Headlines

कंत्राटी कामगारांना कायम करा, समान वेतन द्या मागणी:पुणे मनपा कामगार युनियनची प्रवेशद्वारासमोर निदर्शने




पुणे महानगरपालिकेतील कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत घ्यावे आणि समान कामासाठी समान वेतन द्यावे, या प्रमुख मागण्यांसाठी पुणे महानगरपालिका कामगार युनियनने सोमवारी (१० ऑगस्ट) महापालिका प्रवेशद्वारासमोर आक्रोश निदर्शने केली. या आंदोलनात सुमारे चार हजार कंत्राटी कामगार सहभागी झाले होते. महापालिकेच्या विविध विभागांमध्ये गेल्या १५ ते २० वर्षांपासून सुमारे आठ हजार कामगार कंत्राटी पद्धतीने कार्यरत आहेत. यात घनकचरा व्यवस्थापन विभागातील सुमारे पाच हजार महिला व पुरुष सफाई कामगार आणि ३५० मोटार सारथींचा समावेश आहे. रस्ते सफाई, कचरा संकलन, शौचालय व गटार सफाई, मृत जनावरे उचलणे यांसारखी धोकादायक कामे हे कामगार करत असूनही त्यांना अत्यल्प वेतन मिळत असल्याचा आरोप युनियनने केला आहे. युनियनचे अध्यक्ष कॉ. उदय भट यांनी सांगितले की, बारमाही आणि कायमस्वरूपी स्वरूपाची कामे कंत्राटी पद्धतीने करून घेणे नियमानुसार नाही. पुण्याचा वाढता भौगोलिक विस्तार आणि लोकसंख्या विचारात घेता, महापालिकेच्या आस्थापनेवर आवश्यक पदे निर्माण करून कायमस्वरूपी भरती करणे आवश्यक आहे. कंत्राटी कामगारांना वेळेवर वेतन, भविष्य निर्वाह निधी (PF), ईएसआय (ESI), गणवेश, गमबूट, मास्क, रेनकोट आणि इतर आवश्यक साहित्य पुरवणे बंधनकारक असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. युनियनने मागणी केली आहे की, महापालिका आयुक्तांनी कंत्राटी कामगारांना कायमस्वरूपी सेवेत घेण्याबाबत आणि समान कामासाठी समान वेतन देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करावा. हा प्रस्ताव स्थायी समिती आणि सर्वसाधारण सभेत मंजूर करून त्यानंतर महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्यात यावा. राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५ हजार कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा निर्णय तसेच मुंबई, नागपूर आणि नवी मुंबई महापालिकांमध्ये घेतलेल्या निर्णयांचा दाखला देत, पुण्यातही त्याच धर्तीवर निर्णय घेण्याची मागणी युनियनने केली. मागण्या मान्य न झाल्यास कायदेशीर कारवाई करून आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा कॉ. भट यांनी दिला. युनियनच्या जनरल सेक्रेटरी कॉ. मुक्ता मनोहर यांनी कामगारांना एकजूट कायम ठेवून न्यायाच्या लढ्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. या आंदोलनाला विविध कामगार आणि विद्यार्थी संघटनांनी पाठिंबा दर्शवला.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत