Headlines

‘ऐ मेरे वतन के लोगों…’च्या सुरांनी जागवली देशभक्ती:‘लिखो अपने दिल की बात’ला संभाजीनगरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, कलेतूनही उमटला देशप्रेमाचा सूर




‘ऐ मेरे वतन के लोगों,
ज़रा आँख में भर लो पानी…
जो शहीद हुए हैं उनकी,
ज़रा याद करो कुर्बानी…’ हे शब्द कानावर पडताच डोळ्यांसमोर एकच चित्र उभं राहतं… देशासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांचं. त्यांच्या त्यागामुळेच आज आपण स्वातंत्र्याचा श्वास घेत आहोत. यंदा भारताच्या स्वातंत्र्याचा 80वा स्वातंत्र्यदिन देशभरात उत्साहात साजरा करण्यात आला. स्वातंत्र्याच्या या प्रदीर्घ प्रवासात भारताने अनेक चढ-उतार अनुभवले, अनेक आव्हानांचा सामना केला आणि जगाच्या पटलावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांची आठवण कायम राहावी आणि प्रत्येकाच्या मनात देशप्रेमाची भावना जागी राहावी, यासाठी दरवर्षी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा केला जातो. याच भावनेतून यंदाही दैनिक दिव्य मराठीच्या वतीने ‘लिखो अपने दिल की बात, दिव्य मराठी के साथ’ या विशेष उपक्रमाचे आयोजन संभाजीनगर शहरात करण्यात आले होते. या उपक्रमाचे हे चौथे वर्ष असून, यंदाही संभाजीनगरकरांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच शहरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळत होता. ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. ढोल-ताशांचा गजर, हातात डौलाने फडकणारा तिरंगा आणि अंगावर चढलेली देशभक्तीची लहर… या सगळ्यामुळे संपूर्ण वातावरणच तिरंग्याच्या रंगात रंगून गेले होते. देशाप्रती आपल्या मनातील भावना व्यक्त करण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी नागरिकांसाठी फलक लावण्यात आले होते. या फलकांवर आपल्या मनातील ‘दिल की बात’ लिहिण्यासाठी नागरिकांची अक्षरशः रांग लागली होती. प्रतिसाद एवढा उत्स्फूर्त होता की काही वेळातच फलकांवर लिहिण्यासाठी जागाही उरली नाही. सकाळी आठ वाजल्यापासूनच संभाजीनगरकर घराबाहेर पडले होते. स्वातंत्र्यदिनाचा उत्साह त्यांच्या वेशभूषेतूनही दिसत होता. अनेकजण वेगवेगळ्या वेशभूषेत सहभागी झाले होते. कोणी देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकाची वेशभूषा केली होती, तर एक चिमुकली भारतमाता बनून आली होती. या चिमुकलीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. याचवेळी एका नागरिकाचा शर्टही सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. या शर्टवर त्यांनी धाग्यांच्या माध्यमातून चरखा, भारताचा तिरंगा आणि ‘वंदे मातरम्’ साकारले होते. त्यांच्या या अनोख्या कलाकृतीतून देशाप्रती असलेलं प्रेम आणि आदर दिसून येत होता. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकाने या उपक्रमातून आपल्या भावना व्यक्त केल्या. देशावर कोणतेही संकट आले, तर आपापले मतभेद बाजूला ठेवून मातृभूमीसाठी एकत्र उभे राहण्याचा संदेशही नागरिकांनी दिला. एका तरुणीने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “मला माझ्या देशाचा खूप अभिमान आहे. पूर्वीचा भारत आणि आजचा भारत यामध्ये खूप मोठा बदल झाला आहे. आज जगाच्या पाठीवर भारताने प्रत्येक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे भारत देशाची मुलगी असल्याचा मला अभिमान आहे.” कलेतूनही उमटला देशप्रेमाचा सूर देशभक्ती केवळ शब्दांतून नाही, तर कलेतूनही व्यक्त झाली. अनेक नागरिकांनी आपल्या कलागुणांना या उपक्रमाच्या माध्यमातून व्यासपीठ दिले. कोणी देशभक्तीपर गीते सादर केली, तर कोणी भाषणातून आपल्या भावना मांडल्या. काहींनी देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या