EPFO ने नोकरदारांना एक आनंदाची बातमी दिली आहे. EPF काढण्याची प्रक्रिया आता अधिकच जलद आणि पारदर्शक होणार आहे. आधी EPF काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना आठवडा ते पंधरा दिवसांचा कालावधी लागत होता, आता अगदी दोन दिवसांच्या आत EPF ची रक्कम स्वतःच्या खात्यामध्ये जमा करता येणार आहे.

आधीच्या काळात एक पंचायत व्हायची! पैशांची अडचण आली म्हणून एखाद्या कर्मचाऱ्याने EPFO (Employees’ Provident Fund Organisation) कडे PF साठी अर्ज केले तर त्या कर्मचाऱ्याकडे त्याच्या हक्काचे PF चे पैसे यायला आठवडा ते 15 दिवसांचा काळ जायचा. अशावेळी ताबडतोब पैशांची गरज असेल तर कामे अडून राहायची किंवा दुसरा मार्ग पाहावा लागायचा. पण आता तसे अजिबात होणार नाही.
EPF O ने नोकरदारवर्गासाठी एक आनंदाची बातमी दिली आहे. त्यांनी नवीन तंत्रज्ञान वापरून एक नवीन प्रणाली विकसित केली आहे, ज्याच्या साहाय्याने कर्मचाऱ्यांना फक्त 24 ते 48 तासांच्या आत त्यांचा PF मिळवता येणार आहे. EPFO चे सेंट्रल प्रोविडेंट फंड कमिशनर रमेश कृष्णमूर्ती यांनी सांगितले की, “नव्या प्रणालीमध्ये आम्ही ऑटो सेटलमेंटवर जास्त भर देत आहोत. 90% कामेही ऑटो सेटलमेंटद्वारेच होतील.” याचा अर्थ की EPF काढण्याच्या प्रक्रियेत आता मानवी हस्तक्षेप कमी होणार आहे आणि परिणामी एक ते दोन दिवसात ऑटो सेटलमेंटच्या माध्यमातून अर्जकर्त्याच्या खात्यात त्याच्या PF चे पैसे जमा होतील.
आता UPI च्या माध्यमातूनही काढता येईल EPF
नोकरदारवर्गासाठी आणखीन एक आनंदाची बातमी म्हणजे आता घरबसल्या UPI च्या माध्यमातूनही तुम्हाला तुमचा EPF काढता येणार आहे. रमेश कृष्णमूर्ती यांना सांगितले की, ” BHIM या App च्या माध्यमातून नोकरदारवर्गाला PF Withdrawal Claim ( PF चे पैसे काढण्यासाठी केलेला अर्ज ) करता येईल आणि दोन दिवसांच्या आतच त्यांच्या UPI ला लिंक असणाऱ्या बँक खात्यात EPF ची रक्कम जमा होईल.” एकंदरीत, जर तुम्हाला UPI च्या माध्यमातून EPF काढायचा असेल तर BHIM या Application च्या माध्यमातून ते करता येईल. ही प्रणाली सुरु होण्यासाठी किमान एक महिना लागेल असे रमेश कृष्णमूर्ती यांचे म्हणणे आहे.
EPFO ने विकसित केलेल्या नव्या प्रणालीत Auto Processing वाढवण्यात आली आहे. तसेच मॅन्युअल व्हेरिफिकेशन कमी केला जात आहे. यामुळे EPF साठी अर्ज करण्याची प्रक्रिया आणखीनच पारदर्शक आणि जलद होणार आहे.

