Headlines

Nepal Flood: 50 कोटींचं सोनं, अनेक खोक्यांमध्ये रोकड अन् चांदी; नेपाळच्या पुरात सापडलेला खनिजा कोणाचा?


नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात ९०० पेक्षा अधिक जणांचा बळी गेला आहे. अद्याप साडे तीन हजारांहून अधिक जण बेपत्ता आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

nepal cash found
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
काठमांडू: नेपाळच्या भोटेकाशी नदीला आलेल्या भीषण पुरामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. पुराचं पाणी नुवाकोट जिल्ह्यातील त्रिशुली परिसरात असलेल्या कृषी विकास बँकेच्या शाखेत शिरलं. त्यामुळे बँकेचा पूर्ण परिसर पाण्याखाली गेला. बऱ्याच दिवसांनंतर परिस्थिती सामान्य झाल्यावर बँकेत असलेली कोट्यवधींची संपत्ती सुरक्षित काढण्यासाठी मदत आणि बचाव कार्य राबवण्यात आलं. याच दरम्यान जवळपास ५० कोटी नेपाळी रुपये किमतीचं सोनं सापडलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आठवड्यात आलेल्या पुराचा कृषी विकास बँकेच्या त्रिशुली-ढुंगे शाखेला फटका बसला. पाणी आणि चिखलात असलेल्या बँकेच्या लॉकर आणि अन्य भागांपर्यंत पोहोचणं अतिशय जिकरीचं होतं. त्यानंतरही पोलीस आणि संबंधित पथकांनी जवळपास ८ तास सलग अभियान राबवून बँकेच्या आतील सोनं, चांदी आणि रोकड सुरक्षित बाहेर काढली.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, बचाव कार्यादरम्यान जवळपास ५० कोटी नेपाळी रुपये मूल्याचं सोनं, दीड कोटी नेपाळी रुपयांची रोकड, चांदी आणि अन्य मौल्यवान वस्तू सापडल्या. याशिवाय बँकेची महत्त्वपूर्ण कागदपत्रं सुरक्षित ठिकाणी नेण्यात आली.

भोटेकाशी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. पाण्याच्या प्रवाहामुळे रस्ते आणि आसपासच्या भागांचं नुकसान झालं. अनेक ठिकाणी पुराच्या पाण्याचा निचरा अद्याप झालेला नाही. पाणी आणि चिखलामुळे मदत आणि बचाव कार्यात अडथळे येत आहेत. या दरम्यान त्रिशुली बँक शाखेत ठेवण्यात आलेली कोट्यवधींची संपत्ती सुरक्षित बाहेर काढणं प्रशासनासाठी आव्हानात्मक होतं.

बँक शाखा पाण्यात बुडाल्यानं आत ठेवण्यात आलेली रोकड, सोनं आणि महत्त्वाच्या दस्तावेजांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला होता. बचाव दलानं जोखीम पत्करुन आत अभियान राबवत मौल्यवान वस्तू सुरक्षित बाहेर काढल्या. जवळपास ८ तास अभियान राबवण्यात आलं. कोट्यवधींची संपत्ती सुरक्षित सापडल्यावर बँक अधिकारी आणि प्रशासनानं सुटकेचा निश्वास सोडला.

नेपाळमध्ये आलेल्या भीषण पुरात ९३९ जणांचा मृत्यू झाला आहे. तर चीनच्या तिबेटमध्ये १६ जण दगावले आहेत. नेपाळमध्ये ३ हजार ९२५ जण बेपत्ता झाले आहेत. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. नेपाळमध्ये ५९२ परदेशी नागरिक बेपत्ता आहेत.