![]()
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी सत्ताधाऱ्यांच्या धोरणांवर टीका करणाऱ्यांना ‘दिमागी नक्षल’ संबोधण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे. सत्ता-पक्षांचे विरोधक राष्ट्रद्रोही नसून, ते राष्ट्रहितैषी असतात, असे तिवारी यांनी म्हटले. सत्ताधाऱ्यांच्या दोषांवर बोट ठेवणाऱ्यांना नक्षली म्हणणे ही सत्तालोलुप मानसिकता असल्याचे त्यांनी नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अलीकडील वक्तव्याचा संदर्भ देत तिवारी म्हणाले की, देशातील विद्यार्थी, तरुण, शेतकरी आणि नागरिक आपल्या प्रश्नांसाठी आवाज उठवत असतील, तर तो लोकशाहीचा अविभाज्य भाग आहे. सरकारच्या धोरणांवर टीका करणाऱ्या प्रत्येकाला ‘दिमागी नक्षल’ ठरविणे म्हणजे लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांवरच आघात करण्यासारखे आहे. नक्षलवाद हा हिंसक आणि राष्ट्रविरोधी प्रवृत्तीशी संबंधित विषय आहे. त्याची तुलना सरकारला प्रश्न विचारणाऱ्या नागरिकांशी करणे अयोग्य आहे. नागरिकांनी प्रश्न विचारू नयेत, सत्ताधाऱ्यांच्या निर्णयांवर चर्चा करू नये आणि गप्प बसावे, अशी अपेक्षा लोकशाही व्यवस्थेत असू शकत नाही, असेही तिवारी यांनी स्पष्ट केले. देशातील स्वायत्त संस्थांचा कथित गैरवापर, निवडणूककेंद्री राजकारण आणि लोकाभिमुख धोरणांचा अभाव यामुळे विविध स्तरांवर असंतोष व्यक्त होत आहे. पंतप्रधानांनी संविधान आणि संसदेप्रती व्यक्त केलेल्या आदराचा उल्लेख करत, तिवारी यांनी घटनात्मक मूल्यांचे प्रत्यक्ष पालन करण्याची गरज व्यक्त केली. नागरिकांचे अधिकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि लोकशाही संस्थांची स्वायत्तता अबाधित राहणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी 22 ऑगस्ट रोजी पुण्यात येणार आहेत. विद्यार्थी आणि तरुणाईच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी ते ‘छात्रो की गुंज’ या कार्यक्रमात सहभागी होतील. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपल्या समस्या मांडाव्यात, असे आवाहन तिवारी यांनी केले.
Source link
विरोधक राष्ट्रद्रोही नव्हे, राष्ट्रहितैषी, गोपाळ तिवारींचा सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल:'छात्रों की गूंज' कार्यक्रमासाठी राहुल गांधी 22 ऑगस्टला पुण्यात
