भारत तब्बल नऊ वर्षांच्या कालावधीनंतर कसोटी खेळण्यासाठी श्रीलंकेच्या भूमीत दाखल झालाय…यापूर्वी 2017 मध्ये आपण त्या देशात शेवटची कसोटी मालिका खेळली असता विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघानं यजमानांचा 3-0 असा धुव्वा उडवला होता…पण त्यावेळच्या आणि आताच्या स्थितीत बराच फरक आहे. दर्जेदार फिरकी माऱ्यासमोर आपले फलंदाज वारंवार हडबडून जाताना दिसलेले असल्यानं श्रीलंकेतील संथ खेळपट्ट्यांवर त्यांची कसोटी लागेल…शिवाय रविचंद्रन अश्विनच्या निवृत्तीनंतर भारतीय फिरकी विभागही हवा तसा प्रभाव पाडू शकलेला नाहीये. त्यामुळं या दौऱ्यात वर्चस्व गाजविण्यासाठी फलंदाजांइतकीच त्यांचीही भूमिका महत्त्वाची राहील…
अप्रतिम ‘आउटस्विंगर’ भात्यात असलेल्या कपिल देवच्या आगमनापूर्वी भारताची ओळख प्रामुख्यानं होती ती ‘फिरकी गोलंदाजांची भूमी’ अशीच…70 च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत कसोटी क्रिकेट खेळणाऱ्या बहुतेक देशांच्या तुलनेत आपला संघ प्रतिस्पर्ध्यांना गुंडाळण्यासाठी अवलंबून असायचा तो फिरकीपटूंच्या कौशल्यावर. विशेषत: मायदेशातील संथ, फिरकीस पोषक खेळपट्ट्यांवर हे समीकरण जालीम ठरायचं…पाहुण्या संघांची दाणादाण उडविण्याची जबाबदारी वेळोवेळी पेलली ती बिशन सिंग बेदी, इरापल्ली प्रसन्ना, भागवत चंद्रशेखर, अनिल कुंबळे, हरभजन सिंग यांसारख्या महान फिरकीपटूंनी. ही परंपरा नंतर पुढे चालविली ती रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा यांनी…
त्याचबरोबर आपले फलंदाजही फिरकी खेळण्यात ‘उस्ताद’ म्हणून माहीर…सुनील गावस्कर, गुंडाप्पा विश्वनाथ, दिलीप वेंगसरकर पासून ते मोहम्मद अझऊद्दीन, सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली, वीरेंद्र सेहवाग आणि व्ही. व्ही. एस. लक्ष्मणपर्यंत भारताकडे नेहमी फिरणाऱ्या चेंडूंचा व्यवस्थित समाचार घेणारे जागतिक दर्जाचे फलंदाज होते. त्यांनी पाहुण्या संघांच्या ‘स्पिनर्स’चं आव्हान परतवून लावताना अनेक अविस्मरणीय पराक्रम बजावले…उत्कृष्ट फिरकीपटू अन् फिरकी गोलंदाजीचा समर्थपणे सामना करणारे फलंदाज यांच्या या मिश्रणामुळंच अनेक दशकं परदेशी संघांसाठी भारतात विजय मिळवणं, वर्चस्व गाजविणं हे अत्यंत कठीण बनून राहिलं…
पण एका टप्प्यावर ही परिस्थिती बदलली…ज्यांनी 21 व्या शतकाच्या दुसऱ्या दशकात कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय मधल्या फळीचा कणा राहिलेल्या विराट कोहलीसारख्या काही दिग्गज फलंदाजांना त्यांच्या कारकिर्दीच्या शेवटच्या काही वर्षांत मायदेशातील कसोटी सामन्यांमध्ये फिरकीपटूंविऊद्ध संघर्ष करावा लागला हे नाकारता येणार नाही…ही समस्या 2024 मध्ये अधिकच गंभीर बनली ती न्यूझीलंडनं भारताला 3-0 असं धुणारा इतिहासातील पहिला संघ बनण्याचा प्रताप गाजवल्यावर. याचं मुख्य होतं कारण होतं ते यजमान संघाच्या फलंदाजांना ‘किवी’ फिरकीपटूंवर मात करण्याचा कोणताही मार्ग शोधता न येणं…
त्यात भर पडली ती गतवर्षी जागतिक कसोटी स्पर्धेचे विजेते असलेल्या दक्षिण आफ्रिकेसमोर भारताला मायदेशात 2-0 असे हात टेकावे लागल्यानं…भारत श्रीलंकेविऊद्ध कसोटी मालिका खेळण्यास सज्ज झालाय तो अशा निराशाजनक पार्श्वभूमीवर…रोहित, कोहली व पुजारा हे त्रिकूट आता निवृत्त झालंय. शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या एका संक्रमण अवस्थेतून जातोय. त्यामुळं श्रीलंकेतील कसोटी मालिका भारतीय फलंदाजांसाठी एक मोठं आव्हान ठरेल. कारण तेथील संथ आणि चेंडू वळणाऱ्या खेळपट्ट्यांवर श्रीलंकेचे फिरकी गोलंदाज वर्चस्व गाजविण्याची शक्यता जास्त…
ते ओळखूनच भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं सराव सत्रांमध्ये फिरकी गोलंदाजीचा भरपूर सामना करता यावा यासाठी हर्ष दुबे, शिवांग कुमार, तनुष कोटियन व विपराज निगम या चार अतिरिक्त फिरकी गोलंदाजांना तिथं पाठविलंय. सरावाचे हे अतिरिक्त तास भारताच्या आक्रमक शैलीतील फलंदाजांना कितपत उपयुक्त ठरतात ते पाहावं लागेल. मर्यादित षटकांच्या सामन्यांनी भरलेल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या वेळापत्रकामुळं भारतीय फलंदाजांना देशांतर्गत कसोटी वा जास्त दिवसांच्या लढती खेळण्याची संधी फारच कमी प्रमाणात मिळायला लागलीय. ‘रेड बॉल’ सामन्यांचा पुरेसा सराव नसणं हेच त्यांच्या फिरकी गोलंदाजांविऊद्धच्या संघर्षामागील मुख्य इंगित…
कर्णधार गिल, के. एल. राहुल, यशस्वी जैस्वाल व रिषभ पंत यांच्यात फलंदाजीची जबरदस्त गुणवत्ता लपलीय. परंतु त्यांच्या कसोटी फलंदाजीवरही ‘व्हाईट बॉल’ क्रिकेटचा प्रभाव दिसून येतो…एके काळी तेंडुलकर, गांगुली, द्रविड आणि लक्ष्मण यांच्यासारखे फलंदाज आपल्या भक्कम तंत्राच्या आणि संयमाच्या जोरावर सुऊवातीची सत्रं निभावून नेत असत आणि त्यानंतर थकलेल्या गोलंदाजांवर आक्रमण केलं जायचं…आजची पिढी मात्र कठीण प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी लगेच प्रतिहल्ल्याचा मार्ग निवडू लागलीय…वीरेंद्र सेहवाग या शैलीचा बादशहा होता. शेन वॉर्न आणि मुथय्या मुरलीधरन यासारख्या सर्वकालीन महान फिरकी गोलंदाजांविऊद्ध कठीण खेळपट्ट्यांवर फिरकीच्या विऊद्ध फटके मारण्याची कला त्याला अवगत होती अन् त्यानं ते सातत्यानं करून दाखवलं. या भरात त्यानं कसोटी क्रिकेटमधील सलामीच्या फलंदाजीचं स्वरूप पार बदलून टाकलं असं म्हटल्यास ते वावगं ठरू नये…
कसोटी क्रिकेटमधील खेळपट्ट्या जोवर खराब होत नाहीत तोपर्यंत भारताच्या नवीन पिढीतील फलंदाजांचा खेळ पाहणं खरोखरच आनंददायी असतं. पण एकदा चेंडू अनपेक्षितरीत्या वळायला लागला की, चित्र पालटतं असं वारंवार पाहायला मिळालंय…श्रीलंकेतील संथ खेळपपट्ट्यावर यजमान संघाच्या फिरकी गोलंदाजांवर आक्रमक प्रहार करण्याची रणनीती सेहवागनं अत्यंत प्रभावीपणे वापरली असती…सध्याच्या पिढीतील सलामीवीर यशस्वी जैस्वालमध्ये तशीं क्षमता दडलीय. या 24 वर्षीय डावखुऱ्या फलंदाजानं आपल्या कसोटी कारकिर्दीची सुऊवात प्रभावीपणे केली. परंतु कसोटी क्रिकेटमध्ये भारताचा पुढील ‘सुपरस्टार’ म्हणून स्वत:चं स्थान पक्के करण्यासाठी त्याला मिळालेल्या चांगल्या सुऊवातीचं मोठ्या डावांत रूपांतर करावं लागेल, आपला संयम सिद्ध करावा लागेल. 15 ऑगस्टपासून सुरू होणारी श्रीलंकेविऊद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका पाच दिवसांच्या स्वरुपात पुढील पाऊल टाकण्यासाठी तो सज्ज आहे की नाही हे दाखवून देईल…
गेल्या पाच वर्षांहून अधिक काळापासून मायदेशात असो वा परदेशात, चांगल्या फिरकी गोलंदाजीसमोर भारताची फलंदाजी बऱ्याचदा कोलमडताना जशी दिसलीय त्याचप्रमाणं पाहुण्या संघांविऊद्ध भारताची बाजू रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांच्या दर्जेदार कामगिरीमुळंच सावरली गेली हे मान्य करावं लागेल. मायदेशातील भारताच्या पराभवांचं बारकाईनं विश्लेषण केल्यास एक गोष्ट स्पष्टपणे दिसून येते ती म्हणजे प्रतिस्पर्धी फिरकीपटूंच्या तुलनेत भारतीय फिरकी गोलंदाज सातत्यानं कमी पडणं…
ही मालिका भारतीय क्रिकेटमधील फिरकी गोलंदाजीची धुरा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवण्याच्या प्रक्रियेची खऱ्या अर्थानं नांदी ठरेल. त्याअनुषंगानं दीर्घकाळापासून संधीच्या प्रतीक्षेत असलेला कुलदीप यादव आता मुख्य भूमिकेत असेल…अश्विननंतर फिरकीची धुरा सहजपणे हस्तांतरित होईल अशी सर्वांना अपेक्षा होती, पण तसं अद्याप घडलेलं नाही. जडेजा आपल्या कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात पोहोचलाय. त्यामुळं कुलदीप आणि भारताच्या फिरकी गोलंदाजीचा वारसा पुढं नेणारा खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातंय तो मानव सुथार हे दोघे या आव्हानाला कसे सामोरे जातात हे पाहणं रंजक ठरेल…
विशेष म्हणजे मागील घरच्या हंगामात भारत अशा खेळपट्ट्यांवर खेळला ज्या फिरकीला पूर्णपणे अनुकूल नव्हत्या. त्यातच भारतीय फिरकी गोलंदाजांचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्याच्यासाठी धाक आहे त्या भेदकतेचीही कमतरता जाणवली..आपल्या स्पिनर्सनी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आणि ती म्हणजे फिरकीला अनुकूल खेळपट्ट्यांवर विसंबून न राहता आपली जबाबदारी पार पाडणं. मिच सँटनर व सायमन हार्मर यांनी भारतात कशी कामगिरी केली ते इथं लक्षात ठेवणं गरजेचं. त्यांनी योग्य गतीनं मारा केला अन् एखादा चौकार गेला, तरी आपली लय कधीच सोडली नाही. मायदेशातील त्या दोन मालिकांमध्ये भारतीय फिरकी गोलंदाजांना ते जमलं नाही !
भारताची श्रीलंकेतील कामगिरी…
एकूण कसोटी सामने : 24
विजय : 9
पराभव : 7
बरोबरी : 8
– राजू प्रभू
