Mohammed Shami News : जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे श्रीलंका कसोटी मालिकेतून बाहेर पडल्यानंतर भारताने आकिब नबीला संधी दिली. या निर्णयानंतर अनुभवी मोहम्मद शमीच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

३५ वर्षीय शमीला पुन्हा एकदा कसोटी संघातून बाहेर ठेवण्यात आल्यानंतर त्याचे आंतरराष्ट्रीय करिअर आता जवळपास संपल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने गेल्या काही काळापासून शमीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. त्याने २०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतासाठी अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तर कसोटी क्रिकेटमध्ये त्याला २०२३ नंतर एकदाही संधी मिळालेली नाही.
रणजीत ३७ विकेट्स आणि दमदार कामगिरी; तरीही संधी नाही
शमीची संघात निवड होत नसल्यामागे सुरुवातीला फिटनेस हे मुख्य कारण सांगितले जात होते. मात्र, त्यानंतर त्याने सातत्याने देशांतर्गत क्रिकेट आणि आयपीएलमध्ये खेळून स्वतःची फिटनेस सिद्ध केली. मागील रणजी ट्रॉफी हंगामात त्याने ७ सामन्यांत तब्बल ३७ विकेट्स घेण्याचा कारनामा केला. या काळात तीन वेळा एकाच डावात ५ विकेट्स घेण्याची किमयाही त्याने साधली. तब्बल २३०.३ षटके टाकून त्याने आपल्या तंदुरुस्तीबाबत निवड समितीला ठोस संदेश दिला होता.
इतकेच नाही तर आयपीएल २०२६ मध्येही शमीने १३ सामन्यांत १२ विकेट्स टिपल्या होत्या. मात्र, एवढी चमकदार कामगिरी करूनही त्याला भारतीय संघात स्थान देण्यात आले नाही.
आकिब नबीला मिळाली मोठी संधी
जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे बाहेर पडल्यानंतर निवड समितीने अनुभवी शमीऐवजी युवा आकिब नबीवर विश्वास दाखवला. जम्मू-काश्मीरच्या या स्टार वेगवान गोलंदाजाने सलग दोन रणजी हंगामांत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. त्यामुळे त्याच्या निवडीची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत होती आणि अखेर त्याला भारतीय कसोटी संघात स्थान मिळाले.
शमीची आकडेवारी आजही अव्वल
मोहम्मद शमीची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आकडेवारी पाहिली तर ती आजही थक्क करणारी आहे. शमीने भारतासाठी ६४ कसोटी सामने खेळताना २२९ विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या नावावर ६ वेळा एका डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम आहे. एकाच सामन्यात ९ विकेट्स ही त्याची कसोटीतील सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्येही शमीचा दबदबा राहिला आहे. १०८ एकदिवसीय सामन्यांत त्याने २०६ विकेट्स घेतल्या असून वनडे क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात ७ विकेट्स घेणारा तो भारताचा एकमेव गोलंदाज आहे. तसेच १६ वेळा ४ विकेट्स घेण्याचाही मोठा विक्रम त्याच्याच नावावर जमा आहे.
दरम्यान, याच महिन्यात होणाऱ्या प्रतिष्ठित ‘दुलीप ट्रॉफी’साठी East Zone संघात निवड झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत क्रिकेटमधील त्याच्या कामगिरीकडे आणि त्याच्या भविष्यातील पावलांकडे आता सर्व क्रीडाप्रेमींचे लक्ष असणार आहे.

