MT Jalveer Ship Attack Near Oman Coast: ओमानच्या खाडीत व्यापारी जाहाजांवरील हल्ले सुरूच असून, सेटेबेलोवरील अमेरिकन हल्ल्यात 3 भारतीय खुलाशांच्या मृत्यूनंतर आता एमटी जलवीर जहाजावरही आणखी एक हल्ला झाल्याने भारताची चिंता वाढली आहे.

शिनास बंदरगाहाजवळ घडली घटना
दरम्यान, ओमानमधील भारतीय दूतावासाने सोशल मिडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (X) या घटनेची माहिती दिली. दूतावासाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘ओमानच्या शिनास बंदरगाहाजवळ एमटी जलवीर जाहाजाबाबत घडलेल्या घटनेची आम्हाला गुरुवारी सकाळी माहिती मिळाली. आम्ही या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करत असून, अधिक माहिती मिळवण्यासाठी स्थानिक ओमान प्रशासनाशी आणि अधिकाऱ्यांशी सतत समन्वय साधून आहोत.’
या आधीही घडली होती अशीच घटना
एमटी जलवीर वरील हा हल्ला होण्याच्या अवघ्या एक दिवस आधी, म्हणजेच बुधवारी, ओमानच्या खाडीत सेटेबेलो या तेलवाहू टँकरवर अमेरिकेकडून लष्करी हल्ला करण्यात आला होता. या सेटेबेलो जाहाजावरील हल्ल्यात तीन भारतीय खलाशांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची पुष्टी केंद्रीय जहाजबांधणी आणि बंदरे मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी गुरुवारी केली. या आधीच्या हल्ल्यानंतर तीन भारतीय नाविक बेपत्ता झाले होते, ज्यांचा या लष्करी कारवाईत मृत्यू झाला आहे. सेटेबेलो टँकरवर एकूण 24 भारतीय नागरिक स्वार होते, त्यापैकी 21 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे.
भारताचा अमेरिकेकडे तीव्र निषेध
गेल्या 24 तासात घडलेल्या या हृदयद्रावक घटनांमुळे भारताने अत्यंत आक्रमक आणि कडक राजनैतिक निर्णय घेतला आहे. नवी दिल्लीने अमेरिकेचे प्रभारी जेसन मीक्स यांना तात्काळ समन्स बजावून परराष्ट्र मंत्रालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत आणि या हल्ल्यांबाबत तीव्र निषेध नोंदवला. परराष्ट्र मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव नागराज नायडू यांनी अमेरिकेच्या या लष्करी कारवाईवर आणि व्यापारी जहाजांवरील भारतीय नागरिकांच्या सुरक्षेबाबत भारताची अत्यंत गंभीर चिंता अमेरिकेसमोर मांडली.
पश्चिम आशियातील संघर्ष कारणीभूत?
दरम्यान, परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या अधिकृत निवदेनात ओमानच्या किनारपट्टीवर व्यापारी जहाजांवर होणाऱ्या या हल्ल्यांचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. पश्चिम आशियामध्ये सध्या सुरू असलेल्या युद्धाचा आणि संघर्षाचा थेट परिणाम या व्यापारी मार्गांवर होत असून, व्यापारी जहाजांना लक्ष्य करणे अत्यंत चिंताजनक असल्याचे भारताने म्हटले आहे. आता एमटी जलवीरवर नुकत्याच जालेल्या हल्लयामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर या सागरी मार्गाच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच पेटण्याची शक्यता आहे.

