Thane News:गणेशोत्सव काहीच दिवसांवर आलेला असताना कोकणात जाणाऱ्या प्रत्येकाला तिकिटांसाठी खुप त्रास सहन करावा लागलत आहे.अशातच गावी जाणाऱ्यांना एसटीच्या ठाणे विभागाने २,७५८ गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

गणेशोत्सव अवघ्या दोन आठवड्यांवर
गणेशोत्सव अवघ्या दोन आठवड्यांवर आला असून, सर्वत्र तयारीची लगबग सुरू आहे. गणपतीच्या आरासासाठी लागणाऱ्या सजावटीच्या साहित्यांनी बाजारपेठा सजल्या असून, खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होत आहे. गणपतीचे आगमन कधी होते, याची प्रत्येकाला आतुरता लागली आहे. शहरांमध्ये नोकरी, व्यवसायानिमित्त स्थायिक झालेले अनेक नागरिक दरवर्षी कुटुंबासह गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणातील मूळ गावी जातात.
तिकिटांच्या दरांत भरमसाट वाढ
त्यामुळे या काळात रेल्वेगाड्या आधीच हाउसफुल्ल होतात. रेल्वेचे तिकीट न मिळाल्यास नागरिकांना प्रवासासाठी खासगी ट्रॅव्हल्स बसचा पर्याय स्वीकारावा लागतो. मात्र, खासगी बसच्या तिकिटांचे अव्वाच्या सव्वा दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडत नाहीत. त्यात गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत खासगी बसचालक तिकिटांच्या दरांत भरमसाट वाढ करतात.
२ हजार ७५८ बसगाड्यांचे नियोजन
त्यामुळे प्रवाशांना दुहेरी कोंडीचा सामना करावा लागतो. प्रवाशांची ही गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त जादा बस सोडण्यात येतात. यंदाही एसटीच्या ठाणे विभागाने कोकणात जाणाऱ्या नागरिकांसाठी एकूण २ हजार ७५८ बसगाड्यांचे नियोजन केले आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
९ ते १३ सप्टेंबर या कालावधीत या ठिकाणांहून बस सोडण्यात येणार
९ ते १३ सप्टेंबर या कालावधीत भांडुप, मुलुंड, ठाणे, कल्याण, विठ्ठलवाडी, मिरा-भाईंदर, बोरीवली आदी ठिकाणांहून कोकणातील विविध मार्गांवर बस सोडण्यात येणार आहेत. आतापर्यंत ३४० बसचे ग्रुप बुकिंग झाले असून, ३०० हून अधिक बस पूर्ण आरक्षित झाल्या आहेत.गेल्या वर्षी गणेशोत्सवानिमित्त २ हजार ६३३ बसगाड्यांचे नियोजन करण्यात आले होते. त्या तुलनेत यंदा बसगाड्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली आहे.
ग्रुप बुकिंगसाठी ५५ आसानी बसला प्राधान्य
काही कारणास्तव ग्रुप बुकिंगसाठी ५५ आसनी बस देण्याची सूचना एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विभागांना देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे सध्या ठाणे विभागात ५५ पेक्षा कमी आसने असलेल्या बसचे ग्रुप बुकिंग थांबवण्यात आले आहे. ग्रुप बुकिंगसाठी प्रवासी आल्यास त्यांना ५५ आसनी बसचे बुकिंग करण्याविषयी एसटीच्या अधिकाऱ्यांकडून विनंती केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

