Siddharth Bodke To Play Subrata Roy in Scam 2010हंसल मेहता यांच्या ‘स्कॅम १९९२: द हर्षद मेहता स्टोरी’ आणि ‘स्कॅम २००३: द तेलगी स्टोरी’ या दोन्ही वेब सीरिज प्रचंड गाजल्या. आता त्यांच्या आगामी सीरिजची चर्चा सुरू आहे. ‘स्कॅम २०१०: द सुब्रत रॉय सागा’ असं या सीरिजचं नाव आहे.

मराठी सिनेविश्वातला अभिनेता अभिनेता सिद्धार्थ बोडके ‘स्कॅम २०१०: द सुब्रत रॉय सागा’ या सीरिजमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक हंसल मेहता ‘स्कॅम’ फ्रँचायझीचा तिसरा भाग घेऊन येत आहेत. विशेष म्हणजे या सीरिजमध्ये सहारा समूहाचे संस्थापक सुब्रत रॉय यांच्यावर आधारित असणार आहे.
काय आहे ‘स्कॅम २०१०: द सुब्रत रॉय सागा’ सीरिजचं कथानक?
ही वेब सीरिज ज्येष्ठ आर्थिक पत्रकार तमाल बंडोपाध्याय यांच्या ‘Sahara: The Untold Story’ या पुस्तकावर आधारित आहे. १९७८ मध्ये अवघ्या २,००० रुपयांच्या भांडवलावर व्यवसाय सुरू करून भारतीय कॉर्पोरेट जगतात अथांग साम्राज्य उभं करणाऱ्या सुब्रत रॉय यांचा उदय आणि त्यानंतर २५,००० कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या गुंतवणुकीवरून झालेला सेबीशी (SEBI) संघर्ष, न्यायालयीन लढा आणि त्यांचा अस्त… ही संपूर्ण कथा यात पाहायला मिळणार आहे.
मराठी अभिनेत्याची मोठी भरारी
अभिनेता सिद्धार्थ बोडके सुब्रत रॉय यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सुब्रत रॉय यांच्या लूक मधील सिद्धार्थचा पहिला लूक समोर आला असून प्रेक्षकांकडून त्याला पसंती मिळत आहे. या सीरिजमध्ये त्याच्यासोबत कृतिका सिंग (सुब्रत रॉय यांची पत्नी स्वप्ना रॉय यांच्या भूमिकेत), मून बॅनर्जी (आई छबी रॉय यांच्या भूमिकेत) आणि आदित्य श्रीवास्तव यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
शूटिंग आणि वाद
लखनऊ, कानपूर, बिठूर, मलिहाबाद, देहराडून, दिल्ली तसंच मुंबईमध्ये या बहुचर्चित सीरिजचे शूटिंग पूर्ण झालं आहे. हंसल मेहता यांनी या फ्रँचायझीचे मुख्य सूत्रधार म्हणून काम पाहिलं आहे. दरम्यान, सहारा इंडियानं या वेब सीरिजच्या निर्मितीवर कायदेशीर आक्षेपही घेतला असून या प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल केली आहे.’स्कॅम १९९२’ मधून प्रतीक गांधी आणि ‘स्कॅम २००३’ मधून गगनदेव रियार यांना ओळख मिळवून दिल्यानंतर, आता हंसल मेहता यांच्या दिग्दर्शनाखाली सिद्धार्थ बोडकेचा अभिनय कसा ठरतो, याकडं प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
सिद्धार्थ बोडकेच्या करिअरबद्दल..
सिद्धार्थचा प्रायोगिक रंगभूमीपासून सुरू झालेला हा प्रवास आज बॉलिवूडपर्यंत पोहोचला आहे. त्यानं आपल्या अभिनयाची सुरुवात नाटकांतून केली. ‘अनन्या’ या अत्यंत गाजलेल्या नाटकात त्यानं साकारलेली भूमिका प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यानंतर तो ‘तू अशी जवळी रहा’ या मालिकेतून तो घराघरात पोहोचला. तर ‘गुम है किसी के प्यार में’ या प्रसिद्ध हिंदी मालिकेत ‘जगा’ या नकारात्मक भूमिकेतून त्यानं हिंदी प्रेक्षकांचंही लक्ष वेधून घेतलं.
बॉलिवूडचे दरवाजे खुले झाले
दृश्यम २ या सिनेमात त्यानं डेव्हिड ही भूमिका साकारली होती. अजय देवगण स्टारर चित्रपटातील या भूमिकेनं त्याच्यासाठी बॉलिवूडचे दरवाजे खुले केले. यानंतर तो JNU: जहांगीर नॅशनल युनिव्हर्सिटी सिनेमात दिसला. यात त्यानं मुख्य भूमिका साकारलेली. मिर्झापूरची पार्श्वभूमी असलेल्या विद्यार्थ्याची ही भूमिका होती. तर पुन्हा शिवाजीराजे भोसले या महेश मांजरेकरांच्या भूमिकेत सिद्धार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसला होता.