वीर जवानांची चित्रे साकारत त्यांना आदरांजली वाहिली. गाणं, चित्र, भाषण, वेशभूषा अशा विविध माध्यमांतून व्यक्त होणारा हा देशप्रेमाचा उत्सव भारताच्या विविधतेचीच जाणीव करून देत होता. भाषा, वेशभूषा, विचार आणि कला वेगवेगळी असली, तरी देशप्रेमाची भावना मात्र एकच होती. तसेच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी काहींनी फलक घेऊन जनजागृती करण्याचाही प्रयत्न केला. ‘तुम्ही आमच्याकडे या आणि तुमचा कचरा द्या’ असं म्हणत परिसर स्वच्छ ठेवण्याचे त्यांनी आवाहन केले. संजय शिरसाटांकडून ‘दिव्य मराठी’च्या उपक्रमाचे कौतुक संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनीही या कार्यक्रमाला उपस्थित राहत नागरिकांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देशाच्या एकतेचा संदेश देत म्हटले, “तुम्ही कोणत्याही पक्षाचे असा, कोणत्याही जातीचे किंवा धर्माचे असा; मात्र जेव्हा देशाचा विषय येतो, तेव्हा सर्वांनी एकत्र येऊन लढले पाहिजे. मायनस डिग्रीमध्ये, काश्मीरसारख्या कठीण ठिकाणी राहून आपल्या देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांना माझ्या शुभेच्छा. त्यांच्या प्रत्येक लढाईला यश मिळो, अशी आपण अपेक्षा करूया.” ‘दिव्य मराठी’च्या या उपक्रमाचे कौतुक करताना ते म्हणाले, “दैनिक दिव्य मराठीचा हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. ‘लिखो अपने दिल की बात’ या उपक्रमात असंख्य नागरिक येऊन आपल्या भावना व्यक्त करतात. यंदा नागरिकांचा प्रतिसाद एवढा मोठा आहे की मला माझी ‘दिल की बात’ लिहिण्यासाठीही जागा उरलेली नाही. असे अनोखे उपक्रम सातत्याने सुरू राहावेत, अशी अपेक्षा आहे.” तरुणाई देशाला महासत्ता बनवेल : सी.पी. प्रवीण पवार कार्यक्रमाला शहरातील अनेक मान्यवरांनीही उपस्थिती लावली. शहराचे सी.पी. प्रवीण पवार यांनी देशाच्या प्रगतीबद्दल भावना व्यक्त करताना सांगितले, “आपली वाटचाल एका शक्तिशाली देशाच्या दिशेने सुरू आहे. देशाची खरी ताकद असलेला तरुणवर्ग या स्वातंत्र्याचा योग्य वापर करून योग्य दिशेने पाऊल टाकेल आणि आपल्या देशाला जगाच्या पाठीवर आणखी बलाढ्य बनवेल.” भारताने स्वातंत्र्यानंतरचा प्रवास अनेक आव्हानांना सामोरं जात पूर्ण केला आहे. कधी युद्ध, कधी आर्थिक संकटं, कधी नैसर्गिक आपत्ती, तर कधी सामाजिक आणि राजकीय आव्हानं… प्रत्येक वेळी भारताने या संकटांवर मात करत आपली वाटचाल सुरू ठेवली. एकेकाळी जगाच्या नकाशावर भारताकडे पाहण्याची दृष्टी वेगळी होती; मात्र आज जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात एखादी मोठी घडामोड घडली, तर त्यामध्ये भारताची भूमिका काय आहे, याकडे संपूर्ण जगाचं लक्ष असतं. हीच तर आपल्या देशाच्या प्रवासाची खरी कहाणी आहे. आणि म्हणूनच स्वातंत्र्यदिन हा केवळ तिरंगा फडकवण्याचा किंवा देशभक्तीपर गाणी ऐकण्याचा दिवस नाही. हा दिवस आहे त्या असंख्य ज्ञात-अज्ञात वीरांना आठवण्याचा, ज्यांनी आपल्या आजच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण केलं. त्यांच्या बलिदानाची जाणीव मनात ठेवून देशाच्या प्रगतीत आपला वाटा उचलण्याचा संकल्प करण्याचा दिवस. ‘लिखो अपने दिल की बात, दिव्य मराठी के साथ’ या उपक्रमातून संभाजीनगरकरांनीही आज आपल्या मनातील देशप्रेमाची भावना व्यक्त केली. कुणाच्या ओठांवर ‘वंदे मातरम्’ होतं, कुणाच्या हातात तिरंगा होता, तर कुणाच्या मनात भारतासाठी काहीतरी करण्याची जिद्द होती. देश बदलतोय, काळ बदलतोय… पण मातृभूमीविषयीची भावना मात्र आजही तितकीच जिवंत आहे. ‘भारत माता की जय’च्या जयघोषात याचीच प्रचिती संभाजीनगरने पुन्हा एकदा दिली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत