ऑगस्ट 2026 मध्ये खगोलीय प्रेक्षकांसाठी एक दुर्मिळ योग आला आहे. यंदा 28 ऑगस्ट 2026 रोजी आंशिक किंवा खंडग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. भारतीय वेळेनुसार या ग्रहणाचा प्रारंभ सकाळी होईल आणि मुख्य विसर किंवा मध्य 9:43 वाजता असेल. मात्र, हे ग्रहण भारतातून अजिबात दिसणार नाही, कारण त्यावेळी भारतात लख्ख प्रकाश असलेला दिवस असेल. चला तर मग याविषयीची माहिती पुढे जाणून घेऊया.

खगोलप्रेमींसाठी ऑगस्ट 2026 हा महिना अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण ठरत आहे. 12 ऑगस्ट रोजी पार पडलेल्या खग्रास सूर्यग्रहणानंतर, अवघ्या 15 दिवसांच्या अंतराने आता अवकाशात आणखी एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे. येत्या 28 ऑगस्ट 2026 रोजी वर्षातील शेवटचे खंडग्रास चंद्रग्रहण लागणार आहे. एकाच महिन्यात दोन ग्रहणे येण्याचा हा दुर्मिळ योग असून, जगभरातील खगोलप्रेमींचे डोळे या घटनेकडे लागले आहेत.
कधी आणि किती वाजता लागणार ग्रहण?
अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’ आणि खगोलीय गणितीय नोंदींनुसार, हे ग्रहण 28 ऑगस्ट 2026 (शुक्रवार) रोजी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार (IST) या खंडग्रास चंद्रग्रहणाच्या
- प्रमुख वेळा खालीलप्रमाणे असतील.
- ग्रहणाचा प्रारंभ: सकाळी 6:53 वाजता
- खंडग्रास प्रारंभ: सकाळी 8:03 वाजता
- ग्रहणाचा मध्य: सकाळी 9:43 वाजता
- खंडग्रास समाप्ती: सकाळी 11:21 वाजता
- ग्रहणाची पूर्ण समाप्ती: दुपारी 12:31 वाजता
भारतात दिसणार का?
नासाच्या अधिकृत डेटाचा हवाला देत राष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, हे चंद्रग्रहण भारतातून अजिबात दिसणार नाही. ग्रहणाचा मुख्य काळ (सकाळी 9:43) हा भारतात पूर्णपणे दिवसाचा असेल. चंद्रग्रहण पाहण्यासाठी आकाशात चंद्र असणे आणि रात्र असणे आवश्यक असते. मात्र त्यावेळी भारतात लख्ख सूर्यप्रकाश असेल आणि चंद्र क्षितिजाच्या खाली गेलेला असेल. दिल्ली, मुंबई, कोलकाता यांसह भारतातील कोणत्याही शहरातून हे दृश्यमान होणार नाही.
जगात कुठे दिसणार हा नजराणा?
खगोलशास्त्रीय नियतकालिक स्काय अँड टेलिस्कोप च्या रिपोर्टनुसार, हे अतिशय गडद खंडग्रास चंद्रग्रहण असेल, ज्यामध्ये चंद्राचा सुमारे 96.2 टक्के भाग पृथ्वीच्या गडद छायेत झाकला जाईल. हे ग्रहण उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, पॅसिफिक आणि अटलांटिक महासागर क्षेत्रात पूर्णपणे दिसेल. युरोप आणि आफ्रिकेच्या पश्चिम भागात चंद्र मावळताना हे ग्रहण अंशतः पाहता येईल.
(Disclaimer: प्रस्तुत वृत्त केवळ उपलब्ध माहिती आणि सर्वसामान्य संदर्भांच्या आधारावर तयार करण्यात आले आहे. या वृत्तातील माहितीची अचूकता, पूर्णता किंवा विश्वासार्हतेबाबत ‘मटा’ (महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन) कोणताही दावा करत नाही किंवा त्याची पुष्टी करत नाही.)

