Headlines

तिरंगा हातात घेत संभाजीनगरच्या रस्त्यांवर तरुणाईची बाईक रॅली:दिव्य मराठी आणि धुरंधर मोटर्स क्लबचा उपक्रम, सुरक्षित राईडचा दिला संदेश




‘स्वातंत्र्यदिन’ म्हणजे केवळ ध्वजारोहण आणि देशभक्तीपर कार्यक्रम नव्हे, तर देशाप्रती असलेली आपली भावना व्यक्त करण्याचा दिवस. याच भावनेतून दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध उपक्रम राबवणाऱ्या ‘दिव्य मराठी’ने यंदाही स्वातंत्र्यदिनाचा उत्साह अनोख्या पद्धतीने साजरा केला. ‘दिव्य मराठी’ आणि ‘धुरंधर मोटर्स क्लब’ यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी सकाळी बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. हातात तिरंगा घेऊन मोठ्या संख्येने बाईक रायडर्स या रॅलीत सहभागी झाले. सुरक्षित राईडचा संदेश देत तरुणाईने शहरातील रस्त्यांवर देशभक्तीचा उत्साह निर्माण केला. सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास ‘दिव्य मराठी’ कार्यालयापासून या रॅलीला सुरुवात झाली. क्रांती चौक, गोपाळ टी, पुन्हा क्रांती चौक, कॅनॉट, सिडको बस स्टँड आणि त्यानंतर पुन्हा ‘दिव्य मराठी’ कार्यालय असा रॅलीचा मार्ग होता. तिरंगा फडकवत आणि वाहतूक नियमांचे पालन करत रायडर्सने ही राईड पूर्ण केली. स्वातंत्र्यदिनाच्या सुट्टीत घरी न राहता तरुणाईने मोठ्या उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला. या रॅलीला तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक रायडर्स आपल्या बाईकवर तिरंगा घेऊन सहभागी झाले होते. देशभक्तीचा उत्साह आणि बाईक रायडिंगची आवड यांचा संगम या रॅलीत पाहायला मिळाला. मात्र, या रॅलीचा मुख्य उद्देश केवळ सेलिब्रेशन नसून शहरात सुरक्षित आणि शिस्तबद्ध राईडिंगचा संदेश पोहोचवणे हा होता. या कार्यक्रमासाठी विशेष पाहुणे म्हणून ‘मिस्टर इंडिया’चे ब्रँड फिट ॲम्बेसेडर विक्रम जाधव उपस्थित होते. यावेळी त्यांनी देशाच्या प्रगतीसाठी तरुणाईची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. ते म्हणाले, ‘देशाला पुढे नेण्यासाठी एकसंघ होऊन आपण प्रगतीच्या पथावर जाऊ शकतो. त्यासाठी तरुण वर्ग हा महत्त्वाचा भाग आहे. आज आपल्या स्वातंत्र्याला ८० वर्षे पूर्ण झाली आहेत. देश प्रगतीच्या पथावर तर आहेच; मात्र, त्याला आणखी बलाढ्य बनवण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे.’ रॅलीत सहभागी झालेले मयूर पंढरीनाथ मोहिते यांनीही स्वातंत्र्यदिनाच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, ‘आता शाळेत जाता येत नसल्यामुळे स्वातंत्र्यदिन कसा असतो, हे अनुभवणे थोडे कठीण झाले आहे. त्यामुळे आज मला ही संधी मिळाली, याचा आनंद आहे. हा दिवस चांगला जावा आणि देशाच्या प्रगतीसाठी आपला हातभार लागावा, हीच अपेक्षा आहे.’ रायडर मोहिनी पाथ्रीकर यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट केला. त्या म्हणाल्या, ‘आपल्या शहराला एक आत्मविश्वास देण्यासाठी ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. अनेकजण हार्श राईडिंग करतात. मात्र, आमचा ग्रुप सिस्टेमॅटिक पद्धतीने आणि सुरक्षितपणे राईड कशी करावी, याचा संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे.’ कार्यक्रमाचे आयोजक ऋषी मिश्रा म्हणाले, ‘संभाजीनगरमध्ये पहिल्यांदाच स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने बाईक राईडचे आयोजन करण्यात आले आहे. सुरक्षित राईड कशी असते, हे सांगण्यासाठी आम्ही आज रस्त्यावर उतरलो आहोत. प्रत्येकाने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी घरी न बसता बाहेर पडावे, हा दिवस स्मरणीय बनवावा आणि लहानपणीच्या स्वातंत्र्यदिनाच्या आठवणी पुन्हा अनुभवाव्यात, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे.’ तिरंगा हातात घेत, देशभक्तीचा उत्साह मनात ठेवत आणि सुरक्षित राईडचा संदेश देत संभाजीनगरच्या रस्त्यांवर निघालेली ही बाईक रॅली स्वातंत्र्यदिनाच्या उत्साहाला एक वेगळेच रूप देणारी ठरली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत