Salary vs Expenses: २३ हजार रुपयांचा पगार असलेल्या एका तरुणानं ऐषआरामासाठी क्रेडिट कार्ड घेतलं. मात्र, त्याचं उत्पन्न कमी आणि खर्च जास्त झाल्यामुळे तो आता पूर्णपणे कर्जबाजारी झाला आहे. विशेष म्हणजे, संपूर्ण कुटुंब त्याच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत कर्ज कसं फेडायचं, हा प्रश्न आता त्याला सतावत आहे.

तरुणासोबत नेमकं घडलं काय?
हे प्रकरण r/CreditCardsIndia या रेडिट पेजवरील khadaaL या अकाउंटवर शेअर करण्यात आलं आहे. ही पोस्ट लिहिणाऱ्या तरुणानं स्वतःच्या चुका मान्य केल्या आहेत. तो सांगतो की, त्याला पार्टी करणं, मित्रांसोबत क्लबिंग, मौजमजा आणि ऐषआरामावर खर्च करणं खूप आवडायचं. मात्र, त्याचा पगार फक्त २३ हजार रुपये होता. त्यामुळे खर्च करण्याची क्षमता वाढावी म्हणून त्यानं बँकेचं क्रेडिट कार्ड घेतलं. आणि मग नेमकं तेच घडलं, ज्याची भीती होती. अनियंत्रित खर्चामुळे त्याच्यावर तब्बल ३,०५,३०० रुपये इतकं कर्ज झालं.
आता पुढे काय करणार?
वरकरणी ३ लाख रुपयांचं कर्ज फार मोठं वाटत नसले, तरी या तरुणाची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नाही. संपूर्ण कुटुंब त्याच्या उत्पन्नावर अवलंबून आहे. त्यामुळे त्याच्यासाठी ३ लाख रुपयांचं कर्ज म्हणजे मोठं ओझं ठरलं आहे. हे कर्ज फेडण्यासाठी त्यानं पुन्हा बँकेकडून कर्ज घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, सिबिल स्कोअर खराब असल्यामुळे त्याला नवीन कर्ज मिळत नाही. दुसरीकडे दरमहा भरावा लागणारा ईएमआय त्याची आर्थिक स्थिती आणखी बिकट करत आहे. पोस्टच्या शेवटी तो म्हणतो की, चुकीची संगत आणि चुकीचे आर्थिक निर्णय यामुळेच त्याच्यावर ही वेळ आली आहे. असो, या कर्जातून बाहेर पडण्यासाठी तुम्ही त्याला काय सल्ला द्याल?
(फोटो सौजन्य – Aukid phumsirichat/pexels.com)
(महत्वाची टीप – या बातमीमध्ये नमूद करण्यात आलेली माहिती ही पूर्णपणे सोशल मीडियावरील पोस्टवर आधारित आहे. त्यामध्ये करण्यात आलेल्या दाव्यांची सत्यता maharashtratimes.com ने स्वतंत्रपणे पडताळून पाहिलेली नाही.)

