विराट कोहलीच्या डाएटमुळे छोले भटुरे आणि राजमा चावलसारखे पारंपरिक पदार्थ आरोग्यासाठी वाईट आहेत का, असा प्रश्न अनेकांना पडतो. प्रत्यक्षात वजन वाढण्यामागे एकच पदार्थ नसून जास्त कॅलरीज, कमी शारीरिक हालचाल आणि चुकीची जीवनशैली कारणीभूत असते. टोफू आणि पनीरमधील फरक, तळलेले पदार्थ किती प्रमाणात खावेत, पोटावरील चरबीची खरी कारणे आणि वजन कमी करताना आवडीचे पदार्थ पूर्णपणे सोडणे योग्य आहे का, याबाबत तज्ज्ञांचे वैज्ञानिक मार्गदर्शन जाणून घ्या.

छोले भटुरे किंवा राजमा चावलने वजन वाढते का?
घरगुती पद्धतीने बनवलेले छोले भटुरे किंवा राजमा चावल हे मुळात आरोग्यासाठी हानिकारक नसतात.
- कॅलरी असंतुलन : वजन किंवा पोटाची चरबी वाढणे हे अन्न हॉटेलचे आहे की घरचे, यावर अवलंबून नसून आपण गरजेपेक्षा जास्त कॅलरीज किती घेतो यावर अवलंबून असते.
- पोषक घटक : राजमा आणि छोले हे वनस्पतीजन्य प्रथिने, फायबर आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्सचा उत्तम स्त्रोत आहेत.
- भटुरे आणि तेल : भटुरे मैद्याचे असतात आणि डीप-फ्राय (तळलेले) केलेले असतात, त्यामुळे त्यात कॅलरीज आणि अनहेल्दी फॅट्स जास्त असतात. जर हे पदार्थ मर्यादित प्रमाणात आणि अधूनमधून खाल्ले तर वजन वाढत नाही. परंतु, रोज जास्त प्रमाणात तळलेले पदार्थ खाणे आणि व्यायाम न करणे यामुळे वजन वाढू शकते.
पनीरऐवजी टोफू आणि जास्त सॅलड खाणे खरोखर फायदेशीर आहे का?
पनीर आणि टोफू हे दोन्ही प्रथिनांचे उत्तम स्त्रोत आहेत, परंतु त्यांच्या पोषक तत्त्वांमध्ये थोडा फरक आहे:
- टोफू विरुद्ध पनीर : टोफूमध्ये सॅच्युरेटेड फॅट्स आणि कॅलरीज कमी असतात आणि ते वनस्पतीजन्य प्रथिने देते. दुसरीकडे, पनीरमध्ये प्रथिने आणि कॅल्शियम भरपूर असले तरी त्यात (विशेषतः फुल-फॅट पनीरमध्ये) सॅच्युरेटेड फॅट्स जास्त असतात.
- संतुलित दृष्टीकोन : आहारातून कोणताही पदार्थ पूर्णपणे वगळण्याऐवजी टोफू, डाळी, मोड आलेली कडधान्ये, बीन्स आणि दुग्धजन्य पदार्थ या सर्वांचा आहारात समावेश करावा. सॅलड आणि भाज्यांमधील फायबरमुळे पचनशक्ती सुधारते आणि पोट भरलेले राहते.
तेलकट किंवा तळलेले घरगुती अन्न खाल्ल्याने पोटावर चरबी साचते का?
कोणताही एक विशिष्ट अन्नपदार्थ फक्त पोटावर चरबी जमा करण्यासाठी कारणीभूत ठरत नाही.
- पोटाच्या चरबीची कारणे : पोटाभोवती चरबी साचण्यामागे अती कॅलरीजचे सेवन, व्यायामाचा अभाव, अपुरी झोप, सततचा ताण,हार्मोन्स असंतुलन आणि जनुकीय (Genetic) कारणे असतात.
