Headlines

Prabalgad 17 Years old Girl Boy lost way to home Police helps reach safely; प्रबळगडावर 17 वर्षीय तरुण-तरुणी वाट चुकले, पावसाळ्यात नवख्या पर्यटकांची तारांबळ, पोलीस-स्थानिकांमुळे डोंगरावरुन सुरक्षित खाली


Tourist lost way on Prabal Gad : माची प्रबळगडावर जाण्यासाठी निघालेले १७ वर्षांचा युवक आणि युवती डोंगरातील वाट चुकल्याने अडकले होते. पावसाळ्यात अनोळखी डोंगररांगांमध्ये पूर्वतयारीशिवाय भटकंती करणाऱ्या नवख्या पर्यटकांची तारांबळ उडाली

Prabalgad Couple Lost Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई : सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये भटकंतीसाठी गेलेले १७ वर्षीय दोन पर्यटक प्रबळगड परिसरात वाट चुकल्याने डोंगरात भरकटले. त्यांनी वेळीच ११२ क्रमांकावर मदतीसाठी संपर्क साधला. त्यानंतर पनवेल तालुका पोलिस, स्थानिक ग्रामस्थ, निसर्गमित्र संस्था आणि हेल्प फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी संयुक्त शोध मोहीम राबवून दोघांचीही सुखरूप सुटका केली. रविवारी घडलेल्या या घटनेमुळे पावसाळ्यात अनोळखी डोंगररांगांमध्ये पूर्वतयारीशिवाय भटकंती करणाऱ्या नवख्या पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

प्रबळगडावर जाताना वाट चुकले

माची प्रबळगडावर जाण्यासाठी निघालेले गौरी (१७) आणि उत्कर्ष (१७) डोंगरातील वाट चुकल्याने अडकले होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात येताच त्यांनी मदतीसाठी संपर्क साधला. माहिती मिळताच पनवेल तालुका पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. पनवेल तालुका पोलिस ठाण्याचे बीट मार्शल पोलिस हवालदार अमर भालसिंग आणि प्रदीप पोपटे यांनी घटनास्थळी हालचाली सुरू केल्या.

Maharashtra TimesPune News : दुचाकीवरुन पडल्याने हात फ्रॅक्चर, ऑपरेशनवेळी पुण्यात 28 वर्षीय विवाहितेचा मृत्यू, डॉक्टरांवर निष्काळजीपणाचा आरोप

दोन्ही पर्यटकांना नातेवाईकांकडे सोपवलं

बचावकार्यात माची प्रबळ गावातील स्थानिक रहिवासी नवनाथ पारधी आणि हरिश्चंद्र पारधी, पोलिस अंमलदार, निसर्गमित्र संस्था-पनवेल तसेच हेल्प फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. डोंगरातील पायवाटा, भौगोलिक रचना आणि परिसराची स्थानिकांना असलेली माहिती शोधकार्यात महत्त्वाची ठरली. शोध घेतल्यानंतर दोन्ही पर्यटकांचा ठावठिकाणा लागला आणि त्यांना सुरक्षित डोंगरावरून खाली आणण्यात आले. त्यानंतर दोघांनाही त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

सोशल मीडिया व्हिडिओंमुळे नवखे भटकंतीला

माची प्रबळगड आणि प्रबळगड परिसर निसर्गसौंदर्याने नटलेला असला, तरी सह्याद्रीचा हा भाग आव्हानात्मक आहे. विशेषतः पावसाळ्यात धुके, निसरडे कडे, निसरड्या पायवाटा, पाण्याचे प्रवाह आणि अचानक बदलणारे हवामान यामुळे धोका वाढतो. समाजमाध्यमांवरील व्हिडीओ आणि छायाचित्रे पाहून अनेक नवखे पर्यटक अशा ठिकाणी भटकंतीचे नियोजन करतात. मात्र डोंगराचा अनुभव नसताना, मार्गाची माहिती न घेता किंवा स्थानिक मार्गदर्शकांची मदत न घेता केलेली भटकंती अडचणीची ठरू शकते.

Maharashtra TimesAir India Turbulence : एअर इंडिया विमान टर्ब्युलन्स, दोन्ही वैमानिकांची डोप टेस्ट निगेटिव्ह नाही, सखोल तपास होणार

सुरक्षिततेची काळजी घेण्याचं आवाहन

वाट चुकणे, मोबाइल नेटवर्क खंडित होणे किंवा अंधार पडणे यापैकी एखादी परिस्थिती निर्माण झाल्यास भटकंती धोकादायक ठरू शकते. त्यामुळे सह्याद्रीत भटकंती करताना उत्साहापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य देणे, योग्य नियोजन करणे आवश्यक असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.