Headlines

मराठमोळ्या अभिनेत्री शुभा गोडबोले यांची कॅन्सरशी झुंज:केमोथेरपीनंतरच्या 'केमो कर्ल्स'ची भावुक पोस्ट चर्चेत




अभिनेत्री मेधा मांजरेकर यांनी नुकतेच कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती देत उपचारातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण केल्याचे सांगितले होते. त्यानंतर आता आणखी एक प्रसिद्ध मराठी अभिनेत्री कॅन्सरशी झुंज देत असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेत्री शुभा गोडबोले यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमधून त्यांच्या कॅन्सरवरील उपचारांचा आणि केमोथेरपीनंतर झालेल्या बदलांचा अनुभव चाहत्यांसोबत शेअर केला आहे. शुभा गोडबोले यांनी सोशल मीडियावर स्वतःचे काही नवे फोटो पोस्ट करत त्यांच्या नव्या कुरळ्या केसांबद्दल लिहिले. किमोथेरपीमुळे उपचारादरम्यान त्यांचे सर्व केस गळून गेले होते. मात्र उपचारानंतर पुन्हा आलेले केस आधीपेक्षा पूर्णपणे वेगळे आणि कुरळे असल्याचे त्यांनी सांगितले. ‘केमो कर्ल्स’बद्दल शुभा गोडबोले काय म्हणाल्या? पोस्टमध्ये त्या म्हणतात, “माझे नवीन कुरळे केस… माझ्या आधीच्या केसांपेक्षा अगदीच वेगळे आहेत. किमोथेरपीनंतर येणाऱ्या या कुरळ्या केसांना ‘केमो कर्ल्स’ म्हणतात, हे मला गुगलवर शोधल्यानंतर कळलं. किमोथेरपीदरम्यान पूर्णपणे केस गळून गेल्यानंतर अनेकांच्या बाबतीत पुन्हा येणारे केस कुरळे असतात. काहींचे केस नंतर पुन्हा आधीसारखे होतात, तर काहींचे कायम कुरळेच राहतात.” पुढे त्या लिहितात, “बहुतेक माझे ‘केमो कर्ल्स’ आता कायमचेच राहणार आहेत. मात्र मला अजूनही ठरवता येत नाही की मला आधीचे केस जास्त आवडतात की हे नवे कुरळे केस.” त्यांची ही पोस्ट वरवर पाहता हलक्याफुलक्या शैलीत असली, तरी कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी लढताना त्यांनी अनुभवलेल्या वेदना आणि सकारात्मकतेने केलेला सामना यातून स्पष्टपणे दिसून येतो. चाहत्यांनीही त्यांच्या धैर्याचे कौतुक करत लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. गेल्या वर्षी झाले होते कॅन्सरचे निदान शुभा गोडबोले यांना गेल्या वर्षी कॅन्सरचे निदान झाले होते. त्यानंतर त्यांच्यावर नियमित उपचार सुरू असून त्या धैर्याने या आजाराचा सामना करत आहेत. उपचारांच्या प्रत्येक टप्प्याबद्दल त्या वेळोवेळी सोशल मीडियावर माहिती देत इतर कॅन्सरग्रस्त रुग्णांनाही सकारात्मक राहण्याचा संदेश देत असतात. मराठी मालिकांमधील लोकप्रिय चेहरा शुभा गोडबोले यांनी मराठी दूरदर्शन आणि रंगभूमीवर आपल्या अभिनयाची वेगळी छाप सोडली आहे. ‘अग्गबाई सुनबाई’, ‘जाऊ नको दूर बाबा’, ‘दुर्गा’, ‘ट्रान्स अफेअर’ आणि ‘तुझेच मी गात आहे’ यांसारख्या मालिकांमधील त्यांच्या भूमिका प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस उतरल्या आहेत. नाटकांमधील त्यांच्या अभिनयालाही मोठी दाद मिळाली आहे. मेधा मांजरेकर आणि शुभा गोडबोले या दोन्ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री कॅन्सरशी लढा देत असल्याची बातमी समोर आल्यानंतर मराठी मनोरंजन विश्वातून आणि चाहत्यांकडून त्यांच्या प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत