![]()
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून मान्सूनचा जोर काहीसा कमी झाला असला, तरी पावसाच्या सरींचे आगमन कायम आहे. राज्यातील अनेक भागांत पावसाने उघडीप दिली असली, तरी काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस सुरू आहे. दरम्यान, आज, 27 ऑगस्ट रोजी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, आज नंदूरबार, धुळे, जळगाव, नाशिक, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर आणि नांदेड या १६ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या जिल्ह्यांतील नागरिकांनी विशेषतः दुपारनंतरच्या काळात आकाशातील बदलांकडे लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात पावसाचा जोर का कमी झाला? सध्या मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सरकला आहे. दक्षिण उत्तर प्रदेश आणि लगतच्या मध्य प्रदेशात कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय आहे. या प्रणालीच्या आसपास समुद्रसपाटीपासून सुमारे ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनचा आस जम्मूपासून डेहराडून, शाहजहानपूर, सक्रिय कमी दाब क्षेत्राचे केंद्र, रांची आणि दिघा मार्गे वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे. याशिवाय दक्षिण मध्य महाराष्ट्रात समुद्रसपाटीपासून सुमारे ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. या हवामान प्रणालींच्या प्रभावामुळे राज्यात काही भागांत पावसाच्या सरी सुरू राहण्याची शक्यता आहे. मात्र, मान्सूनचा मुख्य आस महाराष्ट्राच्या तुलनेने उत्तरेकडे सरकल्याने राज्यात सध्या सर्वदूर मुसळधार पाऊस होण्याऐवजी तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस आणि काही भागांत मेघगर्जनेसह सरी असे चित्र पाहायला मिळत आहे. या 16 जिल्ह्यांत विजांसह पावसाचा अंदाज आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे. या जिल्ह्यांमध्ये सर्वच ठिकाणी पाऊस पडेल असे नाही. तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांसह पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. उर्वरित महाराष्ट्रात काय स्थिती? राज्याच्या इतर भागांत आज प्रामुख्याने ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी अधूनमधून ऊन पडणे आणि पुन्हा ढग जमा होणे, असे वातावरण पाहायला मिळू शकते. या भागांत हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. त्यामुळे कोकण, विदर्भ आणि इतर भागांमध्ये सध्या सर्वदूर जोरदार पाऊस पडण्याची शक्यता नसली, तरी स्थानिक वातावरणानुसार काही ठिकाणी पावसाची हजेरी लागू शकते. राज्यात अनेक ठिकाणी पावसाने उघडीप दिली असली तरी काही भागांत गेल्या २४ तासांत जोरदार सरी झाल्या आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही आणि जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथे प्रत्येकी ५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यावरून राज्यात पावसाचे वितरण सध्या असमान असल्याचे दिसून येते. काही भागांत पावसाने विश्रांती घेतली आहे, तर काही ठिकाणी अल्पावधीत जोरदार सरी कोसळत आहेत. तापमानातही चढ-उतार पावसाच्या उघडिपीमुळे काही भागांत तापमानात वाढ झाली आहे. बुधवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत मालेगाव आणि भंडारा येथे राज्यातील सर्वाधिक ३२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. याउलट, थंड हवामानासाठी प्रसिद्ध असलेल्या महाबळेश्वर येथे राज्यातील नीचांकी १७.५ अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. त्यामुळे राज्यातील विविध भागांमध्ये तापमान आणि हवामानामध्ये मोठी तफावत कायम आहे. पावसाचा जोर पूर्णपणे ओसरलेला नाही मान्सूनचा जोर काहीसा कमी झाला असला तरी राज्यातून पावसाने पूर्णपणे माघार घेतलेली नाही. कमी दाबाचे क्षेत्र, चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि स्थानिक वातावरणाच्या प्रभावामुळे पुढील काळातही तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी सुरू राहण्याची शक्यता आहे. विशेषतः आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. मेघगर्जना सुरू असताना मोकळ्या मैदानात, झाडाखाली किंवा विद्युत खांबाजवळ थांबणे टाळावे. शेतकऱ्यांनीही विजांचा कडकडाट होत असल्यास शेतातील कामे काही काळ थांबवून सुरक्षित ठिकाणी आसरा घेणे योग्य ठरेल. हेही वाचा… झिरवळांचा विद्यार्थ्यांना सल्ला ‘खाऊन-पिऊन आंदोलन करा:आदिवासी विद्यार्थ्यांचं 14 दिवसांपासून उपोषण सुरू; लेखी आश्वासनावर विद्यार्थी ठाम पुण्यातील मांजरी परिसरात विविध मागण्यांसाठी आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि उपोषण गेल्या 14 दिवसांपासून सुरू आहे. आपल्या 14 प्रमुख मागण्यांसाठी विद्यार्थी आंदोलन करत असून, काही विद्यार्थी आमरण उपोषणाला बसले आहेत. मागण्या मान्य झाल्याचे लेखी आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. दरम्यान, आंदोलनस्थळी भेट देताना विधानसभेचे उपाध्यक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी केलेल्या वक्तव्याची सध्या चर्चा सुरू आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
राज्यात 16 जिल्ह्यांना विजांसह सरींचा इशारा:मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
