Headlines

Dharashiv Corporators Switch To Shinde Sena; Political Drama In Maharashtra


धाराशिव शहराच्या राजकारणात नगरसेवकांच्या पक्षांतरावरून मोठा राजकीय भूकंप झाला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या नगरसेवकांना आपल्या गोटात खेचण्यासाठी महायुतीमधील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातच तीव्र चढाओढ पाहायला मिळत आहे. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील

.

इंदापुरातून नगरसेवकांचा ‘यू-टर्न’; असा घडला राजकीय ड्रामा

ठाकरे गटाच्या नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्यासाठी हालचाली सुरू होत्या. मल्हार पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथक या नगरसेवकांना घेऊन मुंबईच्या दिशेने निघाले होते. हे पथक पुणे जिल्ह्यातील इंदापूरपर्यंत पोहोचले असता नगरसेवकांनी अचानक यू-टर्न घेतला आणि ते मुंबईऐवजी पुन्हा धाराशिवला परतले. धाराशिवला परतल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांनी सूत्रे हाती घेत या नगरसेवकांना थेट ठाण्यात नेले. तेथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत धाराशिव नगर परिषदेच्या नगरसेवकांचा शिवसेनेत पक्षप्रवेश पार पडला.

चार नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश

उपलब्ध माहितीनुसार, धाराशिव नगर परिषदेतील उद्धव ठाकरे गटाच्या चार नगरसेवकांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. या प्रवेशानंतर स्थानिक पातळीवर ठाकरे गटाला आणखी एक राजकीय धक्का बसला आहे. ओमराजे निंबाळकर यांनी स्वतः काही काळापूर्वी उद्धव ठाकरे गटाला सोडचिठ्ठी देत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यातील स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही पक्षांतराचे सत्र सुरू झाले. आता नगरसेवकांच्या प्रवेशामुळे हे राजकीय समीकरण आणखी बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कळंबनंतर धाराशिवमध्येही भाजपचा प्रयत्न?

धाराशिव जिल्ह्यातील कळंब नगर परिषदेत उद्धव ठाकरे गटातील दहा नगरसेवक यापूर्वीच भाजपमध्ये दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे धाराशिव शहरातील नगरसेवकांनाही भाजपच्या गोटात आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची चर्चा होती. या पार्श्वभूमीवर धाराशिव शहरातील नगरसेवकांचे पक्षांतर हा भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेमधील स्थानिक राजकीय वर्चस्वाचा भाग असल्याचे मानले जात आहे. भाजपच्या दिशेने निघालेले नगरसेवक अखेर शिंदेसेनेत गेल्याने धाराशिवच्या स्थानिक राजकारणात कोणाचा प्रभाव वाढणार, याची उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, या पक्षांतरामागे मोठ्या आर्थिक व्यवहाराची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू असल्याचेही दावे केले जात आहेत. नगरसेवकांना कोट्यवधी रुपयांची बोली लावून फोडण्यात येत असल्याची कुजबुज असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, या कथित आर्थिक व्यवहाराबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

पक्षांतरानंतर मतदारांचा संताप; ‘एक कोटींचा गद्दार, आमचे मत परत द्या!’

नगरसेवकांच्या पक्षांतरानंतर धाराशिवमध्ये या राजकीय घडामोडीला वेगळे वळण मिळाले आहे. काही नगरसेवकांच्या परिसरातच त्यांच्या विरोधात बॅनर लावण्यात आले आहेत. धाराशिव शहरातील समता कॉलनी परिसरात नगरसेवक संतोष घाडगे यांच्या घरासमोर संतप्त आशयाचे बॅनर झळकले. त्यामध्ये ‘एक खोका, मतदाराला धोका’, ‘आमचे मत आम्हाला परत द्या’, ‘हा शिक्का पुसला जाणार नाही’, ‘एक कोटींचा गद्दार’ अशा स्वरूपाचा मजकूर असल्याचे समोर आले आहे. या बॅनरमधून पक्षांतर केलेल्या नगरसेवकांविरोधात मतदारांमध्ये नाराजी असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ज्या मतदारांनी निवडून दिले, त्यांच्याच परिसरात नगरसेवकाविरोधात अशा प्रकारची बॅनरबाजी झाल्याने पक्षांतराच्या राजकारणावर प्रश्न उपस्थित झाले आहेत. मात्र, हे बॅनर नेमके कोणी लावले, याची अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

