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि उपस्थितांनीही तिच्या आत्मविश्वासाचे भरभरून कौतुक केले. एका जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनीने दाखविलेली ही प्रगल्भता आणि शिक्षिकेच्या परिश्रमांचे हे यश पाहून प्रवेशोत्सवाला खऱ्या अर्थाने वेगळी उंची मिळाल्याची भावना उपस्थितांच्या मनात उमटली. यशश्रीच्या या आत्मविश्वासपूर्ण मुलाखतीने मुख्यमंत्रीही तिचे चाहते झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

चेतन पाटील

लेखकाबद्दलचेतन पाटीलचेतन पाटील महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये डिजीटल कंटेट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन इथे सेकंड शिफ्ट इंचार्ज म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. महाराष्ट्र, देश, विदेश, राजकीय, क्रीडा, मनोरंजन अशा विविध बीटच्या बातम्या लिहिण्याचा त्यांना अनुभव आहे. एखादी मोठी बातमी कमी वेळात सर्वात आधी ब्रेक करण्याचं त्यांचं कसब आहे. ब्रेकिंग आणि महत्त्वाच्या बातम्या कमी वेळात लिहून ते अपलोड करण्यात ते पारंगत आहेत. पण कुठलीही बातमी ब्रेक करताना तिची सत्यता पडताळणी केल्याशिवाय ते ती बातमी पुढे जाऊ देत नाहीत. पत्रकार म्हणून त्या बातमीची शहानिशा करणं ही आपली प्राथमिक जबाबदारी असल्याचं चेतन पाटील मानतात.

डिजीटल पत्रकारितेच्या या अवाढव्य मोठ्या विश्वावात पत्रकाराने एक माणूस म्हणून योग्य जबाबदारी पार पाडणं जास्त आवश्यक आहे. त्यामुळे केवळ क्लिकबेट हेडिंग करुन वाचकांची दिशाभूल न करता पत्रकारितेचं नैतिक मूल्य अंगीकारण्यावर त्यांचा भर असतो. त्यामुळे कोरोना संकट काळ असले, विधानसभा, लोकसभा किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा काळ असेल, एकनाथ शिंदे यांचं शिवसेनेतील बंड असेल, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचा न्यायालयीन खटला असेल, भारत-पाकिस्तान युद्धजन्य स्थिती असेल, भारत-चीन सीमेवरील गलवान खोऱ्यातील संघर्ष असेल, दिल्लीच्या सीमेवरील शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, त्यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आलेलं हिंसक वळण असेल, महाराष्ट्रात मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन असेल, मराठा आरक्षणाचे आंदोलन असेल, कष्टकरी आणि शेतकऱ्यांची विविध आंदोलने असतील, विविध सामाजिक आणि राजकीय घटना असतील, ते त्या घटनांचं वृत्तांकन करताना पत्रकारितेच्या नैतिक मुल्यांचं अतिशय काटेकोरपणे पालन करण्याचा प्रयत्न करतात.

चेतन पाटील यांना पत्रकारितेत जवळपास 9 वर्षांचा अनुभव आहे. पत्रकारितेचं पदवी शिक्षण घेत अतानाच त्यांना भिवंडी महापालिका निवडणूक काळात एका पॉलिटीकल पीआर कंपनीसोबत काम केल्याचा अनुभव आहे. त्यानंतर लोकमत, न्यूज 24, जय महाराष्ट्र, आपलं महानगर, न्यूज 18 लोकमत, टीव्ही 9 मराठी अशा नामांकीत वृत्त संस्थांमध्ये काम केल्याचा अनुभव आहे. आपलं महानगरमध्ये काम करत असताना त्यांनी यूट्यूबवर आयपीएलच्या मोसमात महिनाभर विश्लेषणाचे व्हिडीओ बनवले होते. तसेच ते महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन इथेदेखील विविध राजकीय घडामोडींचे विश्लेषण करणारे व्हिडीओ बनवत असतात.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या अनेक बातम्यांचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला आहे. त्यांच्या एका बातमीमुळे धुळे बस स्टॅण्डवर फिरणाऱ्या एका निराधार वृद्ध महिलेला खूप मोठी मदत झाली होती. महाविकास आघाडी सरकारने सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डातील शाळांमध्ये मराठी भाषेचं शिक्षण सक्तीचं केलं होतं. पण कोरोना काळानंतर अचानक या निर्णयावर घुमजाव केल्याचं बघायला मिळालं होतं. त्यावेळी चेतन पाटील यांनी ‘आपुल्याच घरात हाल सोसते मराठी’ या मथळ्याखाली बातमी लाहिली होती. ही बातमी महाराष्ट्र एकीकरण समितीने रिट्विट करत मोठा मुद्दा उपस्थित केला होता. अखेर या मुद्द्यावरुन वातावरण तापल्यानंतर तत्कालीन शालेय शिक्षण मंत्र्यांना यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. निर्णय मागे घेतला नसून काही वर्ष मराठी भाषेचे श्रेणीतून गुण दिले जातील, असं त्यांनी स्पष्ट केलं होतं. जीआर काढताना अधिकाऱ्यांकडून चूक झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं.

