Headlines

Preeti, Jasmine win gold in boxing, Soman in para shot put


भालाफेकमध्ये नीरजला रौप्य, तिहेरी उडीत भारताचा डबल धमाका

वृत्तसंस्था

ग्लासगो

राष्ट्रकुल स्पर्धेत दहाव्या दिवशी जॅस्मिन लांबोरिया (महिला 57 किलो बॉक्सिंग), प्रीती पवार (महिला 54 किलो बॉक्सिंग) आणि सोमन राणा (पॅरा शॉट पुट) यांनी सुवर्णपदके पटकावली. दुसरीकडे, पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात, सुवर्णपदकाचा दावेदार असलेल्या जादुमणी सिंगला ऑस्ट्रेलियाच्या जय डिक्सनकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. याशिवाय, पुरुषांच्या तिहेरी उडी स्पर्धेत भारताने दुहेरी यश मिळवले. प्रवीण चित्रवेल आणि सेल्वा प्रभू यांनी दमदार कामगिरी करत अनुक्रमे रौप्य आणि कांस्य पदके पटकावली. भालाफेकमध्ये मात्र नीरज चोप्राला रौप्यपदक मिळाले. या दमदार कामगिरीसह भारत 8 सुवर्ण, 15 रौप्य आणि 7 कांस्यपदकासह एकूण 30 पदकांची कमाई करत पदकतालिकेत सहाव्या स्थानी आहे.

 

ग्लासगो येथे सुरु असलेल्या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी शनिवारचा दिवस गाजवला. बॉक्ंिसगमध्ये महिलांच्या 54 किलो गटाच्या अंतिम सामन्यात भारताच्या प्रीती पवारने शानदार खेळ साकारताना कॅनडाच्या डेलगाडोचा 5-0 असा एकतर्फी पराभव केला आणि सुवर्णपदकावर नाव कोरले. सुरुवातीपासून प्रीतीने आक्रमक खेळ करत प्रीतीने प्रतिस्पर्धी खेळाडूला वर्चस्वाची संधी दिली नाही. प्रीतीने सुवर्ण जिंकत बॉक्ंिसगमध्ये भारताच्या सुवर्णपदकाचे खाते उघडले. संपूर्ण लढतीत प्रीतीची वेगवान फुटवर्क, अचूक पंच आणि शिस्तबद्ध रणनीती अगदी स्पष्टपणे दिसून आली.

जॅस्मिनचाही सुवर्णपंच

प्रीतीनंतर, जॅस्मिन लांबोरियानेही ग्लासगोमध्ये आपल्या कौशल्याची चुणूक दाखवली. महिलांच्या 57 किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात जॅस्मिनने उत्तर आयर्लंडच्या मायकेला वॉल्शचा 5-0 असा पराभव करत सुवर्ण जिंकले. विशेष म्हणजे, यापूर्वी 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत ‘लाइटवेट‘ गटात भारतासाठी तिने कांस्यपदक जिंकलं होतं; हे तिचं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील दुसरे पदक ठरले.

बॉक्सिंगमध्ये जादुमणी सिंगला रौप्य

 

पुरुषांच्या 55 किलो वजनी गटात सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार असलेल्या जादुमणी सिंगला अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या जये डिक्सनविरुद्ध 0-5 असा पराभव पत्करावा लागला. फायनलमधील पराभवामुळे त्याला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. जादुमणी हा इरोइशेंबा, मणिपूर येथील आहे. तो भारतीय लष्कराचे प्रतिनिधित्व करतो.

तिहेरी उडीत भारताचा डबल धमाका

राष्ट्रकुल स्पर्धेत पुरुषांच्या तिहेरी उडीत भारताला दुहेरी यश मिळाले. प्रवीणने आपल्या चौथ्या प्रयत्नात 16.58 मीटर अशी सर्वोत्तम उडी मारत रौप्यपदकावर नाव कोरले तर सेल्वा प्रभूने 16.52 मीटरची सर्वोत्तम उडी घेत कांस्यपदकाची कमाई केली. या प्रकारात द.आफ्रिकेच्या जमैकाच्या जॉर्डनने सुवर्ण जिंकले. विशेष म्हणजे, जॉर्डन आणि प्रविण यांच्यात चांगलीच चुरस होती. पण, शेवटच्या प्रयत्नात जॉर्डनने 16.72 मी उडी घेत सुवर्ण जिंकले.