धाराशिव शहरातील समता कॉलनी परिसरात नगरसेवक संतोष घाडगे यांच्या घरासमोर संतप्त आशयाचे बॅनर झळकले.

धाराशिव शहरातील समता कॉलनी परिसरात नगरसेवक संतोष घाडगे यांच्या घरासमोर संतप्त आशयाचे बॅनर झळकले.

‘ऑपरेशन लोटस 2.0’ विरुद्ध ‘ऑपरेशन टायगर’?

धाराशिवमधील या राजकीय हालचालींना आता वेगवेगळी राजकीय नावेही दिली जात आहेत. उद्धव ठाकरे गटातील नगरसेवकांना भाजपमध्ये आणण्याच्या प्रयत्नाला स्थानिक राजकीय वर्तुळात ‘ऑपरेशन लोटस 2.0’ असे संबोधले जात होते. मात्र, भाजपकडे जाण्याच्या तयारीतील नगरसेवक अखेर शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झाल्याने ‘ऑपरेशन टायगर’ने ऑपरेशन लोटसला ब्रेक लावला, अशी चर्चा सुरू झाली आहे. या चर्चेची अधिकृत पुष्टी मात्र संबंधित पक्षांकडून झालेली नाही.

अजून कोणते नगरसेवक कोणाच्या गोटात जाणार?

धाराशिव नगर परिषदेतील राजकीय समीकरण अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. उद्धव ठाकरे गटाकडे आणखी काही नगरसेवक असल्याची चर्चा असून, दुसरीकडे भाजप आणि शिंदेसेनेकडूनही स्थानिक पातळीवर संपर्क सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी कोणते नगरसेवक पक्षांतर करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेषतः नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या पक्षांतरांचा थेट परिणाम स्थानिक राजकीय समीकरणांवर होऊ शकतो. सध्या मात्र नगरसेवकांची पळवापळवी, भाजपकडून शिंदेसेनेकडे झालेला राजकीय यू-टर्न आणि त्यानंतर मतदारांनी केलेली बॅनरबाजी यामुळे धाराशिवच्या राजकारणात वातावरण चांगलेच तापले आहे. आगामी काळात या राजकीय संघर्षाचा पुढचा अंक नेमका कोणता असेल आणि उद्धव ठाकरे गटातील आणखी किती नगरसेवक गळाला लागतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

हेही वाचा…

वडेट्टीवारांच्या आरोपावर सुप्रिया सुळेंचा पलटवार:म्हणाल्या- माझ्याकडे OBC प्रमाणपत्र नाही; संसदेत आम्ही काँग्रेसला डिफेंड करतो, तरीही आम्हालाच टार्गेट का?

मराठा आरक्षणाच्या वादादरम्यान काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या एका विधानामुळे महाविकास आघाडीत नवा राजकीय वाद पेटला आहे. “राज्यातील बहुतांश मराठा नेत्यांनी ओबीसी प्रमाणपत्रे घेतली असून सुप्रिया सुळे यांच्याकडेही ओबीसी दाखला आहे,” असा खळबळजनक दावा वडेट्टीवार यांनी केला होता. या आरोपांवर आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी अत्यंत तीव्र शब्दांत प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “महाराष्ट्र काँग्रेस रोज उठून मलाच का टार्गेट करत आहे?” असा थेट सवाल करत त्यांनी यावर तीव्र नाराजी आणि दुःख व्यक्त केले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत