Headlines

वेंगुर्लेत 31 ऑगस्टला आमसभा; नागरिकांनी समस्या व तक्रारींसह उपस्थित राहण्याचे आवाहन


वेंगुर्ले : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील वेंगुर्ले तालुक्यातील विविध विकासकामे, सेवा-सुविधांमधील अडचणी आणि नागरिकांच्या प्रलंबित समस्या मार्गी लावण्यासाठी सोमवार, 31 ऑगस्ट रोजी सकाळी 10.30 वाजता वेंगुर्ले कॅम्प येथील मधुसूदन कालेलकर सभागृहात आमसभेचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या समस्या व तक्रारी लेखी निवेदनासह संबंधित कागदपत्रे घेऊन सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य संजय गावडे यांनी केले आहे.

या आमसभेत वेंगुर्ले शहरासह तालुक्यातील विविध भागांतील विकासकामे आणि मूलभूत सेवा-सुविधांशी संबंधित प्रश्नांवर चर्चा होणार आहे. अनेक वर्षांपासून रखडलेले भुयारी वीजवाहिनीचे काम, वीज कंपनीकडून आकारण्यात येणारी भरमसाठ अथवा चुकीची वीजबिले, जुने मीटर योग्य स्थितीत असतानाही स्मार्ट मीटर बसविण्याबाबतच्या तक्रारी तसेच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे घरगुती ग्राहक आणि व्यापाऱ्यांचे होणारे नुकसान याबाबत नागरिकांना आपले म्हणणे मांडता येणार आहे.

शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचे प्रश्न, पंचनामे व केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊनही मदत न मिळणे, पीक विम्याशी संबंधित तक्रारी यावरही आमसभेत चर्चा होणार आहे. तसेच शहर व तालुक्यातील खड्डेमय रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता, स्ट्रीटलाईट, ग्रामपंचायतींच्या मूलभूत सुविधा यासह विविध प्रश्न नागरिकांना मांडता येतील.

याशिवाय कष्टकरी व बांधकाम कामगारांची नोंदणी, विविध शासकीय योजनांचे लाभ, आरोग्य, महिला व बालविकास, शिक्षण, समाजकल्याण, अन्न व नागरी पुरवठा विभाग तसेच विविध शासकीय कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या कामांबाबतही नागरिकांना तक्रारी मांडता येणार आहेत.

अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न, वारंवार पाठपुरावा करूनही मार्गी न लागलेल्या समस्या तसेच कोणत्याही शासकीय विभागाकडून अन्याय होत असल्याची भावना असलेल्या नागरिकांनी निवेदन व संबंधित कागदपत्रांसह आमसभेला उपस्थित राहावे, असे आवाहन संजय गावडे यांनी केले आहे.

सभेपूर्वी नागरिकांनी आपली तक्रार किंवा निवेदन आमसभा आयोजक गटविकास अधिकारी यांच्याकडे सादर करावे. सभा सुरू झाल्यानंतर आयोजकांकडून सूचना मिळाल्यावर नागरिकांनी आपले प्रश्न सभेत मांडावेत, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत