वृत्तसंस्था, डंबुला
आयसीसीच्या ताज्या महिलांच्या टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत लंकेची कर्णधार चमारी अटापटूने सहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. सध्या लंका आणि पाक यांच्यात झालेल्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेत लंकेने पाकचा 2-1 अशा फरकाने पराभव केला.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात अटापटूने 39 धावा तर दुसऱ्या सामन्यात 40 धावा जमविल्या होत्या. टी-20 प्रकारात अटापटूकडून फलंदाजीत सातत्य राखल्याने तिचे फलंदाजांच्या मानांकन यादीतील स्थान वधारले असून ती सध्या सहाव्या स्थानावर आहे. या मानांकन यादीत ऑस्ट्रेलियाची सलामीची फलंदाज बेथ मुनी पहिल्या स्थानावर आहे. नुकत्याच झालेल्या आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत बेथ मुनीने मालिकावीराचा बहुमान पटकाविला होता.
पाकविरुद्धच्या टी-20 मालिकेविरुद्ध लंकेची फलंदाज इमिशा दुलानीने पहिल्या सामन्यात नाबाद शतक (101) झळकविले होते. टी-20 प्रकारातील दुलानीचे हे पहिले शतक असून या कामगिरीमुळे तिने या मानांकन यादीत 23 व्या स्थानावर झेप घेतली आहे. पाकची मुनीबा अली 30 व्या स्थानावर असून शेवाल झुलफीकार 52 व्या स्थानावर आहे. लंकेच्या महिला संघाने पाकविरुद्धच्या वनडे मालिकेतील शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात 8 गड्यांनी विजय मिळविला. या मालिकेत लंकेच्या हर्शिता समरविक्रमाने सर्वाधिक म्हणजे 173 धावा जमविल्या असून तिने या मालिकेतील शेवटच्या सामन्यात 73 धावा जमविल्या. त्यामुळे ती वनडे मानांकनात 13 व्या स्थानावर आहे. लंकेची हसिनी परेरा 35 व्या स्थानावर असून पाकची गुलफिरोजा 45 व्या स्थानावर, कर्णधार फातिमा सना 56 व्या स्थानावर आहे. गोलंदाजांच्या मानांकन यादीत पाकची फिरकी गोलंदाज नशारा संधूने दहाव्या स्थानावर झेप घेतली आहे. लंकेची अटापटू 31 व्या तर अष्टपैलू कविशा दिलहारी 33 व्या स्थानावर आहे.
