Headlines

फरफट कधी थांबणार? – chhatrapati shivajinagar railway underpass work


-मकरंद कुलकर्णी

औद्योगिक शहर, सर्वाधिक वेगाने वाढलेले शहर आणि बरेच काही म्हणवून घेणाऱ्या छत्रपती संभाजीनगर शहराच्या पायाभूत सुविधांच्या अव्यवस्थेची यादी दिवसेंदिवस लांबच लांब होत आहे. वर्षानुवर्षे रेंगाळलेला पाणीप्रश्न, मुख्य रस्त्यावर चुकीचे केलेले पण म्हणवले जाणारे चौक, वाहतूक कोंडी दूर करण्याऐवजी वाढवणारे उड्डाणपूल, सी-सॉ चा खेळ करायला लावणारे असमान रस्ते, रुंद केलेल्या रस्त्यात अपघातास निमंत्रण देत उभे असलेले विजेचे खांब, मोकळ्या जागेचा अवैध पार्किंगसाठी होणारा वापर अशी किती तरी उदाहरणे देता येतील.

या सर्वात नेहमीचा कळीचा मुद्दा ठरतो ते पायाभूत सुविधांचा मुद्दा. पायाभूत सुविधांचा पाया म्हणजे रस्ते. कुठल्याही शहरात याची पूर्तता करताना सरकारी यंत्रणा पुढच्या २५ वर्षांचा विचार करतात, असे म्हटले जाते. पण हे करताना नागरिकांना नेमके काय हवे? कोणत्या सुविधांनी फायदा होईल, याचा विचार केला जातो की नाही ते धोरणकर्त्यांना माहीत असावे.

छत्रपती संभाजीनगरमधील दक्षिण बाजूच्या छत्रपती शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्गाच्या मॉडेलवरून सातत्याने नियोजनाचे तीन तेरा वाजल्याचे उत्तम उदाहरण अशी टीका केली जाते. हे मॉडेल चुकले की उभारणीचे इंजिनीअरिंग की भुयारी मार्गाच्या पलीकडे राहणाऱ्या किंवा या रस्त्याचा वापर करणाऱ्या नागरिकांचेच काही चुकले, असे प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीत. शहराच्या दक्षिण बाजूने गेल्या अडीच दशकांत लाखोंची नागरी वसाहत उभी राहिली.

मुख्य शहराशी उत्तर-दक्षिण होताना सातारा, देवळाईसह लगतच्या भागात मोठ्या प्रमाणावर उभ्या राहिलेल्या नागरी वसाहतीतील रहिवाशांना रेल्वे रूळ पार करून यावे लागते. साधारणपणे पंधरा किलोमीटरच्या टप्प्यात चार ते पाच ठिकाणांहून या जोडणीचा विचार करून रेल्वेस्टेशन, शहानूरमियाँ दर्गा भागात दोन उड्डाणपूल उभे राहिले. नागरिकांची गैरसोय होऊ नये, हा या मागचा हेतू. पुढे वाढणारी वसाहत लक्षात घेऊन प्रस्तावित रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीतील उड्डाणपुलाला दोन दशके उलटूनही अजून मुहूर्त सापडलेला नाही. बीड बायपासवर वाढलेली वाहनांची गर्दी, त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी नागरिकांची डोकेदुखी झाली आहे.

जड वाहनांची २४ तास वर्दळ असलेल्या या रस्त्यावर शेकडो जणांचे अपघातात बळी गेल्यानंतर यंत्रणा जाग्या झाल्या आणि काम मार्गी लागले. रेल्वेच्या ताब्यातील जागेवर रेल्वे प्रशासन तर उर्वरित दोन टप्पे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागतिक बँक प्रकल्पाने पूर्ण करून रेल्वे भुयारी मार्ग उभारला. त्यासाठी वर्षभर वाहतूक बंद ठेवली गेली. नागरिकांनी त्रास सहन केला, पुढे दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र उभारणीनंतर पहिल्याच पावसात भुयारी मार्गात पाणी साचले आणि अजब इंजिनीअरिंगचा धोकादायक नमुना नागरिकांनी अनुभवला.

भुयारी मार्गातील चिखल पावसाळा संपूनही वाळलेला नव्हता. साचलेले पाणी बाहेर काढण्याची यंत्रणा नव्हती. कसेबसे पाणी काढले तर चिखलावरून घसरून दुचाकीस्वार पडून जखमी होऊ लागले. एकाचा बळी गेला. ३८ कोटी ४० लाख रुपये खर्चून उभारलेल्या भुयारी मार्गाचे लोकार्पण ही राजकीय हट्टापायी अपूर्ण स्थितीत केले गेले होते.

भुयारी मार्गाची उंची कमी असल्याने ठरावीक उंचीच्या वाहनांनाच प्रवेश दिला जाणे अपेक्षित आहे, पण हे पाहण्याची यंत्रणा उभीच केलेली नाही. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांत भुयारी मार्गात वाहने अडकण्याच्या तीन घटना घडल्या. इथे दररोज वाहतुकीचा खोळंबा होतो. जड वाहनांसाठी पुरेशी जागा नाही. पाणी तुंबले की छोट्या वाहनांची कोंडी होते. १२ व २५ जुलै रोजी पावसाने भुयारी मार्गात गुडघाभर पाणी साचले. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि वाहनांच्या रांगा हे चित्र पुन्हा अनुभवयास मिळाले. अगदी दोन दिवसांपूर्वी एक बस भुयारी मार्गात मध्यभागी बंद पडली. एका बाजूची वाहतूक चार तास ठप्प होती. वारंवार मागणी करूनही रेल्वे भुयारी मार्गाचे अडथळे दूर केले जात नाहीत. त्रस्त नागरिकांची ही फरफट कधी थांबणार?

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत