Headlines

मुंबईसह राज्यातील पावसाच्या दुर्घटनांची उच्चस्तरीय चौकशी करा:दोषींवर कठोर कारवाईची विधानसभेत विजय वडेट्टीवार यांची मागणी




राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईसह अनेक भागांत घडलेल्या दुर्घटनांमध्ये निष्पाप नागरिकांना जीव गमवावा लागत असल्याचा मुद्दा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी विधानसभेत उपस्थित केला. या सर्व घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित अधिकारी आणि यंत्रणांची जबाबदारी निश्चित करावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी त्यांनी सरकारकडे केली. मुंबईतील दुर्घटनांवर सरकारला धारेवर विधानसभेचे कामकाज सुरू होताच वडेट्टीवार यांनी पावसामुळे मुंबईत घडलेल्या विविध दुर्घटनांकडे सरकारचे लक्ष वेधले. त्यांनी सांगितले की, गेल्या दोन दिवसांत मुंबईत मॅनहोलमध्ये पडणे, झाड कोसळणे आणि मानखुर्दमधील इमारत कोसळणे अशा विविध दुर्घटनांमध्ये तब्बल 12 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमुळे प्रशासनाच्या तयारीवर आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पूर्वतयारी झाली असती तर जीव वाचले असते पावसाळ्यापूर्वी धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण, धोकादायक झाडांची छाटणी, उघड्या मॅनहोलची सुरक्षितता, जलनिस्सारण व्यवस्थेची दुरुस्ती आणि आपत्कालीन परिस्थितीचा प्रभावी आराखडा तयार करण्यात आला असता, तर अनेक निष्पाप नागरिकांचे प्राण वाचू शकले असते, असे वडेट्टीवार यांनी सभागृहात नमूद केले. या दुर्घटनांमागील निष्काळजीपणाची जबाबदारी निश्चित होणे आवश्यक असून, केवळ चौकशीच्या घोषणा करून चालणार नाही, तर संबंधित अधिकाऱ्यांवर ठोस कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. मुंबई-पुणे मार्गावरील दरडींचाही मुद्दा उपस्थित मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्प परिसरात झालेल्या दरड कोसळण्याच्या घटनेचाही वडेट्टीवार यांनी सभागृहात उल्लेख केला. या घटनेमुळे मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली असून, जुना मुंबई-पुणे महामार्ग आणि घाट विभागातील रेल्वे वाहतुकीवरही त्याचा परिणाम झाल्याचे त्यांनी सांगितले. यापूर्वीही याच प्रकल्पात रस्त्यावरील खड्ड्यांचा प्रश्न समोर आला होता. आता दरड कोसळल्याने हजारो प्रवासी तासन्तास अडकून पडले असून नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या प्रकरणातही जबाबदारी निश्चित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सरकारने अधिकृत निवेदन करावे राज्यात निर्माण झालेल्या पूर आणि पावसाच्या गंभीर परिस्थितीबाबत राज्य सरकारने तातडीने अधिकृत निवेदन करून नागरिकांसमोर वस्तुस्थिती मांडावी. सध्या कोणत्या भागात काय परिस्थिती आहे, प्रशासनाकडून कोणत्या उपाययोजना सुरू आहेत आणि पुढील नियोजन काय आहे, याबाबत स्पष्ट माहिती देण्याची गरज असल्याचे वडेट्टीवार म्हणाले. ‘दोषींवर कठोर कारवाई करा’ मुंबईसह राज्यभर पावसामुळे झालेल्या सर्व दुर्घटनांची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित विभागांतील अधिकारी, यंत्रणा आणि जबाबदार व्यक्तींची जबाबदारी निश्चित करण्यात यावी. निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केली. काय आहे मानखुर्दची दुर्घटना? राज्यभर सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत आणखी एक भीषण दुर्घटना घडली आहे. मानखुर्दमधील जनता नगर परिसरात रविवारी रात्री तीन मजली कच्च्या चाळीचा भाग अचानक कोसळल्याने पाच निष्पाप लहान मुले आणि एका महिलेचा जागीच मृत्यू झाला, तर एक तरुण जखमी झाला आहे. ही चाळ धोकादायक असल्याने रहिवासी घरातील सामान बाहेर काढत असतानाच अचानक संपूर्ण बांधकाम कोसळल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. दुर्घटनेनंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF), मुंबई अग्निशमन दल, पोलीस, महानगरपालिका आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. युद्धपातळीवर बचावकार्य राबवून ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यात आले. आता बचावकार्य पूर्ण झाले असून ढिगारा हटविण्याचे काम सुरू आहे. रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली दुर्घटना रविवारी (5 जुलै) रात्री साडेआठच्या सुमारास मानखुर्दमधील हनुमान मंदिराजवळील जनता नगर परिसरातील चाळ क्रमांक 5 मध्ये ही दुर्घटना घडली. तळमजल्यासह तीन मजली कच्च्या बांधकामातील दोन ते तीन घरे क्षणार्धात कोसळली. ढिगाऱ्याखाली अनेक रहिवासी अडकले. माहिती मिळताच बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. जखमींना तातडीने गोवंडी येथील पंडित मदन मोहन मालवीय शताब्दी रुग्णालय आणि घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. 5 चिमुकले आणि एका महिलेचा मृत्यू डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, शताब्दी रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या एका महिलेसह तीन लहान मुली आणि एका लहान मुलाला मृत घोषित करण्यात आले. तर राजावाडी रुग्णालयात आणखी एका लहान मुलाचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. या दुर्घटनेत एकूण सहा जणांचा मृत्यू झाला असून एका तरुणावर उपचार सुरू आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत