याच हृदयद्रावक सत्यघटनेवर आणि नैसर्गिक आपत्तीवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट ‘एक होतं माळीण‘ येत्या २४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. काळ कसा येईल, काही सांगता येत नाही. पाऊस पडावा म्हणून आदल्याच रात्री प्रार्थना करून पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील माळीणचे गावकरी शांतपणे झोपी गेले होते. ३० जुलै २०१४ रोजी अतिवृष्टी झाली. गावावर दरड कोसळली आणि काही क्षणांत संपूर्ण गाव मातीखाली गाडले गेले. अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली, असंख्य जीव कायमचे हरपले आणि महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ती दुर्घटना इतिहासात नोंदली गेली. या घटनेचा केवळ थरार दाखवण्याऐवजी तिच्यामागील मानवी वेदना, संघर्ष आणि आयुष्य उद्ध्वस्त झालेल्या लोकांची मानसिक घालमेल पडद्यावर प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटातून करण्यात आला असल्याचे या चित्रपटाचे दिग्दर्शक, सहनिर्माते दत्तात्रय गायकर यांनी सांगितले.
राजू राणे यांना माळीणची ही घटना अस्वस्थ करत होती. या घटनेवर चित्रपट यावा, त्यातून या घटनेच्या वेदना आपण लोकांपर्यंत पोहोचवाव्यात, असं त्यांनी ठरवलं. मात्र, निर्मिती सोपी नव्हती. कारण, नैसर्गिक आपत्ती दाखवायची, तर सर्वकाही वास्तववादी हवे होते. त्यासाठी पुन्हा ते गाव उभे करणे, साथीला व्हीएफएक्स असा मोठा टास्क होता. मात्र, मनात जिद्द होती. राजू राणे व त्यांच्या सहकाऱयांनी सर्वप्रथम घटनेचा अभ्यास सुरू केला. चित्रपटाच्या निर्मितीपूर्वी माळीणमधील बचावलेल्या ग्रामस्थांशी अनेकदा संवाद साधला. त्यांच्या आठवणी, अनुभव आणि भावना जाणून घेतल्या. त्यामुळे चित्रपटातील प्रत्येक प्रसंग वास्तवाशी प्रामाणिक राहील, यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. निर्मितीदरम्यान अडचणी भरपूर आल्या. मात्र, मेहनत अन् जिद्दीने या अडचणींवर मात केली.
बदलापूरजवळ माळीण गावाचा भव्य सेट उभारण्यात आला. सेटमधील प्रत्येक घर, प्रत्येक रस्ता, परिसरातील वातावरण आणि गावाची रचना इतकी वास्तववादी होती की, प्रत्यक्ष गावकऱ्यांनाही काही क्षण वास्तव आणि चित्रपटातील जग यातला फरक जाणवेनासा झाला.
या चित्रपटामागे तब्बल सात ते आठ वर्षांचे अथक संशोधन, नियोजन आणि मेहनत आहे. आधुनिक व्हीएफएक्स, प्रभावी छायांकन, वास्तवाला साजेसे कलादिग्दर्शन आणि भावनिक संगीत यांच्या साहाय्याने माळीण दुर्घटनेची तीव्रता पडद्यावर प्रभावीपणे साकारण्यात आली आहे. हा चित्रपट केवळ एका नैसर्गिक आपत्तीची कथा सांगत नाही, तर एका गावाच्या अस्तित्वाची, हरवलेल्या स्वप्नांची आणि दुःखातून पुन्हा उभे राहण्याच्या मानवी जिद्दीची कहाणी सांगतो.
‘एक होतं माळीण’ हा केवळ मनोरंजनासाठी बनवलेला चित्रपट नाही; तर महाराष्ट्राच्या सामूहिक स्मृतीतील एका काळ्याकुट्ट अध्यायाला संवेदनशील आदरांजली असल्याचे दत्ता गायकर सांगतात. माळीणच्या जखमा आजही पूर्णपणे भरलेल्या नाहीत. मात्र, त्या वेदनेला प्रामाणिकपणे पडद्यावर मांडण्याचा हा प्रयत्न प्रेक्षकांच्या मनाला स्पर्श केल्याशिवाय राहणार नाही, असा निर्माते, दिग्दर्शकांचा दावा आहे.
संतोष जगन्नाथ म्हात्रे यांनी टीमवर विश्वास ठेवून यांनी या चित्रपटाची निर्मिती केली. रूपेश राणे, अरुण कोंजे, दत्तात्रय गायकर, राजू राणे हे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची संकल्पना, कथा, पटकथा राजू राणे यांची असून, दत्तात्रय गायकर आणि राजू राणे यांनी चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शनाची बाजू सांभाळली आहे. प्रशांत मोहिते, अश्विनी कासार, अभिजित श्वेतचंद्र, सिद्धी पाटणे, अनिल नगरकर, प्रशांत तपस्वी, रामचंद्र धुमाळ, अक्षय म्हात्रे, दीपज्योती नाईक, अनुज ठाकरे आदी कलावंतांनी यात भूमिका साकारल्या आहेत. राजा फडतरे यांचे छायांकन, युवराज गोंगले यांचे गीतलेखन आणि संगीत दिग्दर्शन आहे. अजय गोगावले, जावेद अली, आनंदी जोशी, हरिदास शिंदे यांनी यातील गाणी गायली आहेत. कला नितेश नांदगावकर, व्हीएफएक्स रहमान अब्दुल्ला यांचे आहेत. महेश भारंबे हे कार्यकारी निर्माते आहेत. विशाल बुराडे, मेहुल हुमणे, निसर्गप्रेमी धनंजय कोकणे, योगेश कोकणे, अजित सावंत यांनी या कलाकृतीच्या निर्मितीसाठी साहाय्य केले आहे. या चित्रपटाच्या टिझरवरून या कलाकृतीची भव्यदिव्यता, तांत्रिक श्रीमंती आणि मेहनत दिसून येते.
Ujjwal Nikam On Sanjay Dutt : ‘संजय दत्त 1993 चा बॉम्बस्फोट थांबवू शकला असता, तो दहशतवादी नव्हता’, उज्ज्वल निकम यांचा दावा
सेट काढताना सगळेच भावूक
चित्रीकरण आटोपल्यानंतर बदलापूरजवळ उभारण्यात आलेला सेट हटविण्याची तयारी सुरू झाली. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून माळीण, तेथील घटना आणि त्याचा हुबेहूब सेट यांच्याशी संपूर्ण युनिटच्या भावना जुळलेल्या होत्या. तो सेट निघताना पाहून सर्वजण भावूक झाले होते, अशी आठवणही दत्तात्रय गायकर यांनी सांगितली.

