Team India Support Staff News : टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा बदल होणार आहे. रेयान टेन डोशेट आणि टी. दिलीप यांचा करार संपला असून श्रीलंका दौऱ्याआधी नव्या फील्डिंग कोचची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. या पदासाठी कोणाचं नाव आघाडीवर आहे?
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोशेट आणि फील्डिंग कोच टी. दिलीप यांचा बीसीसीआय सोबतचा करार संपला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव देवजीत सैकिया यांनी मंगळवारी ‘पीटीआय’शी बोलताना स्पष्ट केले की, बोर्ड या दोघांच्याही कराराची मुदत पुढे वाढवणार नाही. आगामी श्रीलंका दौऱ्यासाठी बीसीसीआय लवकरच नवीन फील्डिंग कोचच्या नावाची घोषणा करणार आहे.
शुभदीप घोष सर्वात पुढे
सैकिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या पदासाठी दोन ते तीन नावांवर चर्चा सुरू आहे. सूत्रांनुसार, भारतीय महिला संघ आणि ‘इंडिया-ए’ संघाचे माजी सपोर्ट स्टाफ सदस्य शुभदीप घोष हे या शर्यतीत सर्वात पुढे मानले जात आहेत. ते टी. दिलीप आणि डोशेटे यांची जागा घेण्याची दाट शक्यता आहे. त्यांनी २०२१ मधील ऑस्ट्रेलिया दौऱ्यात महिला संघाचे क्षेत्ररक्षण सुधारण्याचे काम केले आहे.
दरम्यान, सैकिया म्हणाले, “सहाय्यक प्रशिक्षक टेन डोशेट यांचा दोन वर्षांचा करार १० जून रोजी संपला होता, तर एक वर्षाची मुदतवाढ मिळालेले फील्डिंग कोच टी. दिलीप यांचा करार ८ जून रोजीच पूर्ण झाला होता. इंग्लंड दौरा संपेपर्यंत बीसीसीआयने या दोघांना संघासोबत ठेवले होते. पण आता त्यांच्या कराराची मुदत वाढवली जात नाहीये. त्यांचा करार आधीच संपल्यामुळे राजीनामा स्वीकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.”
रायन टेन डोशेट हे स्वतःही हे पद सोडण्याच्या विचारात होते. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या आग्रहाखातर त्यांना संघात जोडण्यात आले होते आणि त्या वेळी त्यांना फील्डिंग कोचची जबाबदारी देण्याचे आश्वासन मिळाले होते. पण गेल्या दोन वर्षांत त्यांना संघात कोणतीच स्पष्ट भूमिका देण्यात आली नव्हती. दुसरीकडे, टी. दिलीप यांना २०२५ च्या इंग्लंड कसोटी मालिकेपूर्वी एका वरिष्ठ खेळाडूच्या आग्रहास्तव एक वर्षाची मुदतवाढ मिळाली होती. मात्र, त्यांच्या कामगिरीवर संघ व्यवस्थापन फारसे समाधानी नव्हते.
खराब फील्डिंगमुळे प्रश्न
आयर्लंड आणि इंग्लंडच्या दौऱ्यात भारतीय खेळाडूंच्या खराब फील्डिंगमुळे टी. दिलीप यांच्या कराराची मुदत वाढवण्याची शक्यता जवळपास संपली होती. सैकिया यांनी नाव न घेता सांगितले की, “आम्ही सध्या दोन-तीन उमेदवारांशी चर्चा करत आहोत आणि येत्या एक-दोन दिवसांत अंतिम निर्णय होईल. श्रीलंका दौऱ्यावर भारतीय संघासोबत नवीन फील्डिंग कोच असेल.”
आसामचे शुभदीप घोष हे राहुल द्रविड यांच्या नॅशनल क्रिकेट अकादमीतील कार्यकाळापासून, म्हणजे गेल्या ६-७ वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा भाग आहेत. त्यामुळे या पदासाठी त्यांचा दावा सर्वात मजबूत मानला जात आहे.
लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.… आणखी वाचा