Bacchu Kadu Joins Shivsena: कधीकाळी ‘प्रहार’च्या माध्यमातून स्वतंत्र अस्तित्व निर्माण करणारा हा आक्रमक नेता आता अधिकृतपणे धनुष्यबाण खांद्यावर घेऊन मैदानात उतरल्याने विदर्भाच्या, विशेषत: अमरावतीच्या राजकारणात नव्या वादांना आणि संघर्षाला तोंड फुटले आहे.

बच्चू कडू आणि एकनाथ शिंदे यांचे सख्य नवे नाही. उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री राहिलेले कडू, महाविकास आघाडीत फूट पडली तेव्हा शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे होते. गुवाहाटीच्या प्रवासापासून ते आजपर्यंत कडू यांनी शिंदेंची साथ सोडली नाही. २०२४च्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभव पत्करावा लागल्यानंतर कडू यांचे राजकीय भवितव्य काय, असा प्रश्न विचारला जात होता. मात्र, शिंदे यांनी त्यांना विधान परिषदेच्या रिंगणात उतरवून केवळ त्यांचे पुनर्वसन केले नाही, तर विदर्भात शिवसेनेचा पाय घट्ट रोवण्यासाठी सक्षम प्यादा चालवला आहे.
Raj Thackeray: सगळं वाटोळं झालंय ते महाराष्ट्रातल्या राजकारण्यांमुळे! राज्याच्या सध्याच्या परिस्थितीवर राज ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया
बच्चू कडू यांचा शिवसेना प्रवेश हा केवळ एका नेत्याचे पक्षांतर नाही, तर ती महायुतीमधील एका नवीन संघर्षाची नांदी ठरण्याची शक्यता आहे. कडू यांनी आपल्या राजकीय प्रवासात अनेकदा भाजपवर आणि खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली आहे. आज ते जरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंध चांगले असल्याचे सांगत असले, तरी भाजपचे स्थानिक नेते ते जुने शल्य विसरलेले नाहीत. कडू यांच्या ‘हिंदुत्वा’च्या भूमिकेवरून भाजपने नेहमीच त्यांना लक्ष्य केले आहे. ते महायुतीत आल्यावर भाजपच्या नेत्यांनी ‘आता तरी त्यांनी लव्ह जिहादसारख्या मुद्द्यांवर महायुतीची साथ द्यावी’, असे टोमणे मारत आपली नाराजी स्पष्ट केली आहे.
शिंदेंची खेळी यशस्वी ठरेल?
विदर्भात भाजप आणि काँग्रेसच्या तुलनेत शिवसेनेची ताकद मर्यादित आहे. अशा स्थितीत दिव्यांग, शेतकरी आणि कष्टकऱ्यांचा पाठीराखा मानल्या जाणाऱ्या बच्चू कडू यांना सोबत घेऊन शिंदेंनी एका दगडात दोन पक्षी मारले आहेत. बच्चू कडू यांच्या आक्रमक कार्यशैलीचा फायदा शिवसेनेला विदर्भातील तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी होईल. कडू यांची स्वत:ची एक हक्काची ‘व्होट बँक’ आहे, जी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेसाठी निर्णायक ठरू शकते, असे बोलले जात आहे.
IPS Transfer : राज्य पोलीस दलात मोठे फेरबदल, महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला 21 बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या
कडू – राणा… जुने वैर शमणार ?
बच्चू कडू यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांचे राजकीय वैरी आमदार रवी राणा यांनी अनपेक्षित स्वागत केले. अमरावती जिल्ह्यात महायुतीचे सात आमदार असले तरी, जिल्ह्याला अद्याप मंत्रिमंडळात प्रतिनिधित्व मिळालेले नाही. युवा स्वाभिमानीचे आमदार रवी राणा हे स्वत:ला मुख्यमंत्री फडणवीसांचे निकटवर्तीय मानतात आणि मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. दुसरीकडे, बच्चू कडू यांना मंत्रिपदाचा शब्द मिळाल्याची चर्चा आहे. जर कडू यांना मंत्रिपद मिळाले, तर भाजप आणि रवी राणा यांची भूमिका काय असेल? या दोन वरिष्ठ नेत्यांमधील जुने वैर आता महायुतीच्या छताखाली शमणार, की हा संघर्ष अधिक तीव्र होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

