एरवी सामान्यांसाठी दुष्प्राप्य असलेले कामकाजाचे थेट प्रक्षेपण जणू घरात आलेले आहे. कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यातच बाधा आली तर ते उचित ठरणार नाही.
supreme court(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
तंत्रज्ञानाचा अचाट विस्तार झालेल्या आजच्या युगात, त्या तंत्रज्ञानाच्याच गैरवापरामुळे होणाऱ्या जाचातून कुणीही सुटलेले नाही. न्यायालये, त्यातील कामकाज या बाबी देखील त्याला अपवाद असणे अशक्य. सुमारे चार वर्षांपूर्वी न्यायालयांतील कामकाजाचे थेट प्रक्षेपण प्रथमच झाले ते तत्कालीन सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या पुढाकाराने. पुढे, या थेट प्रक्षेपणातील काही भाग रेकॉर्ड करून त्यात फेरफार करणे, त्यास काही अनुचित गोष्टी घुसडणे असे प्रकार काही नतद्रष्टांकडून सुरू झाले.
या पार्श्वभूमीवर, न्यायालयीन कामकाजाचे कुठल्याही प्रकारचे चित्रीकरण न्यायालयीन प्रशासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय सोशल मीडिया तसेच अन्य डिजिटल मंचांवर प्रसारित करण्यास सर्वोच्च न्यायालयाने हंगामी बंदी घातली आहे. ही बंदी घालताना ‘न्यायालय म्हणजे २४ तास चालणारी मनोरंजन वाहिनी नाही,’ अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. वरकरणी पाहता ही अशी बंदी योग्य वाटू शकते. म्हणजे, न्यायालयीन कामाची बेदअबी, त्याचे विकृतीकरण हे होताच कामा नये. मात्र, मेख आहे ती या बंदीचे पालन कसे होणार, या प्रश्नात.
तंत्रज्ञान रोजच्या रोज कुठल्या कुठे जात असताना कुठे कुठे नि काय काय रोखणार? न्यायालयीन कामकाजाच्या रेकॉर्डिंगमधील भागांचा सोयीचा वापर वा गैरवापर होता कामा नये, हे मान्यच. मात्र, आज ‘एआय’सारखे तंत्रज्ञान होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते करू शकते. तेथे अशा बंधनांचा काय पारावार लागणार? त्यापेक्षा न्यायालयीन कामकाजाच्या प्रक्षेपणाचा गैरवापर होऊ शकणार नाही, अशा प्रकारे काही उपाय करणे अगत्याचे ठरते. त्यासाठी अर्थातच तंत्रज्ञान लागेल व त्यासाठी लागेल पैसा. त्याची तजवीज सरकारने करायला हवी. यालाच जोडून जो मुद्दा उपस्थित होतो तो अधिक महत्त्वाचा. तो म्हणजे या अशा कारणांमुळे न्यायालयांतील थेट प्रक्षेपणावरच गदा येण्याची भीती.
हे प्रक्षेपण सध्या तरी त्या त्या न्यायालयांतील न्यायाधीशांच्या परवानगीवर अवलंबून असते. मात्र, जे काही प्रक्षेपण सध्या होते त्याने न्यायालयीन पारदर्शकतेस बळ मिळत आहे. अनुचित काही घडेल म्हणून उचितावर देखील फुली मारण्याची आपली वृत्ती आहे. तसली फुली या बाबत मारली जाऊ नये.
किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.
शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.… आणखी वाचा