Eco-Luxury Orchid Hotel: जीवनप्रवासात कधीकधी अशी एखादी गोष्ट घडते की, आपलं आयुष्यच अंतर्बाह्य बदलून जातं. ‘ऑर्किड’मुळे माझ्याबाबतही असंच झालं. आशियातल्या या पहिल्या पर्यावरणपूरक पंचतारांकित हॉटेलनं माझ्या जगण्याला सर्वार्थानं दिशा अन् नवी दृष्टी दिली.

आत्तापर्यंत मुंबईभर माझी अनेक रेस्टॉरंट सुरू झाली होती. ‘कामत’ शृंखलेचा विस्तारही झाला होता. या यशामुळे अनेक जण माझ्याकडे सल्ल्यासाठी येऊ लागले. अशातूनच वापी येथील घाट्यात चाललेल्या एका ‘फोर स्टार’ हॉटेलचा प्रस्ताव माझ्याकडं आला. मी नानाविध क्लृप्त्या लावून हे हॉटेल पहिल्या महिन्यापासूनच फायद्यात आणलं. त्यानंतर अशी अनेक डबघाईला आलेली हॉटेल मी फायद्यात आणून दिली. त्यामुळे माझा आत्मविश्वास प्रचंड वाढला. आता काही तरी भव्य करावं, असा विचार मनात रेंगाळू लागला. त्यावेळी ताज, ऑबेरॉय आणि लीला ही तीनच प्रसिद्ध पंचतारांकित हॉटेल होती. त्यांच्यापेक्षा आपण काय वेगळं करू शकतो, यावर मी मंथन सुरू केलं. पर्यावरणाची आवड सुरुवातीपासूनच होती. हॉटेल व्यवसायाला तिची जोड द्यावी, असं सतत कुठंतरी वाटत होतं. यातूनच आशियातल्या पहिल्या पर्यावरणपूरक पंचतारांकित हॉटेलची संकल्पना डोक्यात आली.
‘Reduce, Reuse & Recycle’ हे या हॉटेलचं संकल्पसूत्र होतं. अर्थात, ३०-३२ वर्षांपूर्वी अशी कल्पना सत्यात उतरवणं जवळपास अशक्यप्राय होतं. त्यामुळे मी यासंदर्भात सखोल अभ्यास केला. त्यातून अक्षरश: एक ‘बायबल’ तयार केलं. प्रत्येक गोष्टीबाबत ‘डू अँड डोण्ट’चा यात साकल्यानं विचार केला. मन आणि डोक्यातलं सर्व कागदावर तंतोतंत उतरवलं; पण ते वास्तवात उभारणं हे डोंगराएवढं आव्हान होतं. नेहमीप्रमाणं यातला मुख्य अडथळा होता पैशाचा.
आता जिथं ‘ऑर्किड’ उभं आहे, तिथं पहिलं ‘प्लाझा’ नावाचं हॉटेल होतं. मी तिथं माझ्या बहिणींना नृत्यस्पर्धांसाठी घेऊन जायचो. ते हॉटेल दिवाळखोरीत गेल्याचं मला कळलं. हिंमत करून मी ते चालवायला घेतलं. सात वर्षे मी ते ‘कामत’ नावानं चालवलं आणि फायद्यातही आणलं. त्यानंतर त्यावरच पंचतारांकित हॉटेल उभारण्याचं पक्कं केलं. त्यासाठी माझे मित्र डी. टी. जोसेफ यांनी प्रारंभीचे पैसे दिले. माझ्याकडे काही जागा होत्या, त्या मी विकल्या. महाराष्ट्र शासनाच्या ‘सिकॉम’ या वित्तीय संस्थेकडे अर्ज केला. तिथून ४० कोटी रुपये मिळाले. ‘टीएफसीआय’नंही भरीव मदत केली. अशाप्रकारे कर्म, धर्म, सहयोगानं ‘ऑर्किड’ आकाराला आलं. जगातल्या अनेक विमानतळावर ‘ऑर्किड’ नावाचा लाऊंज असायचा. शिवाय, जगभरातील विविध हवामानांमध्ये वाढणारं हे गोडगोजिरं फूल पूर्वीपासूनच मला खूप आवडायचं. म्हणूनच पहिल्या पंचतारांकित हॉटेलला ‘ऑर्किड’ नाव प्रदान केलं.
पर्यावरणपूरक असल्यानं या हॉटेलमधील प्रत्येक गोष्ट पर्यावरणस्नेही करण्याचा आम्ही प्रयत्न केला. त्याच्या भिंतीमध्ये एकही वीट नाही. कार्बनडाय ऑक्साइटविरहित सीमेंटचा अत्यल्प वापर करून खतनिर्मितीतील कचऱ्यापासून त्या तयार करण्यात आल्या. इथलं सगळं फर्निचर उसाचं चिपाड आणि कापसाच्या बिया-पऱ्हाटीपासून तयार केलेलं आहे. अगदी कपड्यांचे हँगरही लाकडी. भिंतींसाठी वापरण्यात आलेल्या रंगामध्ये ‘व्हीओसी’ नसल्यानं दम्याचा वगैरे त्रास होत नाही. मध्यभागी नायट्रोजन असलेल्या काचेच्या त्रिस्तरीय ‘साऊंडप्रूफ’ खिडक्या आम्ही तयार केल्या. प्लास्टिक, कार्बन पेपरचा शून्य वापर, हे आमचं लक्ष्य होतं. इथं वापरला जाणारा कागद काद्यांच्या सालीपासून तयार करण्यात आला. उसाचं चिपाड आणि केळीच्या पानापासून ‘ट्रे’ बनवण्यात आले. फुटलेले कप, बल्ब फेकून न देता त्यांमध्ये रोपं लावली गेली.
कचऱ्यापासून खत बनवलं गेलं. वाहतं पाणी सर्वांनाच आवडतं आणि यातूनच नळ सुरू राहतो. ते टाळण्यासाठी नळामध्ये हवा भरली. त्यामुळे तो सुरू केला की आवाज येऊ लागला. हा आवाज बंद करण्यासाठी आपोआप नळ बंद केला जाऊ लागला. यातून सुमारे ३० टक्के पाणी वाचू लागलं. वापरलेल्या पाण्याचा झाडे व अन्य बाबींसाठी चार वेळा पुनर्वापर आणि स्वीमिंग पूलचं पाणी अग्निशमन यंत्रणेसाठी वापरलं जाईल,अशी व्यवस्था केली. ‘रेन हार्वेस्टिंग’वर हल्ली भर दिला जातो. मी ती ‘ऑर्किड’च्या निर्मितीवेळीच अंमलात आणली होती. हे हॉटेल भूकंपरोधक आहे. त्यासाठी जपानी तंत्रज्ञान वापरलं. तांब्याच्या वायरीसारख्या काही अपरिहार्य वस्तूंचा वापर करावा लागला; पण तो कमीत कमी होईल याची खूप बारकाईनं काळजी घेण्यात आली. हे सर्व करताना इंजिनीअरिंगची खूप मदत झाली. या हॉटेलमध्ये सुरुवातीपासूनच फटाक्यांवर पूर्ण बंदी होती, ती कायम आहे. इथं आजही एक ‘इकोटेरिया’ म्हणून भाग आहे. तिथं पर्यावरणविषयक संकल्पनांवर चर्चा होते. तिथं एक बॉक्सही आहे. त्यामध्ये तुम्ही तुमच्या पर्यावरणपूरक संकल्पना, मत, प्रतिक्रिया लिहून टाकू शकता.
If you are green person, Join us… अशीच जाहिरात आम्ही ‘ऑर्किड’साठी कर्मचारी निवडताना दिली. कारण हॉटेलची संकल्पना तंतोतंत राबवणं शेवटी त्यांच्याच हातात होतं आणि म्हणूनच कर्मचारीनिवडीत पर्यावरणप्रेमींना प्राधान्य देण्यात आलं. निवडलेल्या कर्मचाऱ्यांना त्यानुरूप प्रशिक्षण देण्यात आलं. २७ सप्टेंबर १९९७ हा माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा दिवस होता. याच दिवशी ‘ऑर्किडचा’ शुभारंभ झाला. सुरुवातीला या हॉटेलला केवळ २१ रूम होते. हॉटेल सुरू झालं तेव्हा अनेकांना ही संकल्पनाच अशक्य वाटत होती. त्यामुळे काहींनी हे सर्व थोटांड आहे वगैरे प्रचार केला. मी आवर्जून अशा लोकांना ‘ऑर्किड’मध्ये आमंत्रित केलं. यातून नंतर हॉटेलची जोरदार चर्चा व्हायला लागली. पुढं बाळासाहेबांपासून अनेक मोठ्या हस्तींनी हॉटेलला भेट दिली. त्यामुळे प्रसिद्धीसोबतच व्यवसायाच्या कक्षाही रुंदावत गेल्या.