पॅरा शॉटपुटमध्ये भारताला ऐतिहासिक सुवर्ण, रौप्य

पुरुषांच्या गोळाफेक प्रकारात (एफ-57) पॅरा अॅथलिट सोमन राणा आणि शुभम जयाल यांनी सुवर्ण आणि रौप्यपदक जिंकले. सोमन राणाने 13.40 मीटर गोळाफेक करत अव्वल स्थान पटकावले, तर शुभमने 13.28 मीटर फेकीसह रौप्यपदकावर नाव कोरले. विशेष म्हणजे, राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात पुरुषांच्या एफ 57 शॉटपुट प्रकारात भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले. तसेच या प्रकारात भारताने प्रथमच पहिले आणि दुसरे स्थान पटकावत इतिहास रचला आहे.

नीरज चोप्राची रौप्यपदकाला गवसणी,    यशविर सिंगचेही ऐतिहासिक कांस्यपदक

शुक्रवारी मध्यरात्री भालाफेक प्रकारात भारताला दुहेरी यश मिळाले. ऑलिम्पिक आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील माजी विजेता आणि सुवर्णपदकाचा प्रबळ दावेदार म्हणून स्पर्धेत उतरलेल्या नीरज चोप्राला अव्वल स्थान मिळवता आले नाही. श्रीलंकेचा युवा खेळाडू रुमेश थरंगा पाथिरागाने त्याला पराभूत करून सुवर्णपदक पटकावले. नीरज चोप्राला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले तर भारताचा दुसरा भालाफेकपटू यशवीर सिंगने कांस्यपदक जिंकून सर्वांनाच आश्चर्यचकित केले.

गंभीर दुखापतीतून सावरल्यानंतर नीरजने शानदार सुरुवात करताना दुसऱ्या फेरीत 85.83 मी. भाला फेक करत अव्वलस्थान पटकावले. पण त्याचा आनंद फार काळ टिकला नाही. श्रीलंकेचा युवा अॅथलिट पाथिरागाने 89.75 मी भालाफेक करत त्याचे अव्वलस्थान हिसकावून घेतले. यानंतर नीरजला आपली कामगिरी सुधारता आली नाही. अर्थात, लंकेच्या या युवा खेळाडूने सुवर्ण तर नीरजला रौप्य मिळाले. दुसरीकडे, अंतिम फेरीत दोन अत्यंत चकित करणारे निकाल पाहायला मिळाले. जयपूरचा यशवीर सिंग जो या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झाला होता, तो 81.33 मीटरच्या सर्वोत्तम कामगिरीसह सहाव्या स्थानावर होता. तो पदकाच्या शर्यतीत असेल असं वाटत नव्हते, पण आपल्या शेवटच्या प्रयत्नात त्याने 85.41 मीटरचा थ्रो केला आणि थेट तिसऱ्या स्थानावर झेप घेत कांस्यपदकाला गवसणी घातली.

डेकॅथलॉनमध्ये तेजस्विन शंकरला कांस्य

भारताचा अॅथलिट तेजस्विन शंकरने ऐतिहासिक कामगिरी साकारताना डेकॅथलॉनमध्ये कांस्यपदकाला गवसणी घातली. या स्पर्धेच्या इतिहासात भारताला आतापर्यंत एकही पदक जिंकता आले नव्हते, पण ही किमया तेजस्विनने करुन दाखवली आहे. डेकॅथलॉनमध्ये 10 खेळांचा समावेश होतो आणि त्याची बेरीज करुन पदक निश्चित केले जाते. या आव्हानात्मक क्रीडा प्रकारात ग्रेनाडाच्या लिंडन व्हिक्टरने हंगामातील सर्वोत्तम 8,096 गुणांसह सुवर्णपदक पटकावले आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील सलग तिसरे विजेतेपद मिळवले. टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता कॅनडाचा डॅमियन वॉर्नर 8,036 गुणांसह रौप्यपदकाचा मानकरी ठरला. तेजस्विनने अखेरपर्यंत कडवी झुंज देत कांस्यपदक निश्चित केले.

 

 

 

 

 



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत