![]()
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात जागतिक जैवइंधन दिनानिमित्त (१० ऑगस्ट) डॉ. प्रमोद चौधरी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर अॅडव्हान्स्ड बायोइकॉनॉमीचे उद्घाटन करण्यात आले. जैव-अर्थव्यवस्थेच्या उदयोन्मुख क्षेत्रात आंतरशाखीय संशोधन, शिक्षण आणि उद्योग-सहकार्याला चालना देणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे. हे केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागात स्थापन करण्यात आले आहे. प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक व कार्यकारी अध्यक्ष, उद्योजक डॉ. प्रमोद चौधरी यांच्या सहकार्याने याची उभारणी झाली आहे. डॉ. चौधरी यांनी केंद्राच्या स्थापनेसाठी वैयक्तिक स्तरावर ७५ लाख रुपयांची देणगी दिली आहे. उद्घाटन समारंभाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, प्र-कुलगुरू डॉ. पराग कळकर आणि विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य रविंद्र शिंगणापूरकर उपस्थित होते. याशिवाय, तंत्रज्ञान विभागातील डॉ. सोमनाथ नंदी, डॉ. वंदना धिंग्रा तसेच प्राज इंडस्ट्रीजचे घनश्याम देशपांडे, अतुल मुळे, डॉ. प्रमोद कुंभार, दत्तात्रय निंबोळकर आणि आनंद घोसाळकर यांचीही उपस्थिती होती. केंद्राविषयी माहिती देताना डॉ. सोमनाथ नंदी यांनी सांगितले की, चालू शैक्षणिक वर्षापासून एम.टेक.च्या विद्यार्थ्यांसाठी दोन नवीन अभ्यासक्रम ओपन इलेक्टिव्ह म्हणून उपलब्ध होतील. यामध्ये ‘शाश्वत विकासासाठी जैव-अर्थव्यवस्था’ आणि ‘जैवइंधन व जैवऊर्जा’ या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने या दोन्ही अभ्यासक्रमांना मान्यता दिली आहे. या केंद्राचा मुख्य भर कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित हरित अर्थव्यवस्था, सिंथेटिक बायोलॉजी, तसेच सांख्यिकीय मॉडेलिंग आणि ऑप्टिमायझेशन या क्षेत्रांवर राहील. डॉ. प्रमोद चौधरी सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर अॅडव्हान्स्ड बायोइकॉनॉमीच्या संचालकपदासाठी डॉ. अनिरुद्ध देशपांडे यांच्या नावाचा प्रस्ताव आहे. डॉ. देशपांडे यांनी लंडनच्या इम्पिरियल कॉलेजमध्ये मेरी-क्युरी फेलोशिपअंतर्गत पोस्ट-डॉक्टोरल संशोधन केले आहे. त्यांनी एनसीएल – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून केमिकल इंजिनिअरिंगमध्ये पीएच.डी. प्राप्त केली असून, शाश्वत उत्प्रेरकांच्या (सस्टेनेबल कॅटॅलिस्ट्स) क्षेत्रातील कार्यासाठी ते ओळखले जातात. डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, “शाश्वत भविष्यासाठी केवळ तांत्रिक नवोन्मेष पुरेसा नाही, तर कुशल मनुष्यबळ, सक्षम संस्था आणि अर्थपूर्ण सहकार्य आवश्यक आहे. भविष्यातील आव्हानांवर उपाय शोधण्यासाठी शिक्षण, उद्योग आणि संशोधन यांना एका व्यासपीठावर आणण्याच्या उद्देशाने हे सेंटर ऑफ एक्सलन्स साकारले आहे. या केंद्राद्वारे जैव-अर्थव्यवस्थेला गती देणाऱ्या प्रतिभावान मनुष्यबळाची निर्मिती केली जाईल.”
Source link
पुणे विद्यापीठात डॉ. प्रमोद चौधरी सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन:जागतिक जैवइंधन दिनानिमित्त 'अॅडव्हान्स्ड बायोइकॉनॉमी' केंद्राची स्थापना
