Headlines

Jharkhand Student Protest: पेपरफुटीचे उत्तरकंप – jharkhand jpsc protest has entered day 14 with students continuing agitation in ranchi


Jharkhand Student Protest: गेले १३ दिवस ऊन-पावसात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे रांचीमधील जयपालसिंह मुंडा स्टेडियम आणि चार दिवस उपोषणास बसलेले देवेंद्रनाथ महतो हे मात्र चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत.

Jharkhand students protest (1)
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील (नीट) पेपरफुटीच्या देशव्यापी आंदोलनानंतर आता ‘जेन झी’च्या तोफा झारखंड सरकारच्या दिशेने वळल्या आहेत. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतील पेपरफुटीच्या विरोधात विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने आता उग्र रूप धारण केले असून, राज्य सरकारही आंदोलकांशी चर्चेसाठी प्रयत्नशील आहे.

दिल्लीमध्ये विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना पायउतार व्हावे लागले. त्या आंदोलनावर स्वार झालेल्या काँग्रेसची झारखंडमध्ये पंचाइत झालेली दिसते; कारण तेथील झारखंड मुक्ती मोर्चासोबतच्या आघाडी सरकारमध्ये काँग्रेसही सहभागी आहे. आतापर्यंत युवक काँग्रेस आणि ‘एनएसयूआय’ च्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांसोबत असल्याची ग्वाही दिली असली, तरी दिल्लीतील आक्रमकता अद्याप दिसलेली नाही. त्याउलट दिल्लीतील आंदोलनाबाबत शक्यतो मौन धारण करणारा भारतीय जनता पक्ष झारखंडमध्ये मात्र आक्रमक झाल्याचे दिसते.

गेले १३ दिवस ऊन-पावसात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांमुळे रांचीमधील जयपालसिंह मुंडा स्टेडियम आणि चार दिवस उपोषणास बसलेले देवेंद्रनाथ महतो हे मात्र चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. झारखंड लोकसेवा आयोग आणि झारखंड कर्मचारी निवड आयोगाच्या परीक्षा व भरती प्रक्रिया वारंवार वादात सापडत आहेत. नुकत्याच ‘जेपीएससी’च्या १४ व्या परीक्षेच्या निकालानंतर समाजमाध्यमांमध्ये एका उमेदवाराचे तपशील जाहीर झाले. शंभरपैकी केवळ ४८ गुण मिळविल्यानंतरही तो पात्र ठरला होता. दिल्लीतील आंदोलनाच्या यशाने येथील विद्यार्थी आंदोलनास बळ मिळाले. आजवर या प्रकरणी १९ जणांना अटक झाली असून, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग पुढील तपास करीत आहे. मात्र, या घोटाळ्याचा तपास ‘सीबीआय’कडे द्यावा, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे.

आजवर या परीक्षांमधील गुणवत्ता यादी आणि ‘कट ऑफ’चा वाद, संदिग्ध मूल्यमापन प्रणाली आणि तोतया परीक्षार्थींच्या टोळ्या असे गैरप्रकार तेथे उघडकीस आले आहेत. या वर्षी महाराष्ट्रात ‘टीईटी’ पेपरफुटी, पंजाबमध्ये फार्मासिस्ट भरतीतील गैरप्रकार आणि कर्नाटक-बिहारमधील अशा घटनांमुळे गोंधळ उडाला आहे. त्या पार्श्वभूमीवर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी ‘हा राष्ट्रीय प्रश्न आहे,’ असा पवित्रा घेतला आहे; आता मंत्र्यांच्या शिष्टमंडळाशी होणाऱ्या चर्चेतून काय मार्ग निघतो, याची उत्सुकता आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा