Mother Excluded From Wedding: एका कर्मचाऱ्याने आई दिसायला कुरूप असल्यामुळे तिला आपल्या लग्नापासून दूर ठेवलं. हा प्रकार जेव्हा कंपनीच्या बॉसला समजला तेव्हा त्यानं या कर्मचाऱ्याला नोकरीवरून काढून टाकलं. म्हणाला, जो आपल्या आईचा आदर करत नाही तो कंपनीत नोकरी करू शकत नाही.

आईला लग्नात का बोलावलं नाही?
SCMP ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना चीनमधील हेनान प्रांतात घडली. हेनान कुआंगशान क्रेन कंपनीचे अध्यक्ष कुई पेइजुन हे आपल्या एका कर्मचाऱ्याच्या लग्नात शुभेच्छा देण्यासाठी गेले होते.
मात्र, त्यावेळी त्यांना एक खूपच विचित्र गोष्ट दिसली. नवरदेवाची आई लग्नसमारंभात कुठेच दिसत नव्हती. तिला दूर एका कोपऱ्यात बसवण्यात आलं होतं. अर्थात, ही गोष्ट कुई पेइजुन यांना फारच विचित्र वाटली. त्यामुळे त्यांनी याबाबत नवरदेवाकडे विचारणा केली. त्यावेळी त्यानं अत्यंत धक्कादायक उत्तर दिलं. “माझी विधवा आई दिसायला फारच कुरूप आहे, त्यामुळे तिला दूर ठेवलं आहे,” असं तो म्हणाला. हे कारण ऐकून सीईओ संतापले आणि त्यांनी त्याला लगेचच नोकरीवरून काढून टाकलं. त्यानंतर त्यांनी त्या कर्मचाऱ्याच्या आईलाच आपल्या कंपनीत नोकरी दिली. “जो मुलगा आपल्या आईचा आदर करत नाही, त्याला माझ्या कंपनीत स्थान नाही,” अशी भूमिका त्यांनी घेतली.
(फोटो सौजन्य – AI25.Studio AI GENERATIVE/pexels.com)
नेटकरी काय म्हणताहेत?
हे प्रकरण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलं आहे. या प्रकरणावर नेटकरी संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. काहींच्या मते, कंपनीच्या अध्यक्षांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. तर काहींनी या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्यात हस्तक्षेप करण्याचा अधिकार बॉसला नसल्याचं काही जणांचं मत आहे. असो, अध्यक्षांच्या जागी तुम्ही असता, तर कोणता निर्णय घेतला असता? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा.
(फोटो सौजन्य – Vitaly Gariev/pexels.com)
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

