Headlines

EPFO Auto Settlement ; EPFO कडून नोकरदारवर्गासाठी आनंदाची बातमी; आता फक्त 2 दिवसांत खात्यात जमा होणार तुमच्या PF ची रक्कम


EPFO ने नोकरदारांना एक आनंदाची बातमी दिली आहे. EPF काढण्याची प्रक्रिया आता अधिकच जलद आणि पारदर्शक होणार आहे. आधी EPF काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना आठवडा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागत होता, आता अगदी दोन दिवसांच्या आत EPF ची रक्कम स्वतःच्या खात्यामध्ये जमा करता येणार आहे.

EPFO Auto Settlement
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
जगण्यासाठी जसे वायू, पाणी आणि अन्न गरजेचं आहे त्याचप्रमाणे खिशात पैसा असणेही एक मूलभूत गरज आहे. कारण आताच्या काळात हवा जरी फुकट असली तरी इतर मूलभूत गरजा मिळवण्यासाठी पैसा मात्र खर्च करावा लागतो. त्यामुळे खिशात पैसे नसतील तर जगणे अशक्यच होऊन जाते. माणसाला गरज कधीही येऊ शकते. पण गरजेवेळी खिशात पैसे असतीलच असे नाही. अशावेळी नोकरदारवर्ग काय करतो? तर आपली जमापुंजी पाहतो. गरज भागेल इतके पैसे जमा केले असतील तर ठीक! नाही तर पैसे उसने घेऊन व्यक्ती कर्जबाजारी होतो. पण… नोकरदारवर्गाकडे PF नावाची एक महत्वाची गोष्ट असते, जी त्यांना अडीअडचणीला कामी येते.

आधीच्या काळात एक पंचायत व्हायची! पैशांची अडचण आली म्हणून एखाद्या कर्मचाऱ्याने EPFO (Employees’ Provident Fund Organisation) कडे PF साठी अर्ज केले तर त्या कर्मचाऱ्याकडे त्याच्या हक्काचे PF चे पैसे यायला आठवडा ते 15 दिवसांचा काळ जायचा. अशावेळी ताबडतोब पैशांची गरज असेल तर कामे अडून राहायची किंवा दुसरा मार्ग पाहावा लागायचा. पण आता तसे अजिबात होणार नाही.

EPF O ने नोकरदारवर्गासाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरून एक नवीन प्रणाली विकसित केली आहे, ज्याच्या साहाय्याने कर्मचाऱ्यांना फक्त 24 ते 48 तासांच्या आत त्यांचा PF मिळवता येणार आहे. EPFO चे सेंट्रल प्रोविडेंट फंड कमिशनर रमेश कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, “नव्या प्रणालीमध्ये आम्ही ऑटो सेटलमेंटवर जास्त भर देत आहोत. 90% कामेही ऑटो सेटलमेंटद्वारेच होतील.” याचा अर्थ की EPF काढण्याच्या प्रक्रियेत आता मानवी हस्तक्षेप कमी होणार आहे आणि परिणामी एक ते दोन दिवसात ऑटो सेटलमेंटच्या माध्यमातून अर्जकर्त्याच्या खात्यात त्याच्या PF चे पैसे जमा होतील.

आता UPI च्या माध्यमातूनही काढता येईल EPF

नोकरदारवर्गासाठी आणखीन एक आनंदाची बातमी म्हणजे आता घरबसल्या UPI च्या माध्यमातूनही तुम्हाला तुमचा EPF काढता येणार आहे. रमेश कृष्णमूर्ती यांना सांगितले की, ” BHIM या App च्या माध्यमातून नोकरदारवर्गाला PF Withdrawal Claim ( PF चे पैसे काढण्यासाठी केलेला अर्ज ) करता येईल आणि दोन दिवसांच्या आतच त्यांच्या UPI ला लिंक असणाऱ्या बँक खात्यात EPF ची रक्कम जमा होईल.” एकंदरीत, जर तुम्हाला UPI च्या माध्यमातून EPF काढायचा असेल तर BHIM या Application च्या माध्यमातून ते करता येईल. ही प्रणाली सुरु होण्यासाठी किमान एक महिना लागेल असे रमेश कृष्णमूर्ती यांचे म्हणणे आहे.

EPFO ने विकसित केलेल्या नव्या प्रणालीत Auto Processing वाढवण्यात आली आहे. तसेच मॅन्युअल व्हेरिफिकेशन कमी केला जात आहे. यामुळे EPF साठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणखीनच पारदर्शक आणि जलद होणार आहे.

टीम मटा ऑनलाइन

लेखकाबद्दलटीम मटा ऑनलाइनमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन हा गेल्या २६ वर्षांपासून महाराष्ट्रातील अग्रगण्य पोर्टल आहे. राजकीय, सामाजिक, आर्थिक, कला, क्रीडा, मनोरंजन, लाइफस्टाइल या विषयावर बातम्या देण्याचा आणि वाचकांना अपडेट ठेवण्याचे काम केले जाते. या टीममधील प्रत्येक पत्रकार हा वाचक हा केंद्र बिंदू मानून त्यांना बित्तमबातमी देण्याचा प्रयत्न करतो.आणखी वाचा