Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Mountain : छत्रपती संभाजीनगर येथील तिसगाव परिसरात असणाऱ्या खवड्या डोंगरावरुन खाली पडून तीन जणांचा मृत्यू झाला.

आईनेसुद्धा दरीत उडी मारली
याविषयी माहिती अशी, की तिसगाव परिसरातील धुळे-सोलापूर महामार्गाच्या जवळीलखवड्या डोंगरावर शुक्रवारी सकाळी दहाच्या सुमारास कुणाल चांदगुडे आत्महत्या करण्यासाठी आला होता. त्यावेळी त्याचे आई-वडीलही त्याच्या मागे खवड्या डोंगरावर चढले. ‘आत्महत्या करू नको,’ अशी त्यांनी अनेकदा विनवणी केली. मात्र, कुणाल डोंगराच्या काठावर उभा राहून ‘एकच सोल्यूशन आहे; आता काही सोल्यूशन नाही’ असे म्हणत होता. सकाळी दहा ते दुपारी एका वाजेपर्यंत कुणाल डोंगराच्या काठावर उभा होता. त्याला वाचवण्यासाठी त्याचे आई-वडील व परिसरातील नागरिक, पोलिस, अग्निशमन विभाग प्रयत्न करीत होते. त्यावेळी कुणालचे वडील तो ऐकत नसल्याचे पाहून त्याला पकडण्यासाठी त्याच्या जवळ गेले असता दोघांचाही तोल जाऊन दरीत पडले हे दृश्य पाहून कुणालच्या आईनेसुद्धा दरीत उडी मारली.
थरारानंतर डोंगरावर स्मशानशांतता
काही क्षणात घडलेल्या या घटनेमुळे उपस्थितांच्या हृदयाचे ठोके थांबले होते. तब्बल तीन तासांच्या थरारानंतर डोंगरावर स्मशानशांतता होती. या पूर्वीही या खवड्या डोंगरावरून उडी मारून अनेकांनी आत्महत्या केल्या आहेत. यासाठी या डोंगराला चहूबाजूने कंपाउंड करण्याचा प्रस्ताव नागरिकांनी दिला होता; मात्र अद्याप त्यावर कारवाही झाली नसल्याने पुन्हा तिघांचा बळी गेला अशी भावना नागरिक व्यक्त करीत होते. पोलिसांनी तिघांचेही मृतदेह बाहेर काढून पुढील कार्यवाहीसाठी ‘घाटी’त पाठविले.
पोलिस, अग्निशमन यांचे प्रयत्न
खवड्या डोंगरावर एक तरुण आत्महत्या करण्यासाठी चढला असल्याची माहिती मिळाल्यावर वाळूज एमआयडीसीचे पोलिस व अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले होते. या वेळी पोलिसांनी तरुणाची सलग तीन तास मनधरणी केली, तर अग्निशमन दलाचे जवान दरीमध्ये सुरक्षाजाळी धरून उभे होते; मात्र तो तरुण वारंवार जागा बदलत असल्याने बचावकार्य करण्यासाठी कठीण झाले होते. या वेळी उपस्थित अधिकारी, कर्मचारी व शेकडो नागरिकांच्या डोळ्यादेखत एकापाठोपाठ एक असा तिघांचाही दरीत पडून मृत्यू झाला.
Pune News : पुणेकरांनो तुमच्या वाहनांना नवी ओळख मिळणार! ‘एमएच १२’ची नवी ओळख आता ‘एमएच ६१’, कारण काय?
खवड्या डोंगर मृत्यूचा केंद्रबिंदु
तिसगावचा खवड्या डोंगर गेल्या अनेक वर्षांपासून अनेकांच्या आत्महत्येचे केंद्रबिंदू बनत असून वारंवार घडणाऱ्या या घटनांमुळे या परिसरातील नागरिकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे. तिहेरी मृत्यूच्या घटनेत मुलासह आई-वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने डोंगरच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून प्रशासनाने सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते उमेश दुधाट यांनी केली आहे. तरुणाचे प्राण वाचवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या पोलिस, अग्निशमन करणचारी, नागरिक व त्याच्या वडिलांचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत. सर्वांच्या डोळ्यांसमोर ही दुर्दैवी घटना घडत असताना मुलगा व पतीचा दुर्दवी अंत पाहताना मुलाच्या आईनेही टोकाचे पाऊल उचलत त्यांच्या मागे दरीत उडी मारून आयुष्य संपवले. समाजाच्या व प्रशासनाच्या संवेदनशीलतेला दिलेला गंभीर इशारा आहे. माणुसकी म्हणून आपण नेमके कुठे कमी पडत आहोत हा प्रश्न या निमित्ताने पडला असल्याचे सामाजिक कार्यकर्ते उमेश पाटील यांनी सांगितले.
माजी सरपंच जाधव यांचे प्रयत्न
तिसगाव येथील माजी सरपंच संजय जाधव यांनी माहिती देताना, ‘शेतावर जात असताना एक तरुण सकाळी दहा वाजता खवड्या डोंगराच्या टोकावरील धोकादायक कड्यावर उभा असताना दिसला. त्या वेळी जाधव यांनी त्याला समजावत असताना तू सुशिक्षित आहेस आत्महत्या कशाला करतो असे समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. या वेळी त्यांच्यासोबत त्याची आई व पोलिस होते. मात्र, तो नाकारून ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हता असे जाधव यांनी सांगितले. या वेळी सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत तेथे बसून होतो; मात्र आमच्या प्रयत्नांना यश आले नाही, असे प्रत्यक्षदर्शी संजय जाधव यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.
मागणी करूनही सुरक्षा नाही
या डोंगरावर यापूर्वीही आत्महत्येच्या घटना घडल्या असून, त्यामुळे डोंगराच्या बाजूने; तसेच धोकादायक कड्यांच्या ठिकाणी सुरक्षा कठडे, संरक्षक जाळ्या व इतर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली होती. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने आज पुन्हा तिघांचा बळी गेला असून, अजून किती जणांचे बळी घेणार असा सवाल नागरिकांनी उपस्थित केल्याने हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

