![]()
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते, असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात चर्चेला सुरुवात झाली आहे. या वक्तव्यावर गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी प्रतिक्रिया देत, आता दिवंगत नेत्याच्या जुन्या राजकीय घडामोडींवर चर्चा करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे. ‘आता त्यावर बोलण्यात औचित्य नाही’ पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेस प्रवेशाबाबतचा दावा केला असला, तरी पंकजा मुंडे यांनी त्यावर फारसे भाष्य करणे टाळले. गोपीनाथ मुंडे आज हयात नसल्याने त्यांच्याविषयी अशा वैयक्तिक राजकीय चर्चेत जाणे योग्य नसल्याचे त्यांनी सांगितले. आपल्या वडिलांचा राजकीय प्रवास भाजपशी जोडलेला होता आणि त्यांनी कमळाच्या चिन्हासोबतच आपली राजकीय कारकीर्द पूर्ण केली, असेही पंकजा मुंडे यांनी नमूद केले. ‘पृथ्वीराज बाबांनी आदरानेच नाव घेतले असेल’ पंकजा मुंडे यांनी पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याकडे नकारात्मक पद्धतीने पाहिले नसल्याचेही स्पष्ट केले. काँग्रेस नेते आपला किंवा आपल्या कुटुंबाचा उल्लेख करताना अनादर करण्याच्या हेतूने बोललेले नाहीत, असे त्यांनी म्हटले. विजय वडेट्टीवार यांनीही आपल्याबाबत मत व्यक्त केले असले, तरी त्यांचा हेतू अनादर करण्याचा नसल्याचे पंकजा मुंडेंनी सांगितले. ‘मी नाराज नाही, माझ्या जनतेसाठी काम करते’ दरम्यान, आपण पक्षात नाराज असल्याच्या चर्चांनाही पंकजा मुंडेंनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. एखाद्या कार्यक्रमातील वक्तव्याचा संदर्भ बाजूला ठेवून त्यावरून वेगळा अर्थ काढला जात असल्याचे त्यांनी म्हटले. आपण नाराज किंवा निराश नसून आपल्या जनतेसाठी काम करण्यावर लक्ष केंद्रित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘आधी राष्ट्र, मग पक्ष’ गोपीनाथ मुंडे यांनी भाजपची संघटना उभी करण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यामुळे त्यांच्या राजकीय वारशाकडे पाहताना पक्ष आणि संघटनेशी असलेले नाते लक्षात घेणे महत्त्वाचे असल्याचे पंकजा मुंडे यांनी सांगितले. “आधी राष्ट्र आहे, मग पक्ष आहे,” अशी भूमिका मांडत त्यांनी सध्या पक्षबदलाचा कोणताही संकेत दिलेला नाही. ‘अर्थाचे अनर्थ करू नका’ आपल्या अलीकडील काही वक्तव्यांचा माध्यमांकडून वेगळा अर्थ काढला जात असल्याची नाराजीही पंकजा मुंडेंनी व्यक्त केली. बंजारा समाजासंदर्भातील आपल्या वक्तव्याचाही विपर्यास झाल्याचे त्यांनी म्हटले. वक्तव्याचा मूळ संदर्भ समजून न घेता त्यातून वेगळे अर्थ काढल्याने गैरसमज निर्माण होतात, त्यामुळे अर्थाचा अनर्थ करू नये, असे आवाहन त्यांनी केले. हेही वाचा.. ‘गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते’: सोनिया गांधींचीही परवानगी होती, पृथ्वीराज चव्हाणांचा मोठा गौप्यस्फोट; नेमके काय म्हणाले? सध्या राज्यात आणि देशात भाजपचे मोठे राजकीय वर्चस्व असून सत्तेसाठी अनेक नेते व पक्ष सत्ताधाऱ्यांसोबत जाण्यास उत्सुक असल्याचे चित्र आहे. ज्याचा प्रत्यय नुकताच ठाकरेंच्या शिवसेनेतील काही खासदारांनी एकनाथ शिंदे गटात केलेल्या प्रवेशावरून आला. राजकारणातील याच बदलत्या संस्कृतीच्या आणि इतिहासाच्या चर्चांदरम्यान, राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते आणि त्याबाबतचे सर्व काही निश्चित झाले होते. मात्र, ऐनवेळी त्यांचा हा पक्षप्रवेश का रद्द झाला, यामागची पडद्यामागची माहिती चव्हाण यांनी आता उघड केली आहे. सविस्तर वाचा
Source link
गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये जाणार होते?:पृथ्वीराज चव्हाणांच्या दाव्यावर पंकजा मुंडे म्हणाल्या- माझे वडील कमळात जन्मले अन् कमळातच विसावले
