काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची घोषणा : नागोवा सभेत शक्तीप्रदर्शन, पण युतीबाबत घोषणा नाही
त. भा. प्रतिनिधी
मडगाव : ‘गोवा विकू देणार नाही – भाजपला जिंकू देणार नाही’ अशी घोषणा काल सोमवारी अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. नुवे मतदारसंघातील नागोवा येथे काँग्रेस पक्षाची जाहीर सभा झाली. या सभेतून काँग्रेस पक्षाने शक्तीप्रदर्शन घडवून आणले. सभेच्या व्यासपीठावर विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, आमदार अॅल्टन डिकॉस्ता, आमदार कार्लोस फेरेरा, खासदार कॅप्टन विरियातो फर्नांडिस, प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे, अंजली निंबाळकर, माजी खा. फ्रान्सिस सार्दिन, उपाध्यक्ष एम. के. शेख, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतिक्षा खलप, प्रदेश काँग्रेसचे माजी अध्यक्ष अमित पाटकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
मल्लिकार्जुन खर्गे पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्ष वचन देतो की, वाढती महागाई कमी केली जाईल, पारंपरिक व्यवसायांना पाठिंबा दिला जाईल, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण करण्यात येईल, वाढती अमली पदार्थांची समस्या दूर केली जाईल. तसेच महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यात येईल.
पाणी, जंगल व जमिनीचे संरक्षण करू
जर गोव्यात काँग्रेसचे सरकार सत्तेवर आले, तर अमली पदार्थांचे व्यसन संपवण्यात येईल. आम्ही पाणी, जंगल आणि जमिनीचे संरक्षण करू आणि तऊणांना रोजगार देऊ. हे माझे आणि माझ्या पक्षाचे वचन आहे. म्हणून, सर्वांनी काँग्रेस पक्षात सामील व्हावे आणि सरकार स्थापन करावे, असे आवाहन खर्गे यांनी यावेळी केले.
‘हमारी बिल्ली, हमको म्याव’
काँग्रेसने देशात शाळा, रस्ते, ऊग्णालये आणि महाविद्यालये बांधली. आज, आमच्या शाळा आणि महाविद्यालयांमध्ये शिकलेले भाजपचे सदस्य आमच्याबद्दल वाईट बोलतात. गोव्याचे मुख्यमंत्री देखील तेच करतात, ‘हमारी बिल्ली हमको म्याव’ असाच हा प्रकार असल्याचे खर्गे म्हणाले. ज्यांनी आपल्या प्राणांचे बलिदान देऊन हा देश घडवला, त्यांचा ते अपमान करत आहेत.
भाजपकडून फूट घालण्याचा प्रयत्न
भाजपचे सदस्य आम्हाला तोडण्याचा प्रयत्न करतात, पण सर्वांनी एक गोष्ट नक्कीच करावी लागेल ती म्हणजे आम्ही एकजूट सांभाळली पाहिजे. देशासाठी, संविधानाच्या रक्षणासाठी आणि आमच्या तत्त्वांसाठी. आम्ही आमची विचारधारा कधीही सोडणार नसल्याचे त्यांनी सांगितले.
पाणी, जंगल आणि जमीन वाचलीच पाहिजे
गोव्याचे पाणी, जंगल आणि जमीन वाचवलीच पाहिजे, त्यामुळे राज्यातील लोकांनी एकत्र आले पाहिजे. आम्ही आधीच गोव्याच्या लोकांसाठी लढत आहोत, पण येथील लोकांनी ही लढाई स्वत:साठी आणि त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी लढली पाहिजे. भाजपचे सदस्य कधीही इतरांच्या कल्याणाचा विचार करू शकत नाहीत. मोदी-शाह असोत किंवा गोव्याचे सावंत… त्यांच्या धोरणांनी देशाचा नाश केल्याचा आरोपही खर्गे यांनी केला.
राहुल गांधीसारखा एकही नेता भाजपमध्ये नाही
राहुल गांधी देशातील विद्यार्थी, तऊण, गरीब, वंचित, दलित आणि मागासलेल्या वर्गांसाठी लढतात. भाजपमध्ये तुम्हाला असा नेता सापडणार नाही. ते फक्त देशात फूट पाडण्याचे काम करतात.
सावंत सरकारातील 12 पैकी 10 मंत्री काँग्रेसचे
भाजप हे ‘चोरांचे सरकार’ आहे. भाजप इतर पक्षांमध्ये फूट पाडून, आमदारांना विकत घेऊन आपले सरकार स्थापन करते आणि जगाला ‘नैतिकतेचे ज्ञान’ देतात. मात्र, आता जनता त्यांना धडा शिकवेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष सत्तेपर्यंत पोहचला होता. मात्र, आमचे आमदार फोडून भाजपने सरकार स्थापन केले. आज भाजप सरकारातील 12 मंत्र्यांपैकी 10 मंत्री हे काँग्रेस पक्षाचे असल्याचे सांगत, हे आमदार गद्दार होते, असा आरोपही त्यांनी केला.
लोक देवापेक्षा मोदींना जास्त पाहतात
आजकाल, सकाळी टीव्ही चालू करताच आपल्याला नरेंद्र मोदी दिसतात. लोक देवापेक्षा मोदींना जास्त पाहत आहेत. नोटाबंदीने नोकऱ्या नष्ट केल्या आहेत. देशातील प्रचंड बेरोजगारीसाठी नरेंद्र मोदी जबाबदार आहेत. त्यांचे श्रीमंत मित्र सर्वत्र सत्ता काबीज करत आहेत. नरेंद्र मोदी आणि अमित शाह मिळून देशाचा नाश करत असल्याची जोरदार टीका मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.
भाजपने गोवा काढलाय विक्रीला : आलेमाव
स्व. मनोहर पर्रीकर यांनी राज्यात ‘परिवर्तन यात्रा’ राबवली आणि भ्रष्ट जुमला पार्टीचे सरकार सत्तेवर आणल्याचा आरोप विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केला. 2027 मध्ये काँग्रेस पक्षाचे 27 आमदार निवडून येईल व सरकार स्थापन करेल. तेव्हा गोव्याच्या जमिनीचे संरक्षण करण्यास प्राधान्य दिले जाईल असे युरी आलेमाव म्हणाले. भाजप सरकारने आज गोवा विक्रीस काढल्याचा आरोप त्यांनी केला.
आश्वासन पूर्तता करण्यात अपयश : फर्नांडिस
2027ची निवडणूक ही नरेंद्र मोदी पर्वाचा अंत करणारी असेल असा विश्वास दक्षिण गोव्याचे खा. कॅप्टन विरियातो फर्नांडिस यांनी व्यक्त केला. मोदी यांनी जनतेला अनेक आश्वासने दिली. मात्र, या आश्वासनाची पूर्तता करण्यात त्यांना अपयश आल्याचा आरोपही त्यांनी केला. गोव्यात भाजपला केवळ 33 टक्के मतदान झाले. विरोधात 67 टक्के. यावरूनच भाजपला जनाधार नसल्याचे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले.
भाजपकडून मतविभागणीसाठी 100 कोटी खर्च : चोडणकर
प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनीही भाजप सरकारवर जोरदार टीका केली. भाजप सरकारने गोवा विकण्यास सुरूवात केली असून उर्वरित गोवा शाबूत ठेवायचा असेल तर काँग्रेसशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, भाजप मत विभागणीमुळेच सत्तेपर्यंत जात असतो. यावेळीसुद्धा त्यांनी मतविभागणीसाठी शंभर कोटी रुपये खर्च केले आहेत.
या जाहीर सभेत विरोधकांच्या युती संदर्भात काँग्रेस पक्षाकडून घोषणा होईल, असा सर्वांचा समज होता. मात्र, इतर पक्षांकडे युती करण्यासंदर्भात कोणतीच घोषणा झाली नाही. त्यामुळे काँग्रेस पक्ष युतीशिवाय पुढे जात असल्याचे संकेत या सभेतूनही मिळाले आहेत.
