ओरोस : छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालय, किर्लोस-ओरोस येथील कृषीकन्या अनुजा गिते, सृष्टी राऊळ, दिया.पी, अतुल्या.एम कृषी कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत अणाव गावात वास्तव्यास असून विविध कृषी विस्तार उपक्रम राबवत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अणाव येथे आयोजित शेती शाळेमध्ये शेतकऱ्यांना उपयुक्त व अपायकारक कीटकांची ओळख व त्यांचे व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमात कृषिसहाय्यक सौ. स्नेहा सामंत यांनी शेतकऱ्यांना पिकांमध्ये आढळणाऱ्या उपयुक्त व अपायकारक कीटकांची ओळख, त्यांचा पिकांवरील परिणाम तसेच समन्वित कीड व्यवस्थापनाच्या उपाययोजनांची सविस्तर माहिती दिली. कृषीकन्यांनीही शेतकऱ्यांशी संवाद साधत आधुनिक कीड व्यवस्थापन तंत्रज्ञानाची माहिती दिली आणि शेतकऱ्यांच्या विविध शंकांचे निरसन केले.
या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना उपयुक्त कीटकांचे संवर्धन, अपायकारक कीटकांचे योग्य नियंत्रण आणि रासायनिक कीटकनाशकांचा संतुलित वापर याबाबत महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. कार्यक्रमास परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
छत्रपती शिवाजी कृषी महाविद्यालयाच्या कृषीकन्या पुढील काही महिन्यांच्या वास्तव्यात गावामध्ये विविध कृषी, ग्रामीण विकास व जनजागृतीपर उपक्रम राबविणार असून शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देणार आहेत.
