किलो वजनाच्या सिलिंडर दरातही कपात
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
व्यावसायिक (कमर्शियल) उपयोगाच्या गॅस सिलिंडरच्या दरात 183.50 रुपयांनी कपात करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे 5 किलो वजनाच्या सिलिंडरचा दरही घटविण्यात आला आहे. त्यामुळे उद्योगांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. घरगुती स्वयंपाक सिलिंडरच्या दरात मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे इंधन तेल आणि इंधन वायूचे दर कमी झाल्याने भारतातील तेल वितरण कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. काही काळानंतर पेट्रोल आणि डिझेलचे दरही कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, ही शक्यता मध्यपूर्वेतील परिस्थितीवर अवलंबून असेल, असे स्पष्टीकरणही करण्यात आले.
व्यापारी गॅस सिलिंडरचा नवा दर 1 जुलैपासून लागू झालेला आहे. पाच किलो वजनाच्या प dरी ट्रेड एलपीजी (एफटीएल) सिलिंडरच्या दरातही 5 रुपयांची कपात करण्यात आली आहे. या दरकपातीनंतर आता व्यापारी सिलिंडरची किंमत साधारणत: 2,900 रुपये झाली आहे. प्रत्येक गावात स्थानिक करांच्या अनुसार ही किंमत कमी किंवा जास्त असू शकते. 5 किलो एफटीएल सिलिंडरची किंमतही आता राजधानी दिल्लीत साधारणत: 808.50 रुपये इतकी झाली आहे.
आखाती युद्धामुळे दरवाढ
अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे भारताच्या तेल आणि वायू पुरवठ्यात मोठा अडथळा निर्माण झाला होता. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या इंधन तेलाचे दर प्रतिबॅरल 120 डॉलर्सपर्यंत पोहचले होते. तसेच नैसर्गिक इंधन वायूच्या दरातही मोठी वाढ झाली होती. त्यामुळे एप्रिलमध्ये व्यापारी सिलिंडरच्या दरात एकदम 900 रुपयांनी वाढ करण्यात आली होती. आता दरात काहीशी कपात करण्यात आली असली, तरी युद्धपूर्व स्थितीला हे दर येण्यास अद्याप काही कालावधी लागणार आहे. दर टप्प्याटप्प्याने कमी होण्याची शक्यता दिसत आहे.
खाद्यपदार्थांच्या किमतीवर परिणाम
एप्रिलमध्ये इंधन वायू सिलिंडरच्या दरात 900 रुपयांनी वाढ केल्याने हॉटेलांमधील खाद्यपदार्थांच्या दरांमध्येही मोठी वाढ झाली आहे. हे दर युद्धपूर्व स्थितीला येण्यासही वेळ लागणार आहे. कारण 1 जुलैपासून गॅसच्या दरात झालेली घट फारशी अधिक नाही. त्यामुळे खाद्यपदार्थांचे तर त्वरित कमी होण्याची शक्यता नाही. तथापि, पुढच्या काळात परिस्थिती अनुकूल राहिल्यास गॅसचे दर आणखी कमी होऊ शकतात. त्यानंतर खाद्यपदार्थांचे दरही उतरण्याची शक्यता आहे.
