Headlines

Iran News: ते खरंच सर्वोच्च नेते होते का? अंधाऱ्या कारमध्ये खामेनींची भेट; पण इराणच्या राष्ट्रपतींनाच शंका


पाच महिन्यांपूर्वी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी अमेरिका, इस्रायलच्या हल्ल्यात मारले गेले. त्यानंतर मोजतबा खामेनी इराणचे सर्वोच्च नेते झाले. पण तेव्हापासून ते कोणालाही दिसलेले नाहीत.

mojtaba iran
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
तेहरान: इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेशकियान यांनी देशाचे सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रपती पेजेशकियान यांना तेहरानमधील एका गुप्त ठिकाणी नेण्यात आलं. तिथे एका अंधाऱ्या कारमध्ये त्यांना एका व्यक्ती सोबत बसवण्यात आलं. ती व्यक्ती सर्वोच्च नेते मोजतबा खामेनी असल्याचं सांगण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली.

इराण इंटरनॅशनलनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या वृत्तानुसार, पेजेशकियान कारमधील व्यक्तीचा पाहू शकले नाहीत. अंधारात ऐकलेला आवाज खरंच सर्वोच्च नेत्याचा होता का, असा प्रश्न पेजेशकियान यांनी भेटीनंतर विचारला होता. हा दावा पेजेशकियान यांच्या सार्वजनिक विधानांपेक्षा वेगळा आहे. मे महिन्यात पेजेशकियान यांनी व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची एक बैठक घेतली. तेव्हा नव्या सर्वोच्च नेत्यांसोबत खेळीमेळीच्या वातावरणात दीड तास संवाद झाल्याचा दावा पेजेशकियान यांनी केला होता. सुत्रांच्या माहितीनुसार, ती भेट केवळ काही मिनिटं चालली. यानंतर राष्ट्रपतींना तिथून जाण्यास सांगण्यात आलं.

खामेनी आणि पेजेशकियान यांची भेट बऱ्याच दबावानंतर शक्य झाली. सुत्रांच्या माहितीनुसार, पेजेशकियान यांनी अनेकदा भेटीची मागणी केली. राजीनाम्याची धमकी दिली. यानंतर खामेनी यांच्या कार्यालयाकडून भेटीची तयारी दर्शवण्यात आली. पण ही भेट सर्वोच्च नेत्यांच्या अधिकृत ठिकाणी होणार नसल्याचं सांगण्यात आलं.

सुत्रांच्या माहितीनुसार, राष्ट्रपतींचं सुरक्षा पथक त्यांना तेहरानमधील एका अज्ञात स्थळी घेऊन गेलं. तिथे त्यांना त्यांच्या कारमधून उतरवण्यात आलं आणि एका व्यापाऱ्याच्या कारच्या मागील सीटवर बसवण्यात आलं. त्या कारच्या काचा काळ्या होत्या. कारमध्ये खामेनी बसले असल्याचं पेजेशकियान यांना सांगण्यात आलं. त्या ठिकाणी इतका अंधार होता की दोघे एकमेकांना पाहू शकले नाहीत. खामेनी यांच्या सुरक्षा रक्षकांनी हस्तांदोलन करण्याचीही परवानगी दिली नाही. दोघांमध्ये काही वेळ चर्चा झाली.

राष्ट्रपतींच्या कार्यालयाशी संबंधित व्यक्तींकडे असलेल्या माहितीनुसार, पेजेशकियान भेटीत त्यांना देण्यात आलेल्या वर्तणुकीमुळे नाराज होते. त्यांना हा प्रकार अपमानास्पद वाटला. यानंतर त्यांनी दुसऱ्या भेटीची मागणी केली. ही भेट सर्वोच्च नेत्याचा मुक्काम असलेल्या ठिकाणी व्हावी, अशी मागणी पेजेशकियान यांनी केली. पण ही मागणी धुडकावण्यात आली.

इराणचे सर्वोच्च नेते गेल्या पाच महिन्यांपासून दिसलेले नाहीत. त्यातच या गुप्त भेटीची आणि त्यातील संशयास्पद गोष्टींची माहिती समोर आलेली आहे. मोजतबा खामेनी यांची सर्वोच्च नेतेपदी निवड होऊन ५ महिने उलटले आहेत. पण या कालावधीत त्यांचं एकही ऑडिओ किंवा व्हिडीओ रेकॉर्डिंग समोर आलेलं नाही.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा