Ratnagiri News : रत्नागिरीच्या चिपळूण येथील वाशिष्टी नदीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कपडे धुण्यासाठी गेलेल्या एका महिलेवर मगरीने हल्या केला. पण आपल्या पोटच्या लेकीच्या धाडसाने आईचे प्राण वाचले आहेत. 10 वर्षीय लेकीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
वाशिष्टी नदी महिलेवर मगरीचा हल्ला(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रत्नागिरी : कोकणात रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथील वाशिष्ठी मुखेड येथील जगबुडी नदीत मगरींचा प्रचंड प्रमाणात वावर आहे. हा मगरींचाच वावर आता नागरिकांच्या जीवावर बेतण्याची भीती व्यक्त होत आहे. अशीच एक दुर्दैवी घटना चिपळूण शहराजवळील वालोपे येथे घडली आहे. सुदैवाने चिमुकलीच्या धाडसामुळे आईचे प्राण वाचले आहेत अन्यथा ‘वेळ आली होती, पण काळ आला नव्हता’ असाच मोठा बाका प्रसंग निर्माण झाला होता.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, चिपळूण तालुक्यातील वालोपे-गणेशवाडी येथे वाशिष्ठी नदीच्या काठावर काल गुरुवारी सायंकाळी अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली. कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या नंदिनी भुपेंद्र पवार (वय 35) यांच्यावर दबा धरून बसलेल्या मगरीने अचानक हल्ला केला. मगरीने त्यांचा पाय जबड्यात पकडून त्यांना पाण्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत नंदिनी यांनी काठावरील दगड घट्ट पकडून ठेवला. त्याचवेळी हा प्रकार पाहणाऱ्या त्यांच्या अवघ्या 10 वर्षांच्या मुलीने धाडस दाखवत आईचा हात पकडून तिला पाण्याबाहेर खेचलं. त्यामुळे नंदिनी यांचा जीव वाचला. 10 वर्षांच्या लेकीनं दाखवलेलं धाडस कौतुकास्पद ठरलं असून तिच्यामुळे आईचा जीव वाचला आहे.
मगरीने नंदिनी यांच्या पायाचा जबड्यात पकड घेत त्यांना खोल पाण्याकडे ओढण्यास सुरुवात केली. अचानक झालेल्या या हल्ल्यानं घाबरलेल्या नंदिनी यांनी आरडाओरड करत काठावरील मोठा दगड पकडला. आईला मगर पाण्यात ओढत असल्याचं लक्षात येताच त्यांची लेक स्वर्णी घाबरून न जाता तातडीनं आईच्या मदतीला धावली. तिने आईचा हात घट्ट पकडून आपल्या परीने सर्व ताकद लावत तिला पाण्याबाहेर खेचलं. या चिमुकलीच्या प्रसंगावधानामुळे आणि धाडसामुळे नंदिनी पवार यांचा जीव वाचला. या घटनेत जखमी झालेल्या नंदिनी यांना तातडीनं कामथे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नंदिनी पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस
घटनेची माहिती मिळताच चिपळूणचे वनपरिक्षेत्र अधिकारी सरवर खान यांनी वनविभागाच्या पथकासह कामथे रुग्णालयात धाव घेतली. वनपाल एस. एस. सावंत, वनरक्षक के. डी. इरमले, वनरक्षक रा. भा. गुंटे, लिपिक एस. ए. कलावंत आणि आरआरटी सदस्य अथर्व घाग यांनी रुग्णालयात जाऊन नंदिनी पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच त्यांना धीर देत वनविभाग त्यांच्या पाठीशी असल्याचं सांगितलं. वन परिक्षेत्र अधिकारी गिरीजा देसाई यांनीही या सगळ्या घटनेची माहिती घेतली आहे नागरिकांनी नदीकिनारी जाताना काळजी व आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाशिष्ठी नदी परिसरात मगरींचा वावर वाढल्यानं नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, असं आवाहन वनविभागानं केलं आहे. नदीत पोहणं, कपडे किंवा जनावरे धुण्यासाठी पाण्यात जाणं टाळावं. तसेच लहान मुलांना नदीकाठावर अथवा पाण्यात जाऊ देऊ नये, असं वनपरिक्षेत्र अधिकारी सरवर खान यांनी सांगितलं. दरम्यान, संकटाच्या क्षणी आईचा जीव वाचवण्यासाठी धाडस दाखवणाऱ्या 10 वर्षीय स्वर्णीचं सर्वत्र कौतुक होत आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा