Shri Malanggad: जानेवारी महिन्यात श्री मलंगगडावर देशातील सर्वात लांब पल्ल्याची फ्युनिक्युलर ट्रॉली सेवा सुरू झाली. आता पायी प्रवास करणाऱ्यांसाठीही या मार्गाचा कायापालट करण्यात येत आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. वृत्तसंस्था, अंबरनाथ: अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर पोहोचताना भाविकांसाठी फ्युनिक्युलर ट्रॉली सेवा सुरू झाल्यानंतर आता पायी मार्गाने प्रवास करणाऱ्या स्थानिक व भाविकांसाठी दीर्घकाळ दुरवस्थेत असलेल्या पायऱ्यांचाही राज्य पर्यटन विभागाकडून विकास केला जात आहे. तीन टप्प्यांत जवळपास पाच कोटी रुपयांच्या निधीतून मलंगगडावर जाणाऱ्या मार्गावरील सुमारे साडेतीन हजार पायऱ्या बांधण्याचे काम सुरू आहे. तसेच उर्वरित पायऱ्यांचे बांधकामही लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.
काही महिन्यांपूर्वी फ्युनिक्युलर ट्रॉली सेवा सुरू
अंबरनाथ तालुक्यातील सह्याद्री पर्वतरांगांत वसलेल्या निसर्गसंपन्न श्री मलंगगडावर दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांना प्रवासातील गैरसोयींमुळे गेल्या अनेक वर्षांपासून खडतर मार्गाने जावे लागत होते. अखेर दीर्घ प्रतीक्षेनंतर काही महिन्यांपूर्वी फ्युनिक्युलर ट्रॉली सेवा सुरू झाल्याने गडावर जाणाऱ्या भाविकांची मोठी सोय झाली आहे. मलंगगडवाडी ते गडापर्यंत जाणाऱ्या सुमारे साडेतीन हजार पायऱ्यांचीही अनेक वर्षांपासून दुरवस्था होती. त्यामळे या मार्गावर व्यवसाय करणारे स्थानिक, साहित्य विक्रेते आणि पायी प्रवास करणारे भाविक यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. महाराष्ट्र राज्य पर्यटन विभागाच्या पुढाकाराने या पायऱ्यांच्या पुनर्बाधणीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हाती घेण्यात आले आहे.
या कामासाठी तीन टप्प्यांत सुमारे ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित कामासाठी आणखी चार कोटी रुपयांचा निधी प्रस्तावित असल्याची माहिती सार्वजनिक विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रशांत मानकर यांनी दिली. येत्या काही महिन्यांत दगडी पायऱ्यांचे संपूर्ण बांधकाम पूर्ण झाल्यानंतर, विशेषतः पावसाळ्यातही, स्थानिक आणि भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार आहे.
फ्युनिक्युलर ट्रॉली ते दर्या दरम्यानच्या मार्गाची दुरवस्था आणि अस्वच्छतेबाबत ‘महाराष्ट्र टाइम्स’ ने यापूर्वी बातमी प्रसिद्ध केली होती. त्यानंतर या मार्गाच्या विकासासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, काही स्थानिकांच्या विरोधामुळे कामात अडथळे निर्माण होत असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
लेखकाबद्दलसानिया कदमसानिया कदम या सध्या ‘मटा ऑनलाईन’मध्ये गेल्या सहा महिन्यांपासून कन्सल्टंट पदावर कार्यरत आहेत. २०२५ मध्ये बॅचलर्सचे शिक्षण पूर्ण करून त्यांनी नुकताच पत्रकारितेच्या क्षेत्रात प्रवेश केला आहे. लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, आंतरराष्ट्रीय घडामोडी तसेच इन्फ्रास्ट्रक्चर व नागरी विकासाशी संबंधित बातम्यांमध्ये त्यांना विशेष रस आहे.
पत्रकारितेतील व्यावसायिक कामाची ही त्यांची पहिलीच वेळ असली, तरी त्यांच्या पत्रकारितेच्या प्रवासाची सुरुवात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटमधून झाली. २०२४ मध्ये मुलुंड वाणिज्य महाविद्यालयातून बीएमएमचे शिक्षण घेत असताना प्राध्यापकांकडून त्यांची कॉलेज क्लब रिपोर्टर म्हणून नियुक्ती झाली आणि तेव्हाच ‘मटा’शी त्यांचा पहिला संबंध जोडला गेला.
यानंतर त्यांनी अनेक महिन्यांपर्यंत महाराष्ट्र टाइम्सच्या ‘मुंबई टाइम्स’ पुरवणीसाठी लेखन केले. कॉलेज विद्यार्थ्यांच्या दैनंदिन समस्या, सोशल मीडियावरील ट्रेंड्स तसेच एआयच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी अनेक लेख लिहिले. सोशल मीडियावर गाजलेल्या ‘घिबली आर्ट’ ट्रेंडवर तसेच परीक्षेच्या काळात विद्यार्थ्यांच्या आयुष्यात वाढत्या एआयच्या वापराबाबत लिहिलेल्या लेखांचे विशेष कौतुक झाले. या काळात महाराष्ट्र टाइम्स प्रिंटच्या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होत त्यांनी वृत्तांकनासाठीही हातभार लावला. २०२५ मधील ‘माय मराठी कला संगम’ तसेच महाराष्ट्र टाइम्सच्या ‘शोध युवा प्रतिमेचा’ या विशेष कार्यक्रमांचे त्यांनी वृत्तांकन केले. विद्यार्थ्यांशी आणि नव्या पिढीशी जोडून घेणाऱ्या, त्यांच्या दृष्टिकोनातून बातम्या मांडण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न राहिला.
२०२५ मध्ये बीएमएमचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी के.सी. महाविद्यालयातून एमए इन जर्नलिझमला प्रवेश घेतला आणि त्याचवेळी ‘मटा ऑनलाईन’मध्ये काम सुरू केले. येथे त्यांनी लोकल बातम्या, लाइव्ह ब्लॉग अपडेट्स, इन्फ्रास्ट्रक्चर व विकासकामे, तसेच सरकारी धोरणे यांवर विशेष प्राविण्य मिळवले.
लहानपणापासूनच मराठी आणि इंग्रजी भाषेत वाचन-लेखनाची आवड असल्याने इंग्रजी भाषेवर त्यांचे विशेष प्रभुत्व आहे. त्यामुळे इंग्रजीतील गुंतागुंतीच्या बातम्या मराठी वाचकांसाठी सोप्या, समजण्यासारख्या भाषेत मांडण्याचा त्यांचा सातत्यपूर्ण प्रयत्न असतो. डिग्रीपर्यंतचं शिक्षण इंग्रजी माध्यमातून केलं असून संपूर्ण महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला. शेवटच्या वर्षी, न्यूजरूम नावाच्या प्रोजेक्टसाठी एका वृत्तपत्राच्या संपादकांची मुलाखत घेणं आवश्यक होतं. त्यावेळी, मुंबई चौफेरचे संपादक श्री. प्रफुल्ल फडके यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान त्यांनी आपल्या 30 वर्षांच्या मराठी भाषेतील पत्रकारीतेच्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्यावेळी मराठी माध्यमातून पत्रकारिता करण्याची आवड निर्माण झाली. नंतर महाराष्ट्र टाईम्स प्रिंटमधल्या अनुभवामुळे ही आवड आणखी वाढली.… आणखी वाचा