तुम्ही निसर्गाचं रक्षण केलं, की तो तुम्हाला त्या बदल्यात बरंच काही देऊन जातो. शालेय मुलांमध्ये पर्यावरण संवर्धनासंबंधी जागरूकता निर्माण व्हावी, यासाठी मी विद्यार्थ्यांना हॉटेल दाखवायला आणायचो. त्यांना पूर्ण हॉटेल, पर्यावरणपूरक गोष्टी, झाडं, खत या सर्वांची माहिती दिली जायची आणि नाश्ताही. याचदरम्यान मी एका बँकेत कर्जासाठी गेलो होतो. तिथल्या व्यवस्थापकाला संकल्पना प्रचंड आवडली. त्यांनी सांगितलं, ‘मी वरिष्ठ पातळीवर चर्चा करतो. करू काहीतरी.’ त्यानुसार मी पुन्हा भेटायला गेलो. ‘डीजीएम आलेत. तुम्हाला आता आत जाता येणार नाही’, असं सांगून तिथला सुरक्षारक्षक मला आडवत होता. तितक्यात आतून ‘कामतसाहेब’ अशी हाक आली. ते चक्क डीजीएम होते. मी भेटलो. त्यांना म्हटलं, ‘साहेब मी एक कोटी रुपये कर्जाचा प्रस्ताव दिला होता.’ ‘अहो, तो मंजूर झालाय. घेऊन जा तुम्ही चेक’, असं ते म्हणाले. मला कळेना ही जादू कशी झाली? मग त्यांनी सांगितलं की, त्यांचा नातू आमच्या हॉटेलमध्ये आला होता व त्यानं रात्री भरभरून सांगितलं. ‘आणखी पैसे लागले तर सांगा’, असंही त्यांनी आश्वस्त केलं. पण मुलगा उत्तम कमवणारा असला की स्थळं चालून येतात, त्यानुसार नंतर अनेक बँका समोरून पैसे द्यायला तयार झाल्या.
मी एकदा ऑबेरॉय हॉटेलचे मालक पी.आर. एस. ऑबेरॉय यांना आमंत्रित केलं. ‘ऑर्किड’ पाहिल्यावर, ‘You are threat to us’, असं ते म्हणाले. त्यावर मी नम्रपणे म्हणालो, ‘Sir i am not threat, but your follower.’ ते म्हणाले, ‘कसं काय?’. मी म्हटलं, ‘O for Oberoi and O for Orchid.’ ते गोड हसले आणि माझ्या पाठीवर शब्बासकीचा हात ठेवला. पंचतारांकित हॉटेल व्यवसायातील माझ्या यशाची ती सर्वांत मोठी पावती होती. पुढं एका कार्यक्रमात त्यांना जीवनगौरव पुरस्कार मिळाला आणि मला ‘ऑर्किड’करिता सर्वोत्तम हॉटेलसाठी सन्मानित करण्यात आलं. हा दुर्मीळ योग कधीही न विसरण्यासारखाच. ‘इकोटेल’ पंचतारांकित हॉटेल म्हणून सर्वांधिक पर्यावरणविषयक पुरस्कार मिळवणारं ‘ऑर्किड’ हे जगातलं एकमेव हॉटेल आहे.
धोतर आणि पांढरा शर्ट घालणाऱ्या व किचनमध्ये भांडी धुतलेल्या एका माणसाच्या मुलानं पंचतारांकित हॉटेल उभं करणं, ही तेव्हा आभाळाएवढी मोठी गोष्ट होती. त्यामुळे वडिलांना माझ्याबद्दल खूप अभिमान वाटायचा. आमचे वडील तसे नकारात्मक विचारसरणीचे. ते आम्हाला म्हणायचे, ‘तुम्ही आयुष्यात काहीच करू शकणार नाही.’ पण ‘ऑर्किड’चं यश पाहिल्यानंतर ते म्हणाले, ‘जे मी आयुष्यात करू शकलो नसतो, ते तू केलंस.’ याहून मोठा आशीर्वाद काय असू शकतो एका मुलासाठी!
——————————
(शब्दांकन : लहू सरफरे)