चेतन पाटील यांनी लिहिलेल्या बातमीमुळे गडचिरोली येथील सीमाभागातील स्थानिक नागरिकांचा पाण्याचा प्रश्न सुटला होता. त्या भागातील स्थानिकांना पिण्याचं पाणी आणण्यासाठी खूप पायपीट करावी लागत होती. चेतन पाटील यांना स्थानिक पत्रकारांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनी खोलवर सविस्तर विषयाची माहिती गोळा करत बातमी केली होती. त्यांच्या या बातमीची दखल तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे बातमी प्रकाशित केल्यानंतर अवघ्या 15 दिवसांनी त्या भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटल्याची बातमी चेतन पाटील यांनी केली होती.

चेतन पाटील यांनी कल्याणच्या नामांकीत बिर्ला महाविद्यालयातून BMM (Bachelor Of Mass Media in Journalism) म्हणजेच पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं आहे. त्याआधी त्यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण हे कल्याणच्या रॉयल हायस्कूल इथे झालं आहे. शालेय जीवनात त्यांना मराठी, हिंदी आणि गणित विषयाची विशेष गोडी होती. त्यांना लहानपणापासून कविता वाचनाचा छंद होता. त्यांनी अकरावी आणि बारावीचं शिक्षण हे विज्ञान शाखेतून केलं. पण बारावीनंतर त्यांना पत्रकारितेची वाट खुणावू लागली. त्यामुळे त्यांनी कल्याणच्या बिर्ला महाविद्यालयातून पत्रकारितेतून पदवी शिक्षण घेतलं.

महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांनी विविध उपक्रमांमध्ये भाग घेतला आहे. त्यांना नाट्य आणि चित्रपट क्षेत्राविषयी नेहमीच आकर्षण राहिलं आहे. त्यामुळे त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना जलरंग तापी नाट्य संस्थेसोबत अहिराणी आणि मराठी नाटकांमध्ये काम केलं आहे. त्यांनी राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग घेतला आहे. त्यांनी ‘नटसम्राट’ नाटकात केलेल्या बूट पॉलिश करणाऱ्या राजाची भूमिका खूप गाजली होती. त्यावेळी त्यांच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं होतं.

चेतन पाटील यांना कविता लिहिण्याचा आणि त्या सादर करण्याचा देखील छंद आहे. तसेच ज्येष्ठ आणि दिग्गज कवींच्या गाजलेल्या कविता सादर करण्याची देखील त्यांना आवड आहे. चेतन पाटील यांनी लिहिलेल्या ‘भगतसिंग’ कवितेची निवड ही ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कवी कट्टा कार्यक्रमात वाचनासाठी झाली होती. चेतन पाटील यांचं आतापर्यंतचं आयुष्य खूप संघर्षमय आणि खडतर असल्यामुळे ते फार संवेदनशील आहेत. त्यामुळे संवेदनशील बातम्या हाताळताना ते अशा बातम्यांना न्याय देण्याचा पूरेपूर प्रयत्न करतात.आणखी वाचा