- तळलेले अन्न : डीप-फ्राय केलेल्या पदार्थांमध्ये कॅलरीज जास्त असतात, ज्यामुळे नकळत जास्त खाल्ले जाते. दररोजच्या स्वयंपाकात जास्त तेल, तूप किंवा लोणी वापरल्याने अन्नातील कॅलरीज वाढतात. त्यामुळे अशा पदार्थांचे सेवन मर्यादित ठेवणे गरजेचे आहे.
तेलकट किंवा तळलेले पदार्थ खाताना कोणती काळजी घ्यावी?
पारंपारिक आवडते पदार्थ खात असतानाही निरोगी जीवनशैली जपण्यासाठी खालील साध्या टिप्स पाळाव्या:
- प्रमाणावर नियंत्रण : आवडते अन्न पूर्णपणे बंद करण्याऐवजी ते कमी प्रमाणात खा.
- तळलेले पदार्थ अधूनमधून खा : डीप-फ्राय केलेले पदार्थ रोजच्या ऐवजी सण-समारंभापुरते मर्यादित ठेवा.
- सॅलड आणि दह्याचा वापर : जास्त कॅलरी असलेल्या अन्नासोबत सॅलड, भाज्या किंवा दही खा, जेणेकरून पोट लवकर भरेल.
- गव्हाचा वापर : मैद्याऐवजी गव्हाचे किंवा मल्टीग्रेन पीठ वापरा.
- गोड पेये टाळा : तेलकट अन्नासोबत गोड पेये (Cold Drinks/Sugary Drinks) पिणे पूर्णपणे टाळा आणि नियमित व्यायाम करा.
आवडीचे अन्न पूर्ण सोडल्याने वजन वेगाने कमी होते का?
आवडते पदार्थ पूर्णपणे बंद करण्याची अजिबात गरज नसते. उलट, अति-कडक डाएट केल्याने नंतर त्या पदार्थांची तीव्र इच्छा होते आणि माणूस जास्त खातो.
- संयम आणि समतोल : अधूनमधून आवडीचे पदार्थ कमी प्रमाणात खाल्ल्याने आहारातील शिस्त टिकून राहते आणि वजनाचे ध्येयही साध्य होते.
- खेळाडूंची तुलना करू नका : विराट कोहलीसारख्या खेळाडूंचे वर्कआउट, ट्रेनिंग आणि शरीराची गरज सामान्य माणसापेक्षा खूप वेगळी असते. त्यांच्या डाएटचे आंधळे अनुकरण करण्याऐवजी स्वतःच्या जीवनशैलीला मानकेल असा शाश्वत आहार घ्यावा.
छोले भटुरे आणि राजमा चावल यांसारखे घरगुती पदार्थ भारतीय संस्कृतीचा भाग आहेत आणि त्यांना घाबरण्याची अजिबात गरज नाही. अन्नाला ‘चांगले’ किंवा ‘वाईट’ असे लेबल लावण्याऐवजी आहाराचा समतोल साधा. आवडीचे पदार्थ अधूनमधून आनंदाने खा, पण रोजच्या आहारात भरपूर भाज्या व प्रथिनांचा समावेश करा, तळलेले पदार्थ मर्यादित ठेवा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहा.
आम्ही या लेखाचे पुनरावलोकन कसे केले
आमची टीम आरोग्य आणि वेलनेसविषयी सतत नवे व उपयुक्त लेख तयार करते. प्रत्येक लेख वैद्यकीय तज्ज्ञांच्या सल्ल्याने लिहिला जातो, त्यामुळे दिलेली माहिती विश्वासार्ह आणि अचूक असते.
- नवीन आवृत्ती
- Jul 28, 2026, 01:41 PMMedically Reviewed byAmreen Sheikh
- Jul 28, 2026, 01:41 PMWritten byप्रतीक्षा सुनील मोरेमहाराष्ट्रटाइम्स.कॉम
