त. भा. प्रतिनिधी
बेंगळूर :
मंत्रिपदापासून वंचित राहिलेल्या ज्येष्ठ आमदारांचे समाधान करण्यासाठी काँग्रेस पक्ष मंत्रिमंडळाची पुनर्रचना किंवा तिसऱ्यांदा विस्तार करण्याच्या विचारात आहे. या पार्श्वभूमीवर हायकमांडशी सल्लामसलत करून लवकरच मंत्रिमंडळात फेरबदल करण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार सरसावले आहेत.
मंत्रिमंडळ किरकोळ बदल करण्यासंदर्भात काँग्रेस हायकमांडशी पुन्हा चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार रविवारी नवी दिल्लीला रवाना होतील. वरिष्ठांची भेट घेऊन सर्व मुद्द्यांवर चर्चा करतील. यावेळी तिसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त निश्चित करतील. तसेच, काही दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ विस्ताराबद्दल नाराज असलेल्या दोन ज्येष्ठ आमदारांचा मंत्रिमंडळात समावेश करणे, एक-दोन मंत्र्यांना मंत्रिमंडळातून वगळणे आणि मंत्रिमंडळात महिलांना जागा देण्यावरही चर्चा करतील.
मंत्रिपद न मिळाल्याने असमाधानी असलेल्या ज्येष्ठ आमदारांची समजूत काढण्याचे प्रयत्न झाले असले तरी, काही जणांची नाराजी दूर झाली नाही. ते मंत्रिपदाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे, मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार सध्याच्या मंत्रिमंडळात किरकोळ बदल करण्यासाठी आणि आमदारांची नाराजी दूर करण्याच्या उद्देशाने हायकमांडची भेट घेऊन चर्चा करणार आहेत.
खातेवाटपाविषयी देखील करणार चर्चा
मंत्रिपद न मिळाल्याने काही ज्येष्ठ आमदार नाराज आहेत त्यामुळे नव्या मंत्र्यांना अद्याप खातेवाटप करण्यात आलेले नाही. तर अनेक नवीन मंत्र्यांनी अमुक खातेच हवे, असा आग्रह धरला आहेत. या सर्व बाबींवर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री शिवकुमार पक्षश्रेष्ठींशी चर्चा करतील.
काँग्रेसमधील सूत्रांच्या माहितीनुसार, डी. के. शिवकुमार मंत्रिमंडळ विस्तारानंतर काँग्रेसमधील घडामोडी, खातेवाटपावरून सुरू असलेला वाद आणि पुन्हा मंत्रिमंडळ विस्ताराची गरज यावर हायकमांडशी चर्चा करून सर्व बाबींवर निर्णय घेतील. तत्पुर्वी शिवकुमार यांनी शुक्रवारी माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करून गोंधळ दूर करण्याबाबत सल्ले घेतले.
मंत्री एच. सी. बालकृष्ण पदत्याग करणार?
ज्येष्ठ आमदारांच्या असंतोषाच्या पार्श्वभूमीवर, नवनियुक्त मंत्री एच. सी. बालकृष्ण यांनी आपले पद सोडण्याची घोषणा केली आहे. त्याचप्रमाणे, गृहमंत्री प्रियांक खर्गे यांनीही पक्षाने मागणी केल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याचे म्हटले आहे. हे सर्व लक्षात घेता, सध्याच्या मंत्रिमंडळातील दोघांना वगळून नाराज असलेल्या एक किंवा दोन ज्येष्ठ आमदारांना संधी देण्याबाबत चर्चा सुरू आहे. विधिमंडळ अधिवेशनाआधी पुन्हा मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे.
मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असलेले ज्येष्ठ आमदार एच. सी. महादेवप्पा, युवा आमदार प्रियकृष्ण आणि इतर अनेक जणांनी यापूर्वीच दिल्ली गाठली आहे. त्यांनी ज्येष्ठ नेत्यांची भेट घेऊन आपल्यावर झालेल्या अन्याय दूर करण्याची मागणी केली आहे. या सर्व घडामोडी पाहता, सध्याच्या मंत्रिमंडळात काही बदल होण्याची शक्यता आहे.
मंत्रिमंडळात महिलांना स्थान देणार
राज्य मंत्रिमंडळात महिलांना प्रतिनिधित्व देईन. आम्ही महिला सक्षमीकरणात खूप काम केले आहे. महिला आरक्षण विधेयक लागू करण्यात आम्ही महत्त्वाची भूमिका बजावली. केंद्रीय मंत्री रिजिजू यांनी काँग्रेस सरकारची चिंता करण्याची गरज नाही. आमच्या मंत्रिमंडळात महिलांना नेहमीच स्थान असेल.
– डी. के. शिवकुमार, मुख्यमंत्री
कार्यकर्त्यांच्या नावाने राहुल गांधी यांना पत्र
राज्य मंत्रिमंडळ विस्तारावरून नाराजीनाट्या निर्माण झालेले असताना, निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या नावाने काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांना पत्र पाठविण्यात आले आहे. हायकमांडच्या नावाचा गैरवापर करून राजकीय काही जण लाभ उठवत आहेत. पक्षासाठी काम केलेल्या ज्येष्ठ नेत्यांकडे मंत्रिमंडळ विस्तारावेळी दुर्लक्ष करण्यात आले आहे. भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्यांना मंत्रिपदे देण्यात आली आहेत. अशा मंत्र्यांना त्यांच्या मंत्रिपदावरून हटवून ती पदे पक्षनिष्ठांना द्यावीत, अशी विनंती कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.
