Headlines

एन. रघुरामन यांचा कॉलम:आपल्या आयुष्यात ‘ह्युमनॉइड्स’चा ‘तडका’ लागू लागला आहे




आपल्या आयुष्यात ह्युमनॉइड्सचा भरपूर ‘तडका’ आपल्या विचारापेक्षाही लवकर लागणार आहे. तो आधीपासूनच लागत आहे. चिनी ह्युमनॉइड रोबोट आता फक्त फॅक्टरी, वेअरहाऊस किंवा लॅबपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. ते आता खेळासारख्या क्षेत्रातही पाऊल ठेवत आहेत, ज्यामध्ये निर्विवादपणे माणसांचे वर्चस्व राहिले आहे. या आठवड्यात बीजिंगमध्ये झालेल्या वर्ल्ड ह्युमनॉइड रोबोट गेम्सच्या दुसऱ्या पर्वात 2 हजारांहून अधिक ह्युमनॉइड रोबोट्सनी सहभाग घेतला. 5 दिवस चाललेल्या या आयोजनात 51 इव्हेंट्स झाले, ज्यामध्ये टेबल टेनिस, फुटबॉल आणि ॲथलेटिक्सचा समावेश होता. याचे महत्त्व रोबोट्सच्या परस्पर मुकाबल्यामुळे नाही, तर त्या गतीमुळे आहे, ज्या वेगाने ते मानवी शारीरिक क्षमतांची नक्कल करू लागले आहेत. इव्हेंटच्या रिपोर्ट््समध्ये तर असेही सांगण्यात आले की, ह्युमनॉइड्स माणसांच्या ॲथलेटिक रेकॉर्ड््सना आव्हान देत आहेत. यामध्ये उसेन बोल्टच्या 100 मीटर स्प्रिंट रेकॉर्डचाही समावेश आहे. ही शर्यत ह्युमनॉइड रोबोटने 9.39 सेकंदात पूर्ण करून जमैकाच्या बोल्टने 2009 मध्ये बनवलेला 9.58 सेकंदांचा विक्रम मोडला. एक्स-ह्युमनॉइड कंपनीच्या रोबोटने 14.5 मीटर प्रति सेकंद एवढा कमाल वेग गाठला. रोबोट गेम्सच्या 3 दिवस आधी आर्थिक जगतानेही आणखी एक संकेत दिला की, हे तंत्रज्ञान कोणत्या दिशेने जात आहे. चिनी ह्युमनॉइड रोबोट उत्पादक ‘युनिट्री रोबोटिक्स’ने शांघाय ट्रेडिंग पदार्पणात 460% ची उसळी घेतली आणि कंपनीचे बाजारमूल्य सुमारे 51 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचले. कंपनीच्या या शानदार पदार्पणात ह्युमनॉइड रोबोटिक्सबद्दलच्या मोठ्या अपेक्षा आणि या क्षेत्रात चीनची ग्लोबल लीडर बनण्याची महत्त्वाकांक्षा प्रतिबिंबित होते. युनिट्रीच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंगसाठी सर्वाधिक ओव्हर-सबस्क्रिप्शन झाले. या दरम्यान कंपनीत हिस्सेदारी मिळवण्यासाठी 98 लाख गुंतवणूकदारांनी अर्ज केले, पण 5 हजारांपैकी 1 पेक्षा कमी गुंतवणूकदारच यशस्वी होऊ शकले. ‘युशू टेक्नॉलॉजी’ हे अधिकृत नाव असलेल्या या कंपनीचे नेतृत्व 36 वर्षीय मेकॅनिकल इंजिनिअर वांग शिंगशिंग करत आहेत. या दोन्ही घटना एकत्र पाहिल्या तर त्यातील संदेशाकडे दुर्लक्ष करणे कठीण आहे- ह्युमनॉइड्स आता फॅक्टरीच्या फ्लोअरवरून आपल्या दैनंदिन आयुष्यात येत आहेत. अनेक वर्षे प्रामुख्याने हीच चर्चा होती की, रोबोट्स वारंवार केल्या जाणाऱ्या कामांमध्ये माणसांची जागा घेऊ शकतात. आपण रोबोटला कार असेंबल करताना, खोके इकडून तिकडे नेताना, लादी पुसताना किंवा जेवण वाढताना पाहत होतो. पण पुढचा टप्पा याहून अधिक व्यापक असू शकतो. ह्युमनॉइड्स रुग्णालये, घरे, हॉटेल्स, रिटेल स्टोअर्स आणि ऑफिसेसचा भाग बनू शकतात. ते वृद्धांना मदत, धोकादायक कामे, मुलांचा अभ्यास, पाहुण्यांचे मनोरंजन व माणसांना साहाय्य यांसारखी कामे करू शकतात. आता खेळातही एक नवी शक्यता दिसत आहे- मनोरंजनाचे क्षेत्रही मशीन्ससाठी मैदान बनू शकते. अशा भविष्याची कल्पना करा, ज्यामध्ये ह्युमनॉइड फुटबॉल लीग, रोबोट मॅरेथॉन किंवा रोबोट बॉक्सिंग लोकांचे प्राइम-टाइम मनोरंजन बनेल. स्टेडियम्स मानव व मशीनचा नाही, तर मशीन्सचा मशीन्ससोबतचा सामना पाहण्यासाठी भरू शकतात, ज्यामध्ये माणसे आपल्या आवडत्या रोबोटसाठी चीअर करतील. आज हे सायन्स फिक्शन वाटू शकते. पण बीजिंग गेम्स सांगतात की, हे सायन्स फिक्शन किती लवकर प्रेक्षकांचा खेळ बनू शकते. त्यामुळे खरा बदल केवळ हा नाही की ह्युमनॉइड्स उत्तम रोबोट बनत आहेत, तर हा आहे की ते अशा ठिकाणी पोहोचू लागले आहेत, ज्यांना आपण खास माणसांच्या जागा मानत होतो. आणि इथेच आपल्यासमोर एक मोठा प्रश्न उभा राहतो- जसजशा मशीन्स माणसांसारख्या होत जातील तसतशी माणसेही मशीन्ससारखी होतील का? आधीच आपण स्वतःला वेग, कार्यक्षमता, उत्पादकता आणि कामगिरीच्या निकषावर मोजत आहोत व या गुणांमध्ये मशीन्स वेगाने आपल्यापेक्षा सरस ठरत आहेत. खरे आव्हान कदाचित ह्युमनॉइड्सशी त्यांच्या क्षेत्रात मुकाबला करण्याचे नाही, तर त्या मूल्यांना वाचवण्याचे आहे, जी आपल्याला माणूस बनवतात- सहानुभूती, कल्पकता, विनोदबुद्धी, करुणा, कुतूहल आणि बदल्यात काहीही मिळण्याची अपेक्षा न ठेवता काळजी घेण्याची क्षमता. जसजसे ह्युमनॉइड्स चालणे, धावणे, खेळणे व मनोरंजन करणे शिकत जातील तसतसे आपल्याला ठरवावे लागेल की भविष्यात आपल्याला मशीन्ससारखे बनायचे आहे की जाणीवपूर्वक अधिक माणूस बनून राहायचे आहे. फंडा असा की, ह्युमनॉइड्सचा ‘तडका’ आता लागणार नाहीये, तर तो आधीच लागला आहे. मॉर्गन स्टॅनलीचा अंदाज आहे की, या वर्षी चीनचे ह्युमनॉइड्स शिपमेंट 50 हजारांचे असेल, जे 2030 पर्यंत वाढून 4.40 लाखांहून अधिक होईल.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत