Headlines

Morocco storms into the quarter-finals.


कॅनडाचे स्वप्न उद्ध्वस्त, मोरोक्कोचा 3-0 गोलफरकाने वर्चस्वपूर्ण विजय

वृत्तसंस्था, ह्युस्टन : मोरोक्कोच्या संघाने पुन्हा एकदा विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे आणि प्रशिक्षक मोहम्मद ओआहबी यांना त्यांच्या संघाने फुटबॉलमधील दिग्गज संघांच्या पंक्तीत आपले स्थान निर्माण केले आहे, असा विश्वास वाटत आहे. शनिवारी झालेल्या उपउपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात अझेडिन ओनाहीने दोन गोल करत मोरोक्कोला कॅनडाविऊद्ध 3-0 असा विजय मिळवून दिला.

सामन्यात 50 व्या मिनिटापर्यंत दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आले होते. त्यानंतर, अश्रफ हकिमीने हाणलेल्या फ्री-किकवर ओनाहीने ‘बॉक्स’च्या बाहेरून उजव्या पायाने फटका मारला. खेळाडूंची गर्दी भेदत चेंडू गोलपोस्टच्या उजव्या कोपऱ्यात गेल्यावर मोरोक्कोने 1-0 अशी आघाडी घेतली. 82 व्या मिनिटाला ब्राहिम डियाझच्या पासवर ‘बॉक्स’च्या मध्यभागातून उजव्या पायाने चेंडू फटकावून गोल करत ओनाहीने संघाची आघाडी 2-0 अशी वाढवली. ‘स्टॉपेज टाइम’च्या शेवटच्या मिनिटात सुफियान रहिमीने आणखी एक गोल केला.

या पराभवामुळे विश्वचषकाचे सहयजमान असलेल्या कॅनडाच्या ऐतिहासिक प्रवासाचा अंत झाला आहे. कॅनडाने दक्षिण आफ्रिकेचा 1-0 असा पराभव करून आपला पहिलावहिला बाद फेरीचा सामना जिंकला होता आणि त्या जोरावर ते शनिवारच्या सामन्यापर्यंत पोहोचले होते. या देशाची ही केवळ तिसऱ्यांदा विश्वचषकात खेळण्याची खेप होती आणि त्यांच्या या कामगिरीने संपूर्ण देशावर भुरळ घातली. विशेष म्हणजे हा देश फुटबॉलपेक्षा हॉकीमध्ये अधिक रस घेणारा मानला जातो.

सामन्याच्या उत्तरार्धात कॅनडाला गोल करण्याच्या काही संधी मिळाल्या होत्या. 78 व्या मिनिटाला जोनाथन डेव्हिडला ‘बॉक्स’च्या बाहेरून फ्री-किक मिळाली, परंतु त्याचा फटका क्रॉसबारच्या वरून गेला. त्यानंतर लगेचच ताजोन बुकाननने 30 यार्डांवरून मारलेला फटका गोलरक्षक बोनूने हवेत झेप घेत अडवला. बोनूने या सामन्यात तीन महत्त्वपूर्ण बचाव केले.

दोन्ही संघांना मिळून आठ पिवळी कार्डे

हा सामना मागील विश्वचषकातील लढतीची पुनरावृत्ती होता. तेव्हा गट फेरीत मोरोक्कोने कॅनडाचा 2-1 असा पराभव केला होता. त्यानंतर मोरोक्कोने स्पर्धेत चौथा क्रमांक पटकावला होता. हा सामना अत्यंत शारीरिक संघर्षाचा होता आणि यात एकूण आठ पिवळी कार्डे दाखवण्यात आली. दोन्ही संघांना प्रत्येकी चार पिवळी कार्डे मिळाली. 40 व्या मिनिटाला हकिमी आणि कॅनडाच्या रिची लारिया यांना पिवळी कार्डे देण्यात आली. हकिमीने लारियाला धक्का देऊन खाली पाडले आणि त्यानंतर लारियानेही त्याला ढकलले, ज्यामुळे त्यांच्यात किरकोळ बाचाबाची झाली. मोरोक्कोचा मिडफील्डर इस्माईल सायबारी हा दुखापतीमुळे 22 व्या मिनिटाला मैदानाबाहेर गेला.

दुसऱ्यांदा उपांत्यपूर्व फेरी गाठणारा मोरोक्को पहिला आफ्रिकी देश

या विजयामुळे एकापेक्षा जास्त वेळा उपांत्यपूर्व फेरीत पोहोचणारा मोरोक्को हा पहिला आफ्रिकन देश ठरला आहे. 2022 मध्ये उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला आफ्रिकन संघ बनल्यानंतर मोरोक्कोची अंतिम आठ संघांमधील ही सलग दुसरी उपस्थिती आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत