सावंतवाडी प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यात प्राथमिक व माध्यमिक शाळांना वितरित करण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे आढळले आहे. माजगाव येथील भाईसाहेब सावंत माध्यमिक विद्यालयात मुलांना पोषण आहारामध्ये देण्यात येणाऱ्या हिरव्या वाटाण्यांना कीड लागल्याचा प्रकार आज चक्क सावंतवाडी पंचायत समितीच्या मासिक बैठकीत पंचायत समिती सदस्य जितेंद्र गावकर यांनी उघड केला. “तालुक्यातील सर्व शाळांमध्येच असे निकृष्ट दर्जाचे धान्य वितरित होत आहे, हे धान्य तात्काळ बंद करा,” अशा सूचना सभापती सुश्मिता जाधव व उपसभापती गौरव मुळीक यांनी दिल्या आहेत. सदर ठेकेदाराचे बिल अदा करू नये आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. सावंतवाडी पंचायत समितीची मासिक बैठक आज तालुका स्कूलमध्ये घेण्यात आली. या बैठकीला निकृष्ट दर्जाच्या धान्याचा मुद्दा जितेंद्र गावकर यांनी उपस्थित करत सदर निकृष्ट दर्जाचे धान्य पंचायत समितीमध्ये पुरावा म्हणून दाखल केले. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली. सर्व सदस्यांनीही अशा निकृष्ट दर्जाचे धान्य मुलांना वितरित केले जात असेल तर ते धोक्याचे आहे, त्यामुळे सदर प्रकरणाची चौकशी होण्याची मागणी केली.
“तालुक्यात स्मार्ट मीटर बसवण्यास आमचा विरोध नाही, परंतु ज्यादा वीज बिल येत आहे त्याला आमचा विरोध आहे. सदर महावितरणने याबाबत तोडगा काढावा,” असे उपसभापती गौरव मुळीक यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे मायकल डिसोजा यांनी स्मार्ट मीटरला विरोध असल्याची भूमिका मांडली, तसेच सर्व सदस्यांनीही त्याला होकार दिला. परंतु, सभापती सुश्मिता जाधव यांनी, “शासनाचे धोरण आहे स्मार्ट मीटर बसवण्याचे, त्यामुळे असा विरोधी ठराव घेता येणार नाही. आमदार दीपक केसरकर यांच्या कानावर आपण ही बाब घालू, त्यावर आपण तोडगा काढू,” असे स्पष्ट केले. उपसभापती यांनी, “वीज बिल जादा येत आहे त्यामुळे लोकांचा विरोध आहे, त्यावर महावितरणने विचार करावा,” असे म्हटले.
मळगाव, नेमळे व रेल्वे स्थानकाला देण्यात येणाऱ्या तिलारी पाणी योजनेच्या मुद्द्यावरून आमदार दीपक केसरकर यांनी उपसभापती गौरव मुळीक यांना ‘अभ्यास काय आहे?’ असा मुद्दा उपस्थित केला होता. हा मुद्दा आज पंचायत समितीच्या मासिक बैठकीत प्रकर्षाने आला. जीवन प्राधिकरण व जलजीवन मिशन या दोन्ही विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित योजनेचे अंदाजपत्रक आम्ही केल्याचे स्पष्ट केले. “मात्र, सदर योजना ही जलजीवन मिशनमधून होणे कठीण आहे, मग ही योजना नेमकी कोणासाठी? असा माझा प्रश्न होता,” असे मुळीक यांनी सूचित केले. आजच्या बैठकीला सर्वच सदस्यांनी वीज प्रश्नावरून आक्रमक भूमिका मांडली.
