Central-Trans-Harbour Railway: ठाणे रेल्वे स्थानकावरील गर्दी विभागण्यासाठी आणि मध्य – ट्रान्स हार्बर मार्गाला थेट जोडून कल्याण ते नवी मुंबईपर्यंत रेल्वे प्रवासासाठी कळवा ते ऐरोली उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे.

जागेअभावी एक दशकापासून रखडलेल्या कळवा-ऐरोली उन्नत रेल्वे मार्गाच्या दुसऱ्या टप्याला १० वर्षांनंतर अखेर गती मिळाली आहे. प्रकल्पात अडथळा ठरलेल्या ३५० प्रकल्पबाधितांना ठाण्यात नवे घरे दिल्यानंतर झोपड्यांवर बुलडोझर चालवण्यात आला आहे. यामुळे उन्नत मार्ग उभारणीसाठी निम्मी जागा उपलब्ध झाली आहे. उर्वरित झोपड्या हटवून संपूर्ण जागा मोकळी केल्यानंतर नवा रेल्वे मार्ग उभारण्यास आरंभ होणार आहे. या कॉरिडॉरचे काम पूर्ण झाल्यानंतर मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वे थेट जोडली जाणार असल्यामुळे कल्याण, कर्जत आणि कसारा येथून थेट वाशी-बेलापूर लोकल सेवा उपलब्ध होणार आहे:
१० वर्षांपूर्वी प्रकल्पाला मंजुरी
मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या एमयूटीपी-३ प्रकल्पात कळवा-ऐरोली उन्नत मार्गाचा समावेश आहे. ठाणे स्थानकातील प्रवासी गर्दीचा भार कमी करण्याची क्षमता असलेला हा प्रकल्प नोव्हेंबर २०१६मध्ये मंजूर झाला. अतिक्रमणांमुळे हा प्रकल्प दोन टप्प्यांत विभागण्यात आला. पहिल्या टप्प्यात दिघा गाव स्थानक जानेवारी २०२४मध्ये रेल्वे वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहे. या मार्गाचा दुसऱ्या टप्प्यासाठी आवश्यक २.४० हेक्टरपैकी १.८७ हेक्टर सरकारी जागा ‘एमआरव्हीसी’च्या ताब्यात आहे. उर्वरित ०.५३ हेक्टर खासगी जागा ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू आहे.
प्रकल्पग्रस्तांच्या विरोधामुळे भोलानगर आणि शिवाजीनगर परिसरातील सामाजिक-आर्थिक सर्वेक्षण रखडले होते. राज्य सरकारमधील सर्वोच्च अधिकाऱ्यांच्या हस्तक्षेपानंतर भोलानगरमधील प्रकल्पबाधितांनी ठाण्यातील बाळकूम परिसरातील नव्या घरांचा ताबा स्वीकारला आहे. ३५० कुटुंबीयांचे पुर्नवसन झाल्याने संबंधित झोपड्यांवर तोडक कारवाई करण्यात आली आहे. यामुळे प्रकल्पासाठी आवश्यक एकूण जागेपैकी निम्मी जागा ताब्यात आली आहे.
प्रकल्पग्रस्तांचं पुनर्वसन होणार
शिवाजीनगरमधील उर्वरित ४३६ प्रकल्पग्रस्तांनी मात्र कळव्यातील जागा सोडण्यास नकार दिला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींच्या पाठिंब्यामुळे येथील रहिवाशांनी प्रकल्पाला विरोध कायम ठेवला आहे. प्रकल्पबाधितांसह लोकप्रतिनिधींची समजूत काढण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. कल्याण-ऐरोली थेट लोकल सुरू करण्यासाठी हा उन्नत प्रकल्प तयार करण्यात आला आहे. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी एमएमआरडीएकडून बाळकूम येथे एकूण ८६८ घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यापूर्वी ८२ प्रकल्पग्रस्त कुटुंबीयांचे पुनर्वसन पूर्ण झाले होते.
या मार्गासाठी आतापर्यंत ९५% भूसंपादन पूर्ण झाले आहे. मात्र, केवळ ५% भूसंपादनाअभावी आणि अतिक्रमणामुळे हा प्रकल्प तब्बल एक दशक रखडला. उन्नत रेल्वे मार्गासाठी साधारण ४७६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित होता. दुसऱ्या टप्प्याचे काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यामुळे खर्चात नेमकी वाढ सांगणे शक्य नाही. मात्र, खर्चात जवळपास २०० कोटी रुपयांनी वाढ होण्याचा अंदाज रेल्वे अधिकाऱ्यांनी वर्तवला आहे. संपूर्ण जागेचा ताबा मिळाल्यावर पुढील ३६ महिन्यांत प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
कळवा-ऐरोली उन्नत रेल्वे कॉरिडॉरच्या विलंबाचा मोठा फटका प्रकल्पाच्या खर्चाला बसला असून, प्रकल्पाचा खर्च तब्बल १५० कोटी रुपयांनी वाढला आहे.

