मराठी अभिनेत्री जुई गडकरीने तिच्या यूट्यूब व्लॉगमध्ये झटपट तयार होणाऱ्या नो ऑनियन, नो गार्लिक भरली वांगीची खास रेसिपी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कमी साहित्य आणि कमी वेळात बनणारी ही पारंपरिक महाराष्ट्रीयन भाजी डब्यासाठीही उत्तम पर्याय असल्याचं तिने सांगितलं. चविष्ट आणि सात्विक असलेली ही रेसिपी सध्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

व्हिडिओच्या सुरुवातीलाच जुई म्हणते, “आज मी पहिल्यांदाच माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला माझी आवडती रेसिपी करून दाखवणार आहे. भरली वांगी मला खूप आवडतात आणि ही रेसिपी अगदी झटपट तयार होते. सकाळच्या धावपळीत डबा बनवायचा असतो, त्यामुळे मी अशाच पटकन होणाऱ्या रेसिपीज जास्त करते.” विशेष म्हणजे ही भाजी कांदा आणि लसूण न वापरता तयार केली जाते. (फोटो सौजन्य :- @Jui Gadkari)
भरली वांग्याच्या मसाल्यासाठी लागणारे साहित्य
या रेसिपीची खासियत म्हणजे त्यातील सुगंधी मसाला. जुईने घरात सहज उपलब्ध असणाऱ्या साहित्यापासून हा मसाला तयार केला आहे.
साहित्य:
लहान आकाराची वांगी
दीड वाटी ताजं खवलेलं ओलं खोबरं
३ ते ४ चमचे गोडा मसाला
घरचा मिक्स मसाला (ऐच्छिक)
शेंगदाण्याचं कूट
गूळ
हिंग
चवीनुसार मीठ
भरपूर ताजी चिरलेली कोथिंबीर
तेल
मसाला तयार करण्याची पद्धत
सर्वप्रथम एका भांड्यात ताजं खवलेलं खोबरं घ्यावं. त्यात गोडा मसाला, घरचा मिक्स मसाला, गूळ, हिंग, शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि भरपूर कोथिंबीर घालावी. त्यानंतर हा मसाला हातानेच व्यवस्थित एकजीव करून घ्यावा. यावेळी जुई एक खास टिपही देते. ती म्हणते, “एखाद्या पदार्थाला हाताची चव हवी असेल तर तो हातानेच एकजीव करायला हवा.” त्यामुळे मसाला चमच्याने न मिसळता हाताने मळून घेतल्यास सर्व चव एकत्र येते.
वांग्यांमध्ये मसाला कसा भरायचा?
भरली वांगी करण्यासाठी लहान आकाराची वांगी निवडावीत. प्रत्येक वांग्याला खालीपर्यंत न कापता चार चिरा द्याव्यात. कापल्यानंतर वांगी मिठाच्या पाण्यात काही वेळ ठेवावीत. त्यामुळे त्यांचा रंग बदलत नाही आणि कडूपणाही कमी होतो.यानंतर तयार केलेला मसाला प्रत्येक वांग्याच्या चिरांमध्ये व्यवस्थित भरावा. मसाला आतपर्यंत गेला पाहिजे, त्यामुळे प्रत्येक घासात भरपूर चव मिळते.
फोडणी आणि शिजवण्याची पद्धत
एका कढईत तेल चांगलं गरम करून त्यात फक्त हिंगाची फोडणी द्यावी. त्यानंतर मसाला भरलेली वांगी अलगद कढईत ठेवावीत. उरलेला मसाला वांग्यांच्या भोवती पसरून टाकावा. त्यामुळे शिजताना मसाल्याची चव अधिक छान लागते.कढईवर झाकण ठेवून मंद आचेवर वांगी शिजू द्यावीत. साधारण पाच मिनिटांनी वांगी हलक्या हाताने परतावीत. पुन्हा झाकण ठेवून वाफेवर शिजवावीत. जुईच्या मते ही भाजी अवघ्या १५ ते २० मिनिटांत तयार होते.
जुई गडकरी भरली वांगी रेसिपी
गावठी वांग्यांची चवच वेगळी
व्हिडिओमध्ये जुईने गावठी वांग्यांचाही उल्लेख केला आहे. ती सांगते की, मुंबईत नेहमी गावठी वांगी मिळत नाहीत, त्यामुळे उपलब्ध असलेली वांगी ती वापरते. मात्र, कर्जत किंवा गावाकडे गेल्यावर मिळणाऱ्या हिरव्या गावठी वांग्यांची चव काही वेगळीच असते ती म्हणते, “गावाकडची भाजी आणि तिथली वांगी यांना एक वेगळीच चव असते. शक्य असेल तर हीच रेसिपी गावठी वांग्यांपासून करून बघा.”

