![]()
मंगळवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास शिवसेनेत (शिंदे) प्रवेश करणारे उद्धवसेनेचे आमदार सचिन अहिर यांची बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास महाराष्ट्र विधान परिषदेचे १७ वे उपसभापती म्हणून निवड झाली. उद्धवसेनेचे उमेदवार जगन्नाथ अभ्यंकरांनी माघार घेतल्याने
.
‘योग्य वेळी योग्य निर्णय घेणारेच यशस्वी ठरतात. आणि अहिर त्यात पारंगत आहेत’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री शिंदेंनी अहिर यांचे कौतुक करताना उद्धव ठाकरेंचे नाव न घेता टोला लगावला की, ‘नेतृत्व सिद्ध करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. लोकांच्या अडीअडचणीला धावून जावे लागते.’ सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर देताना उपसभापतिपदासाठी इच्छुक नीलम गोऱ्हेंना टोला लगावत उद्धवसेनेचे आमदार अनिल परब म्हणाले की, ‘अहिर यांच्या रूपातील बुलडोझरने अनेकांच्या स्वप्नांचा चक्काचूर केला.’ तत्पूर्वी परिषदेतील संख्याबळ महायुतीच्या बाजूने असल्याने अहिर यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र संसदीय परंपरा जपत विरोधकांनी अर्ज मागे घ्यावा, असे आवाहन संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. त्याला प्रतिसाद देत परब यांनी अभ्यंकर यांच्या माघारीची घोषणा केली.
खा. संजय दिना पाटलांनी मध्यरात्री गेम चेंज केला अन् आ. अहिर शिवसेनेत दाखल झाले
विधान परिषद उपसभापतिपदासाठी शिवसेनेकडून (शिंदे) कृपाल तुमाने, नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदेंची नावे सोमवारी रात्रीपर्यंत चर्चेत होती. मात्र, नुकतेच शिवसेनेत दाखल झालेले खा. संजय दिना पाटील यांनी मध्यरात्री गेम चेंज केला आणि अहिर शिवसेनेत दाखल झाले. सूत्रांनी सांगितले की, बंडखोरीनंतर खासदार संजय राऊत यांनी खा. पाटील यांच्यावर गलिच्छ भाषेत टीका केली होती. त्याला तसेच उत्तर पाटील यांनी दिले. पण राऊत तसेच उद्धवसेनेला धक्का देण्याचेही त्यांनी त्याच वेळी ठरवले. एकेकाळी खा. पाटील आणि अहिर राष्ट्रवादीत एकत्र काम करत होते. त्या जुन्या नात्याचा वापर करत पाटील यांनी शिंदेंशी सल्लामसलत करून सोमवारी मध्यरात्री अहिरांशी संपर्क साधला आणि पहाटेच्या सुमारास अहिरांनी पक्षांतराचा अंतिम निर्णय घेतला.
आता दुसरा सचिन नव्या इनिंगसाठी सज्ज : शिंदे
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सचिन अहिरांच्या कार्यशैलीचे कौतुक करत त्यांची तुलना सचिन तेंडुलकरशी केली. ते म्हणाले की, एक सचिन क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे, तर दुसरा सचिन नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे.
अहिर म्हणजे गोपालक, निर्भीड व्यक्ती : फडणवीस
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, राजकारणात योग्य वेळी योग्य निर्णय घेणे अत्यंत महत्त्वाचे असते आणि अहिर हे त्यात पारंगत आहेत. अहिर या शब्दाचा अर्थ गोपालक आणि निर्भीड असा आहे. त्यांच्या कामातही ती निर्भीडता दिसून आली आहे.
उद्धवसेनेच्या माघारीने बिनविरोध निवड
उपसभापतिपदाच्या निवडणुकीपूर्वी विधान भवन परिसरात प्रवेश करताना सचिन अहिर. त्यांच्यासोबत आमदार सदाभाऊ खोतही उपस्थित होते.
