Oshiwara Man Drove Police Car off Costal Road reckless Crime News; आधी मित्राची कार दामटवली, मग थेट पोलिसांचं वाहन पळवून कोस्टल रोडवर धुमाकूळ, अनेक वाहनांना धडक, माथेफिरु ताब्यात
Oshiwara Man Drove Police Car off Costal Road reckless Crime News; आधी मित्राची कार दामटवली, मग थेट पोलिसांचं वाहन पळवून कोस्टल रोडवर धुमाकूळ, अनेक वाहनांना धडक, माथेफिरु ताब्यात
Man Drove Police Car off Costal Road : दत्ता आधी आपल्या मित्राची कार चालवत असताना कोस्टल रोडच्या बोगद्यात शिरला. वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने गाडी चालवत असल्याने अतिवेगवान मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी धोका निर्माण झाला.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : दक्षिण मुंबईतील कोस्टल रोड परिसरात गुरुवारी पहाटे एक विचित्र घटना घडली. एक तरुण वाहतूक पोलिसांची नवी कोरी कार घेऊन पसार झाला. हे समजताच पोलिसांनी त्याचा पाठलाग सुरू केला. पोलिसांना चुकविण्यासाठी हा तरुण वाटेत येणाऱ्या वाहनांना धडक देत गाडी दामटत होता. अखेर मलबार हिल परिसरात पोलिसांनी त्याला पकडले. या प्रकरणी गावदेवी पोलिस अधिक तपास करीत आहेत.
नेमकं काय झालं?
कोस्टल रोड परिसरात ताडदेव येथे एक चालक विरुद्ध दिशेने कार चालवत असल्याची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाली. या चालकाला पोलिसांनी कारसह ताब्यात घेतले. उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या या चालकाला पोलिसांनी उलटसुलट प्रश्न केले. दत्ता नाव सांगणाऱ्या या तरुणाने तो चालवत असलेली कार त्याची नसल्याचे सांगितले. पोलिस चौकीत नेऊन अधिक चौकशी केली जात असताना या तरुणाने तेथून पळ काढला. पोलिस त्याच्या मागावर होते.
कोस्टल रोडच्या ठिकाणी वाहतूक पोलिस गुरुवारी कर्तव्य बजावत होते. पोलिसांच्या गाडीचा चालक जवळच असलेल्या शौचालयात गेला होता. याचवेळी दत्ता पुन्हा कोस्टल रोडवर गेला. पोलिसांच्या गाडीमध्ये कुणी नसल्याचे पाहून आणि चावी गाडीलाच दिसल्याने दत्ता आत शिरला. चालक कॉन्स्टेबल परत येण्याआधीच तो गाडी घेऊन पळाला.
अनेक वाहनांना धडक
चालकाने वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवले. पोलिसांच्या गाडीचा क्रमांक व माहिती वायरलेसच्या माध्यमातून आजूबाजूच्या पोलिस ठाण्यांना देण्यात आली. पोलिसांनी दत्ता याचा पाठलाग करून त्याला थांबण्यास सांगितले. मात्र, पोलिसांचे काहीही न ऐकता तो अधिक वेगात गाडी चालवत होता. या दरम्यान त्याने अनेक वाहनांना धडक दिली, गाडी दुभाजकाला घासली, पोलिसांनी लावलेल्या बॅरिकेड्स आणि पोलिसांच्या अन्य गाडीलाही त्याने धडक दिली. पोलिसांनी पाठलाग सुरू ठेवत अखेर मलबार हिल परिसरात दत्ताला गाठले.
दत्तात्रय झांझुर्टे असे ४५ वर्षीय आरोपी तरुणाचे नाव आहे. तो ओशिवरा भागातील रहिवासी आहे. प्राथमिक माहितीनुसार, दत्ता आपल्या मित्राची कार चालवत असताना कोस्टल रोडच्या बोगद्यात शिरला आणि वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने गाडी चालवली; यामुळे या अतिवेगवान मार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहन चालकांसाठी धोका निर्माण झाला.
तपास अधिकारी वरळी, महालक्ष्मी आणि मलबार हिल येथील तसेच कोस्टल रोड बोगद्यातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घटनाक्रमाची पुनर्रचना करत आहेत. तसेच, झांझुर्टे याला त्याच्या मित्राची कार कशी मिळाली आणि त्याने बोगद्यामध्ये वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने गाडी चालवण्यास का सुरुवात केली, याचीही ते तपासणी करत आहेत.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा