मुंबई:नितेश तिवारी दिग्दर्शित बहुप्रतिक्षित ‘रामायणम्’ चित्रपटाच्या ट्रेलर समोर आल्यापासून संमिश्र अशा प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. ट्रेलर समोर आल्यानंतर सोशल मीडियावर कलाकारांच्या कपड्यांवरून (कॉस्ट्युम) मोठा वाद निर्माण झाला आहे. विशेषतः साई पल्लवी (सीता) आणि लारा दत्ता (कैकेयी) यांच्या लूकवर नेटकऱ्यांची चांगलीच टीका केली आहे.
रामायणम् मधील पात्रांच्या कपड्यांमध्ये आधुनिकतेचा प्रभाव असल्याचा आरोप करत नेटकरी टीका करत आहेत. आता या वादावर चित्रपटाचे मुख्य कॉस्ट्युम डिझायनर्स रिंपल आणि हरप्रीत नरुला यांनी मौन सोडलं आहे, त्यांनी प्रेक्षकांना घाईघाईने निष्कर्ष न काढण्याचं आवाहन केलं आहे.
आम्हाला अशा प्रतिक्रियांचा आधीच अंदाज आला होता
चित्रपटातील पात्रांच्या कपड्यांवर होणाऱ्या टीकेला उत्तर देताना रिंपल नरुला म्हणाल्या, “‘रामायण’ हे महाकाव्य आपल्या सर्वांच्या मनात आणि मानसिकतेत पिढ्यानपिढ्या वसलेलं आहे. त्यामुळं यातील व्यक्तिरेखांचे कपडे, कास्टिंग किंवा व्हीएफएक्स यांवर प्रत्येक व्यक्तीचं वेगळं मत असणारच, याची आम्हाला आधीपासूनच जाणीव होती.
आम्ही या टीकेसाठी मानसिकदृष्ट्या तयार होतो. आमच्या कामाशी आणि कलेशी आम्ही प्रामाणिक राहिलो आहोत, यामुळंच आमचा आत्मविश्वास कायम आहे, असंही त्यांनी म्हचलं.
पुरातात्विक पुराव्यांपेक्षा श्रद्धेला प्राधान्य
तर सीतामातेच्या (साई पल्लवी) वेशभूषेवर, विशेषतः ब्लाउजच्या डिझाईनवरून झालेल्या टीकेवर स्पष्टीकरण देताना डिझायनर्सनी सांगितलं की, त्रेतायुगातील कपड्यांचे कोणतेही जिवंत ऐतिहासिक किंवा पुरातात्विक पुरावे उपलब्ध नाहीत. जेव्हा मी डोळे मिटून सीतामातेचा विचार करते, तेव्हा माझ्या मनात मंदिरातील देवीचं जे रूप उभं राहतं, तेच मी पडद्यावर साकारण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी पुढं असंही सांगितलं की, रामायण हे वेगवेगळ्या काळात आणि संस्कृतीत आपापल्या परीने मांडलं गेलं आहे. नव्या पिढीशी संवाद साधू शकेल असं ‘रामायण’ उभं करणं हाच यामागील मुख्य उद्देश आहे.
रंगांमागील प्रतिकात्मक अर्थ
राणी कैकेयीच्या (लारा दत्ता) वेशभूषेबाबत हरप्रीत नरुला यांनी कपड्यांमधील रंगांचं महत्त्व स्पष्ट केलं. कैकेयीच्या वस्त्रांमधील हिरवा रंग हा तिच्यातील मातृत्वाचे प्रतीक आहे, तर गडद मरून रंग तिच्या मनातील भावनिक संघर्ष आणि तिनं घेतलेल्या कठीण निर्णयाची गडद बाजू दर्शवतो. ती तिचा मुलगा भरत आणि राम यांच्यातील प्रेमात अडकलेली आहे. चित्रपटातील प्रत्येक धाग्यामागे आणि रंगामागे एक सखोल विचार दडलेला आहे, असं हरप्रीत म्हणाले.
“आधी चित्रपट पाहा, मगच मत ठरवा”
‘पद्मावत’ आणि ‘हीरामंडी’ यांसारख्या भव्य प्रकल्पांसाठी कॉस्ट्युम डिझाईन करणाऱ्या या जोडीनं प्रेक्षकांना विनंती केली आहे की, केवळ काही सेकंदांचे ट्रेलर किंवा फोटो पाहून संपूर्ण डिझाईनवर टीका करू नका. चित्रपट जेव्हा मोठ्या पडद्यावर येईल आणि पात्रांचे भावनिक प्रसंग समोर येतील, तेव्हा प्रत्येक पोशाखामागचा हेतू प्रेक्षकांना नक्कीच समजेल. रणबीर कपूर, साई पल्लवी, लारा दत्ता, आणि यश अशी तगडी स्टारकास्ट असलेला हा चित्रपट यावर्षी दिवाळीच्या मुहूर्तावर रिलीज होण्यासाठी सज्ज आहे.
लेखकाबद्दलभाग्यश्री रसाळ“भाग्यश्री चंद्रकांत रसाळ, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदावर कार्यरत आहे. दोन महिन्यांसाठी इंटर्न म्हणून इथे सुरू झालेला हा त्यांचा प्रवास हा प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या पदापर्यंत पोहोचला आहे. या नऊ वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी कॉपी एडिटर, सिनिअर कॉपी एडिटर, डिजिटल कंटेंट प्रोड्युसर, सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर या वेगवेगळ्या पदांवर केले.
जनरल बातम्यांसोबत त्यांचा सुरू झालेला हा प्रवास लाइफस्टाइल, ऑटो, टेक अशा बातम्यांसोबत आता मनोरंजन क्षेत्रातल्या बातम्यांपर्यंत आला आहे. डिजिटल प्लॅटफॉर्मवर वाचकांची नस ओळखून आशय म्हणजेच कंटेंट तयार करण्यात हातखंडा आहे.
गेल्या तीन वर्षापासून मनोरंजन टीम हाताळताना या क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी त्यांना नव्याने शिकता आल्या. तसेच टीममधील इतरांसोबत ते अनुभव शेअर करता आले. या अनुभवांच्या जोरावर काम करतना त्यातून सर्वोत्तम निकालही त्यांना मिळवता आला. डिजिटल क्षेत्रात काम करताना प्रेक्षकांची दिशाभूल न करता पेज व्ह्यूज, युझर्सच्या स्पर्धेतही टिकून राहत राहण्यात त्यांचं विशेष कौशल्य आहे. या क्षेत्रातील नवनवीन गोष्टी, रंजकपणे वाचकांना समजेल अशा सोप्या भाषेत पोहोचवण्यासीठी त्या प्रयत्नशील असतात. त्यांनी सिनेइंडस्ट्रीतल्या फिल्मफेअर, मटा सन्मान यांसारख्या मानाच्या पुरस्कार सोहळ्यांचे लाइव्ह डिजिटल वार्तांकन केले आहे.
विविध विषयांवरच्या बातम्यांच्या लिखाणासोबतच सोशल मिडिया सांभाळण्याचा अनुभव.डिजिटल दिवाळी अंक, महिला दिन विशेष कव्हरेजमध्ये सहभाग. केंद्रीय अर्थसंकल्प, सेलिब्रिटींचे निधन अशा काळत सोशल मीडिया एकहाती हाताळण्याचा अनुभव. कामाची घेत दखल संस्थेअंतर्गतील वेगवेगळ्या तीन पुरस्कारांनी गौरव. काम करत असतानाच संस्थेअंतर्गत काही कौशल्य कोर्सेसही पूर्ण केले. यात फोटो शॉपसह इतक सॉफ्टवेअर शिकण्याची संधी मिळाली.त्यांनी केवळ मनोरंजनच नव्हे, तर ‘आईपणाचं डिप्रेशन’ (Postpartum Depression) यांसारख्या गंभीर आणि संवेदनशील सामाजिक विषयांवरही ब्लॉग लेखन केलं, ज्याला वाचकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.
पुरस्कार आणि गौरव
त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना आतापर्यंत संस्थेअंतर्गत तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
SNDT विद्यापिठातून बॅचलर ऑफ मास मिडिया पूर्ण केले आहे. या काळात मनोरंजन क्षेत्राशी जवळून ओळख झाली. आणि नंतर मुंबई विद्यापिठातून पत्रकारिता विषयात पदव्युत्तर पदवी संपादन केली.
आजच्या काळात जेव्हा माहितीचा ओघ प्रचंड आहे, तेव्हा विश्वासार्ह आणि रंजक माहिती देण्याचे काम भाग्यश्री रसाळ पार पाडत आहेत.… आणखी वाचा